भारताचा पाकवर दणदणीत विजय
युवा हॉकी फाईवज आशियाई हॉकी स्पर्धा
वृत्तसंस्था, मस्कत
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या उपकनिष्ठांच्या युवा मुलांच्या फाईवज आशियाई हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेतील सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 7-3 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. मात्र या स्पर्धेतील मुलींच्या विभागात झालेल्या इलाईट गटातील सामन्यात चीनने भारताचा 6-3 असा पराभव केला.
भारत आणि पाक मुलांच्या विभागातील या सामन्यात भारताने मध्यंतरापर्यंत पाकवर 3-0 अशी मोठी आघाडी घेतली होती. भारतीय संघातर्फे रोमित पालने 8 व्या मिनिटाला, करण गौतमने 10 व्या मिनिटाला तर कर्णधार केतन कुशावहने 11 व्या मिनिटाला गोल नोंदविले. भारतीय संघाने या सामन्यातील उत्तरार्धात अधिक दर्जेदार आणि वेगवान खेळ करत आणखी चार गोल नोंदविले. प्रल्हाद राजबरने उत्तरार्धातील खेळाच्या 12 व्या मिनिटाला गोल नोंदवून भारताला 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. पाकतर्फे मोहम्मद उस्मानने 13 व्या आणि 15 व्या मिनिटाला असे दोन गोल तर कर्णधार अदिलने 17 व्या मिनिटाला 1 गोल नोंदविला. पाकने भारताची आघाडी 3-4 अशी कमी केली. सामन्याच्या उत्तरार्धात शाहरुख अलीने तसेच राहुल यादव आणि कर्णधार केतन कुशावह यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवून पाकचे आव्हान 7-3 असे संपुष्टात आणले.
या सामन्यापूर्वी झालेल्या अन्य एका सामन्यात भारताने ओमानचा 10-1 असा फडशा पाडला होता. या सामन्यात भारताने ओमानवर मध्यंतरापर्यंत 6-0 अशी आघाडी मिळविली होती. भारताच्या शाहरुख अलीने आणि केतन कुशावह यांनी प्रत्येकी 2 गोल तसेच करण गौतम आणि प्रल्हाद राजबर यांनी प्रत्येकी 1 गोल केला. या सामन्यात उत्तरार्धात भारताने आणखी चार गोल केले. गौतम, राजबर यांनी प्रत्येकी 1 गोल तर कर्णधार कुशावह यांनी दोन गोल नोंदविले. या सामन्यात कर्णधार कुशावहने एकूण 4 गोल नोंदविले.
मुलींच्या विभागातील झालेल्या सामन्यात चीनने भारताचा 6-3 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 3-3 असे बरोबरीत होते. भारतातर्फे संदिपा कुमारीने 1 तर किरण एक्काने 2 गोल केले. चीनतर्फे सामन्याच्या पूर्वर्धात झियाझीन, चेन आणि टोंगटाँग यांनी प्रत्येकी 1 गोल केला. सामन्याच्या उत्तरार्धात झियाझीनने आणखी दोन गोल करून हॅट्ट्रीक साधली. टोंगटाँगने संघाचा सहावा आणि वैयक्तिक दुसरा गोल करुन भारताचे आव्हान संपुष्टात आणले.
पाक संघाला दंड
या स्पर्धेतील झालेल्या भारताविरुद्धच्या सामन्यात पाक हॉकी संघाने आपल्या जादा अतिरिक्त खेळाडूला मैदानात उतरविल्याने स्पर्धा आयोजकांनी पाक हॉकी संघाला दंड केला आहे. ही स्पर्धा फाईवज असल्याने दोन्ही संघाकडून मैदानात प्रत्येकी 5 खेळाडू उतरविले जाते. पण पाक संघाने 5 ऐवज सहा खेळाडूंना मैदानात उतरविल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे पाक हॉकी संघ व्यवस्थापनाला आता या चुकीमुळे पंचांकडून दंड द्यावा लागणार आहे.