निलंबनाविरोधात ‘इंडिया’चे आंदोलन
जंतर-मंतरवर तीव्र निदर्शने : राहुल गांधींसह अन्य नेत्यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, देशात अन्यत्रही निषेध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेतील खासदारांच्या निलंबनाविरोधात ‘इंडिया’ आघाडीने शुक्रवारी जंतर-मंतर गाठत तीव्र आंदोलन केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी आणि समाजवादी पक्षासह सर्व विरोधी पक्षांचे नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला. राजधानी दिल्लीबरोबरच देशातील अन्य विविध शहरांमध्येही काँग्रेससह विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदारांवरील निलंबन कारवाईविरोधात ठिकठिकाणी आंदोलन छेडले.
संसदेत घुसखोरीचा मुद्दा अजून थंड झालेला नाही. विरोधकांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित करून अनेक प्रश्न विचारल्यानंतर अनेक खासदारांना निलंबित करण्यात आले. त्याचदरम्यान खासदारांच्या निलंबनाविरोधात आज ‘इंडिया’ आघाडीच्या पक्षांनी जंतरमंतरवर निदर्शने केली. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जंतरमंतर गाठून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. एकाच अधिवेशनात 150 खासदारांना निलंबित करणे हा केवळ आपला अपमान नसून तो जनतेचा अपमान असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच लोकसभा सभागृहात झालेल्या घुसखोरीवर भाष्य करताना, जेव्हा घुसखोरी झाली तेव्हा भाजप खासदार पळून गेले असेही स्पष्ट केले. आम्ही सर्व विरोधी पक्षनेते आणि विरोधी कार्यकर्ते एकत्र उभे आहोत. ही लढाई द्वेष आणि प्रेम यांच्यातील लढाई आहे. द्वेषाच्या बाजारात आपण प्रेमाचे दुकान उघडतोय. तुम्ही जितका द्वेष पसरवाल तितकी इंडिया आघाडी प्रेम पसरवेल, असेही ते पुढे म्हणाले.
रोजगाराच्या मुद्द्यावरूनही हल्लाबोल
देशात बेरोजगारी वाढत असून रोजगार उपलब्ध नसलेले तऊण इन्स्टा-फेसबुकवर वेळ घालवत असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले. नरेंद्र मोदींच्या सरकारच्या कारकिर्दीत तऊण दिवसातील 7.5 तास फोन आणि सोशल मीडियावर घालवतात. यामागील कारण त्यांना रोजगार दिला जात नाही, ही भारताची खरी स्थिती आहे. त्यामुळे संसदेतील घुसखोरीसारख्या घटना घडतात. अशाप्रकारची भावना भारतातील प्रत्येक तऊणामध्ये आहे. याच मुद्द्याला धरून संसदेच्या सुरक्षेबाबत सभागृहात विरोध केल्याने 146 खासदारांना लोकसभा-राज्यसभेतून निलंबित करण्यात आले, असे राहुल गांधी म्हणाले.
माझ्या जातीमुळे माझा अपमान : खर्गे
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, राज्यघटनेतील उच्चपदावर असलेले लोक माझ्या जातीमुळे माझा अपमान होत असल्याचा आरोप करतात. तुमची ही अवस्था असेल तर माझ्यासारख्या दलिताची काय अवस्था असेल? जेव्हा मी सभागृहात बोलायला उठायचो तेव्हा मला बोलण्याची संधी दिली जात नव्हती. मग हे भाजपचे लोक, भाजप सरकार दलिताला बोलू देत नाही, असे मी म्हणू काय? असा प्रश्न खर्गे यांनी उपस्थित केला.
ज्येष्ठ नेतेही आंदोलनस्थळी
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सीताराम येचुरी आणि शरद पवार हे ज्येष्ठ नेतेही जंतरमंतरवर आंदोलनासाठी पोहोचले होते. त्याशिवाय दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली, सुप्रिया सुळे, काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी, आम आदमी पक्षाचे सुशीलकुमार रिंकू सिंग, दिग्विजय सिंग, डी राजा, मोहम्मद अझऊद्दीन, अधीर रंजन चौधरी, मनोज झा, मनीष तिवारी, शशी थरूर, तारिक अन्वर, झामुमोच्या खासदार महुआ माजी, राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान आदी मंडळीही उपस्थित होती.