For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा विंडीजवर विक्रमी विजय

06:56 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताचा विंडीजवर विक्रमी विजय
Advertisement

मालिकेत विजयी आघाडी, गिलचे नाबाद द्विशतक, दुसऱ्या वनडेत 8 गड्यांनी मात

Advertisement

वृत्तसंस्था, गुवाहाटी

येथे झालेल्या हाय स्कोअरिंग वनडे सामन्यात यजमान भारताने विंडीजवर 8 गड्यांनी दणदणीत विजय मिळविला. या सामन्यात दोन्ही संघांकडून एकूण पाच शतके नोंदवली गेली. त्यात सामनावीरचा मानकरी ठरलेल्या शुभमन गिलने नाबाद 223 धावांची विक्रमी खेळी केली. याशिवाय रोहित शर्माने 35 वे वनडे शतक तर विंडीजच्या शाय होप, जॉन कॅम्पबेल व अमिर जंगू यांनी शतके नोंदवली.

Advertisement

फलंदाजीस अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर भारताकडून फलंदाजी मिळाल्यावर विंडीजने आक्रमक फलंदाजी करीत 50 षटकांत 7 बाद 405 धावांचा डोंगर उभा केला. त्यात कर्णधार शाय होप (94 चेंडूत 104), अमिर जंगू (77 चेंडूत 114) व सलामीवीर जॉन कॅम्पबेल (68 चेंडूत 101) यांच्या शतकांचा समावेश होता. भारताच्या गुरनूर ब्रार, रवींद्र जडेजा व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा व गिल यांनी भारताला दमदार सलामी देताना तब्बल 255 धावांची भागीदारी 26.2 षटकांत नोंदवून भारताच्या विजयाचा पाया रचला. रोहित शर्मा 35 वे शतक नोंदवल्यानंतर 101 धावांवर बाद झाला. 75 चेंडूच्या खेळीत त्याने 10 चौकार, 6 षटकार मारले. गिल व कोहली यांनी दुसऱ्या गड्यासाठी 65 धावांची भागीदारी केली. कोहली 29 धावा काढून बाद झाल्यानंतर गायकवाडसमवेत गिलने 43.3 षटकांत भारताचा विजय साकार केला. आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या गिलने 133 चेंडूत 26 चौकार, 8 षटकारांची आतषबाजी करीत नाबाद 223 धावा झोडपल्या.

वनडे क्रिकेटमधील मोठ्या धावसंख्येचा हा आजवरचा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी पाठलाग ठरला. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गमधील सामन्यात 435 धावांचा पाठलाग करीत विक्रमी विजय नोंदवला होता. भारताने मायदेशातील 362 धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम मागे टाकला. 2013 मध्ये जयपूरमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला हरविले होते. चारशेहून धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची भारताची ही पहिलीच वेळ ठरली.

रोहितचे 35 वे शतक, सेलिब्रेशनही कडक, 12 हजार धावाही पूर्ण

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडेत रोहितने 101 धावांची शतकी खेळी साकारली. त्याचे हे वनडेतील 35 वे शतक ठरले. शतकानंतर रोहित फार काळ मैदानावर टिकला नाही. 75 चेंडूत 101 धावा करून तो बाद झाला. शतकानंतरचे रोहितचे खास सेलिब्रेशन आणि त्यानंतर मिळालेली स्टँडिंग ओव्हेशन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील सातवा फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी हा टप्पा गाठला आहे.

शुभमन गिलचे वेगवान द्विशतक

गुवाहाटीत झालेल्या दुसऱ्या वनडेत भारतीय कर्णधार शुभमन गिलने विंडीजच्या गोलंदाजांची तुफानी धुलाई केली. त्याने 133 चेंडूत 223 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. त्याचे हे कारकिर्दीतील दुसरे द्विशतक ठरले. या कामगिरीसह तो सर्वात वेगवान द्विशतक झळकावणारा फलंदाज ठरला. तसेच रोहितनंतर एकापेक्षा जास्त द्विशतके करणारा फलंदाज ठरला. रोहितने वनडेमध्ये तीन द्विशतके झळकावली आहेत. यापाठोपाठ गिलने दोन वेळा द्विशतक झळकावले आहे. दरम्यान, वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतकाचा रेकॉर्ड ईशान किशनच्या नावे होता. 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध सामन्यात त्याने 126 चेंडूत द्विशतक साजरे केले होते. ईशानला मागे टाकत गिलने वनडेत सर्वात जलद द्विशतकी विक्रम आपल्या नावे नोंदवला.

संक्षिप्त धावफलक : विंडीज 50 षटकांत 7 बाद 405 : कॅम्पबेल 101, होप 104, जंगूर 114, चेस 29, अवांतर 23. कुलदीप यादव 2-65, जडेजा 2-75, ब्रार 2-96. भारत 43.3 षटकांत 2 बाद 406 : गिल नाबाद 223, रोहित शर्मा 101, कोहली 29, गायकवाड नाबाद 31, अवांतर 22. सील्स 1-78, शमार जोसेफ 1-52.

Advertisement
Tags :

.