भारताचा द.आफ्रिकेवर दणदणीत विजय
मालिका 1-1 बरोबरीत, शतकवीर सूर्या सामनावीर, कुलदीपचे 5 बळी, जैस्वालचे अर्धशतक
वृत्तसंस्था /जोहान्सबर्ग
सामनावीर सूर्यकुमार यादवचे वादळी शतक, यशस्वी जैस्वालचे अर्धशतक आणि कुलदीप यादवच्या भेदक फिरकीमुळे भारताने तिसऱ्या व शेवटच्या टी-20 सामन्यात यजमान द.आफ्रिकेवर 106 धावांनी दणदणीत विजय मिळवित तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविली. या सामन्यात सूर्यकुमारने चौथे शतक नोंदवत रोहित शर्मा व ग्लेन मॅक्सवेल यांच्या चार शतकांच्या विक्रमाशी बरोबरीही केली. प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारताने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 201 धावा जमवित द.आफ्रिकेला 202 धावांचे आव्हान दिले होते. पण कुलदीप यादव व रवींद्र जडेजा यांच्या भेदक फिरकीसमोर आफ्रिकेचा डाव 13.5 केवळ 95 धावांत आटोपला. कर्णधार एडन मार्करम (14 चेंडूत 25), डेव्हिड मिलर (25 चेंडूत 35) व डोनोव्हन फेरेरा (11 चेंडूत 12) या तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. मिलरने आक्रमक फटकेबाजी करीत आशा कायम राखण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या बाजूने त्याला पुरेशी साथ मिळाली नाही. शेवटच्या गड्याच्या रूपात तो बाद झाला. सिराजने भेदक वेगवान मारा केला. पण त्याला बळी मिळाला नाही. कुलदीपने मात्र तीन षटकात 17 धावा देत 5 बळी टिपले. त्यापैकी तीन बळी त्याने तिसऱ्या षटकात मिळविले. जडेजाने 25 धावांत 2 तर मुकेश कुमार व अर्शदीपने एकेक बळी मिळविला.
डीआरएस यंत्रणा बंद
द.आफ्रिकेचा डाव यापेक्षाही कमी धावसंख्येत संपला असता. पण त्यांच्या डावातील पहिल्या षटकापासून नवव्या षटकापर्यंत डीआरएस उपलब्ध नव्हते. नवव्या षटकानंतर डीआरएस यंत्रणा सुरू झाल्यानंतर पाच षटकातच द.आफ्रिकेचा डाव संपुष्टात आला. आता या दोन संघात वनडे मालिका होणार असून यातील पहिला सामना रविवारी 17 रोजी जोहान्सबर्ग येथे खेळविला जाणार आहे.. या मालिकेत पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर यजमान दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी मिळवली होती. शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. जैस्वाल आणि गिल या सलामीच्या जोडीने 14 चेंडूत 29 धावांची भर घातल्यानंतर गिल केशव महाराजच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 6 चेंडूत 2 चौकारांसह 8 धावा जमविल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला तिलक वर्मा पुन्हा अपयशी ठरला. केशव महाराजने आपल्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तिलक वर्माला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. भारताने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 2 गडी गमाविताना 62 धावा जमविल्या. भारताचे अर्धशतक 27 चेंडूत फलकावर लागले.
शतकी भागिदारी
जैस्वाल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या गड्यासाठी 12.3 षटकात 112 धावांची शतकी भागिदारी केली. या जोडीने 35 चेंडूत अर्धशतकी तर 63 चेंडूत शतकी भागिदारी नोंदविली. जैस्वालने 34 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह अर्धशतक नोंदविले. कर्णधार यादवने 32 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. यादवने चौकारांपेक्षा षटकार ठोकण्यावर अधिक भर दिला होता. सूर्यकुमारने 56 चेंडूत 8 षटकार आणि 7 चौकारांसह 100 तर जैस्वालने 41 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 60 धावा झोडपल्या. भारताने दीडशतक 93 चेंडूत पूर्ण केले. डावातील 14 व्या षटकात जैस्वाल शम्सीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 41 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 60 धावा जमविल्या. रिंकू सिंगने 10 चेंडूत 1 षटकारासह 14, जितेश शर्माने 4 चेंडूत 1 चौकारासह 4 तर रवींद्र जडेजाने 1 चौकारासह 4 धावा जमविल्या. जडेजा धावचीत झाला तर जितेश शर्मा स्वयमचीत (हिटविकेट) झाला. जितेश शर्माने चौकार ठोकला पण त्याचा पाय यष्टीला लागून हिटविकेट झाल्याने त्याला तंबूत परतावे लागले. सूर्यकुमार यादवने 55 चेंडूत 8 षटकार आणि 7 चौकारांसह शतक पूर्ण केले. त्याने रोहित शर्मा व ग्लेन मॅक्सवेल यांच्या चार शतके नोंदवण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. शतक झाल्यानंतर तो विलियम्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. भारताच्या डावामध्ये 12 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. भारताच्या 200 धावा 121 चेंडूत फलकावर लागल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे केशव महाराज आणि विलियम्स यांनी प्रत्येकी 2 तर बर्गर आणि शम्सी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. टी-20 प्रकारातील सूर्यकुमार यादवचे हे चौथे शतक आहे. त्याने विलियम्सच्या गोलंदाजीवर चेंडू टोलवत 2 धावा घेत आपले शतक पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकात 7 बाद 201 (सूर्यकुमार यादव 56 चेंडूत 8 षटकार आणि 7 चौकारांसह 100, जैस्वाल 41 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 60, रिंकू सिंग 1 षटकारासह 14, जितेश शर्मा 4, जडेजा 4, मोहम्म्द सिराज नाबाद 2, अवांतर 9, केशव महाराज 2-26, विलियम्स 2-46, बर्गर 1-39, शम्सी 1-38).
द.आफ्रिका 13.5 षटकांत सर्व बाद 95 : डेव्हिड मिलर 25 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 35, मार्करम 14 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 25, फेरेरा 11 चेंडूत एका षटकारासह 12, हेन्ड्रिक्स 8, कुलदीप यादव 5-17, जडेजा 2-25, मुकेश कुमार 1-21, अर्शदीप 1-13.