भारतामध्ये जागतिक सेमीकंडक्टर हब होण्याची क्षमता
व्हीटीयूचे कुलगुरु विद्याशंकर यांचे प्रतिपादन : तांत्रिक कार्यशाळेला प्रतिसाद
बेळगाव : इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रिंटेड सर्किट बोर्ड (पीसीबी) तंत्रज्ञानाला वापरल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल पहायला मिळतो. सेमीकंडक्टर क्षेत्र चीप वापरण्याच्या पद्धतीपासून हळूहळू दूर जात आहे. नाविन्यपूर्ण संशोधनामुळे भारतामध्ये भविष्यात जागतिक सेमीकंडक्टर हब होण्याचे सामर्थ्य आहे, असे व्हीटीयूचे कुलगुरु विद्याशंकर एस. यांनी सांगितले.
इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्सच्या व्हीटीयू विद्यार्थी विभागातर्फे सर्किट क्राफ्टिंग इंडस्ट्री लिडर्सबरोबर एक दिवस हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना विद्याशंकर एस. म्हणाले, तंत्रज्ञानातील नाविन्य, नवे संशोधन चीपच्या बदल्यात चीपच्या समूहाचा वापर (चीपलेट) आदींमुळे या क्षेत्रात कौशल्य व ज्ञान असणाऱ्या पदवीधरांची गरज खूप आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाचा दृष्टिकोन वाढविण्यासाठी व्हीटीयूमध्ये सेमीकंडक्टर चीप डिझाईन विषयावर बीटेक् कोर्स सुरू केला आहे.
यावेळी हुबळी येथील केएलई तांत्रिक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बसवराज अनामी, बेंगळूर येथील अयान दत्ता, व्हीटीयूचे कुलसचिव डॉ. बी. रंगस्वामी, मूल्यमापन विभागाचे कुलसचिव प्रो. टी. एन. श्रीनिवास आदी उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक व कम्युनिकेशन विभागाच्या अध्यक्षा डॉ. मेघना कुलकर्णी यांनी स्वागत केले. प्रा. अभिषेक देशमुख यांच्यासह उत्तर कर्नाटकातील शंभरहून अधिक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.