प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताचीही तयारी
सैन्य अन् आयटीबीपीच्या जवानांकडून संयुक्त युद्धाभ्यास
वृत्तसंस्था / लेह
लडाख सेक्टरमध्ये चीनसोबतच्या तणावाला आता दोन वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. अशा स्थितीत भारतीय सैन्य स्वतःची तयारी सातत्याने वाढवत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्य आणि आयटीबीपीकडून युद्धाभ्यास आयोजित करण्यात येत आहेत. या दोन्ही दलांच्या संयुक्त सरावामुळे सुरक्षाव्यवस्था अधिकच बळकट होणार आहे.
लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत भारतीय सुरक्षा दलांकडून स्वतःची तयारी वाढविण्यासाठी सराव करण्यात येत आहे. अलिकडेच सैन्य आणि आयटीबीपीने चीनसोबतच्या सीमेनजीक ‘आयबीईएक्स’ या नावाने संयुक्त सराव केला आहे.
तर दुसरीकडे चिनी सैन्य देखील सध्या युद्धाभ्यास करत आहे. त्याच्या सैन्याच्या बटालियन्स नियमित स्वरुपात सीमा क्षेत्रात सक्रीय दिसून येत आहेत. चिनी सैन्याच्या हालचालींवर भारतीय सैन्य करडी नजर ठेवून आहे. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक पायाभूत सुविधांचा मोठय़ा प्रमाणात विकास घडवून आणला आहे.
चीन स्वतःच्या सैनिकांना सीमेपर्यंत जलदपणे पोहोचविण्यासाठी पँगोंग सरोवरावर पूल उभारत असताना भारत देखील देपसांगच्या मैदानापर्यंत पोहोचणे आणि त्याला नुब्रा खोऱयाशी जोडण्यासाठी पर्यायी रस्त्यांची निर्मिती करत आहे. चीनसोबत एप्रिल-मे 2020 मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषवर तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर भारताने तत्परता दाखवत सीमावर्ती क्षेत्रात रस्त्यांचे जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. दौलत बेग ओल्डी क्षेत्रात दुरबुक-श्योक-डीबीओ रस्त्याच्या माध्यमातून पोहोचता येऊ शकते.
भारतीय सैन्याच्या चार स्ट्राइक कोरपैकी 2 कोरना आता चीन सीमेवर तैनात करण्यात आले आहे. पूर्वी यापैकी तीन स्ट्राइक कोर पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर तैनात होत्या. मोठय़ा संख्येत सैन्य तैनात करून चीनला स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.