भारताचे श्रीलंकेच्या फिरकीपटूंवर उपाय काढण्यास प्राधान्य
वृत्तसंस्था/ कोलंबो
भारत व श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज रविवारी होणार असून संथ खेळपट्टी आणि श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठीचे उपाय यास भारताच्या रणनीतीत उच्च स्थान असेल. 231 धावांचा पाठलाग करताना भारताने शुक्रवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात 3 बाद 130 धावा काढल्या होत्या. पण त्यानंतर लंकेच्या फिरकीपटूंसमोर त्यांच गोची झाली. त्यांनी पाहुण्यांना 230 धावांवर रोखण्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलत सामना ‘टाय’ केला.
रोहित शर्माच्या आक्रमणातून सावरल्यानंतर लंकेने भारतीय फलंदाजांविऊद्ध त्यांच्या योजना चांगल्या प्रकारे अंमलात आणल्या. भारताच्या वरच्या आणि मधल्या फळीतील हुकमी फलंदाज असलेले विराट कोहली, के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या विरोधातही श्रीलंकेने आपल्या फिरकी माऱ्याचा चांगला वापर केला. हे त्रिकूट अस्वस्थ नव्हत, परंतु यजमानांच्या काही चांगल्या चालींच्या विरोधात ते मोकळेपणाने फलंदाजी करू शकले नाहीत.
त्यामुळे आज भारतीय फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहण्यास आणि स्ट्राइक फिरवत ठेवण्यास उत्सुक असतील. अशा खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना निष्फळ ठरविण्याची ती गुऊकिल्ली आहे. दुसऱ्या बाजूने इतर फलंदाज वेगाने परतत असतानाही कुलदीप यादव, अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदर यांना प्रभावीपणे सामोरे जाऊन श्रीलंकेच्या पाथुम निसांका आणि वेललागे यांनी अर्धशतके झळकावली. कशी फलंदाजी करायला हवी ते त्यांनी दाखवून दिलेले आहे. गोलंदाजीत शुभमन गिलसह चार भारतीय फिरकीपटूंनी 30 षटकांत 126 धावा देऊन चार गडी टिपले, तर श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी 37.5 षटकांत 167 धावा देऊन 9 गडी टिपले. त्यामुळे भारतीय आज त्यांच्या धावा जमविण्याच्या पद्धतींशी तडजोड न करता नुकसान कमी करू पाहतील.
रिषभ पंत किंवा रियान पराग या दोघांपैकी एकाला संघात आणणे हा भारतासमोर एक पर्याय आहे. कारण दोघेही फिरकीपटूंचा मुकाबला करण्यात अत्यंत चांगले आहेत. याव्यतिरिक्त पराग एकाच वेळी ऑफस्पिन आणि लेगस्पिन टाकू शकतो. पण भारतीय संघ व्यवस्थापन फक्त एका सामन्यानंतर बदल करेल का हे पाहावे लागेल. दुसरीकडे, श्रीलंकेचे लक्ष हसरंगाच्या फिटनेसवर असेल.
संघ : भारत-रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, के. एल. राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
श्रीलंका-चरिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, निशान मदुष्का, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, चमिका कऊणारत्ने, महीश थीक्षाना, अकिला धनंजया, दिलशान मदुशंका, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो.
सामन्याची वेळ : दुपारी 2.30 वा.