बिलावल भुट्टो यांना भारताचे प्रत्युत्तर
पंतप्रधान मोदींची इस्रायलच्या पंतप्रधानांशी केली तुलना
वृत्तसंस्था/न्यूयॉर्क
पाकिस्तानचे माजी विदेशमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांचे स्वस्त वर्जन संबोधिले आहे. मोदी स्वत:ला नेतान्याहूंप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते त्यांच्या आसपास देखील नाहीत. खराब उदाहरणांनी प्रेरित होऊ नका असे आवाहन आम्ही भारत सरकारला करत आहोत असे बिलावल यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील पत्रकार परिषदेदरम्यान म्हटले आहे. बिलावल यांच्या या वक्तव्याची भारताने निंदा केली आहे. पाकिस्तान आता नव्या खालच्या पातळीवर पोहोचला आहे. भुट्टोंनी स्वत:या हताशेचा संताप पाकिस्तानातील दहशतवादी म्होरक्यांवर व्यक्त करावा असे भारताच्या विदेश मंत्रालयाने भुट्टो यांना सुनावले आहे.
सिंधू संस्कृतीचे आम्ही उत्तराधिकारी
पाकिस्तान स्वत:च्या महान संस्कृतीवर गर्व करतो. आम्ही सिंधू खोऱ्यातील संस्कृतीचे उत्तराधिकारी आहोत. मोहनजोदडो माझ्या मतदारसंघापासून काही अंतरावरच आहे असे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान शांतता इच्छितो
पाकिस्तान भारतासोबत शांतता इच्छितो, परंतु हे अटींसोबत होऊ शकत नाही. भारताने काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्याची चौकशी न करता किंवा पुरावे न देता पाकिस्तानला दोषी ठरविले. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यानी या घटनेच्या चौकशीत सहकार्य करण्याचा प्रस्ताव दिला होता. भारताने सीमा पार करत निर्दोष लोकांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तान सर्वप्रकारच्या दहशतवादाची निंदा करतो आणि या लढाईत आम्ही मोठी किंमत मोजली असल्याचा दावा बिलावल यांनी केला.
पाकिस्तानकडून भारताची नक्कल
पाकिस्तानने भारताची नक्कल करत विदेशात स्वत:ची बाजू मांडण्यासाठी शिष्टमंडळ पाठविले आहे. या शिष्टमंडळात एकूण 9 सदस्य सामील आहेत. याचे अध्यक्षत्व बिलावल भुट्टो करत आहेत. हे शिष्टमंडळ न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी, लंडन आणि ब्रसेल्सचा दौरा करणार आहे. पाकिस्तानच्या या शिष्टमंडळात हवामान विषयक मंत्री डॉ. मुसद्दिक मलिक, माजी मंत्री शेरी रहमान, विदेश विषयक संसदीय समितीच्या अध्यक्ष हिना रब्बानी खार, माजी संरक्षणमंत्री खुर्रम दस्तगीर खान यांचा समावेश आहे. याचबरोबर माजी मंत्री सैयद फैसल अली सबजवारी, खासदार बुशरा अंजुम भट, माजी विदेश सचिव जलील अब्बास जिलानी, तहमीना जंजुआ यांना स्थान देण्यात आले आहे. तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे विशेष सहाय्यक सैयद तारिक फातिमीच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ रशियात पोहोचले आहे.