भारताची स्थिती मजबूत : जयशंकर
वृत्तसंस्था/ माद्रिद
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी भारताची वाढती जागतिक प्रतिमा आणि आव्हानात्मक काळात सार्थक सहाय्य प्रदान करण्याच्या क्षमतेवर जोर दिला आहे. स्पेनच्या स्वत:च्या दौऱ्यादरम्यान अनिवासी भारतीयांना संबोधित करताना जयशंकर यांनी भारत-स्पेन संबंध महत्त्वपूर्ण प्रगतीच्या शिखरावर असल्याचे उद्गार काढले आहेत. स्पेनच्या विदेश मंत्र्यांनी एका जागतिक संमेलनात देशाच्या राजदूतांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित केले होते. असा प्रकार पहिल्यांदाच घडला असल्याचा अनुभव जयशंकर यांनी स्पेनच्या राजनयिक समुदायासोबतच्या स्वत:च्या संबंधांविषयी बोलताना व्यक्त केला आहे.
जेव्हा एखादे विदेश मंत्रालय किंवा राजदूत तुम्हाला येण्यास आणि त्यांच्याशी बोलण्यास सांगतो तेव्हा असे का घडतेय याचा विचार केला जावा. जागतिक स्थिती पाहता आता भारतासोबत चांगले संबंध राखणे आपल्या हिताचे असल्याचे सर्वच देशांना वाटत असल्याचा दावा जयशंकर यांनी केला आहे. जागतिक स्तरावर भारताला आर्थिक शक्ती आणि नेतृत्वासाठी ओळखले जाते. आज आमचा देश पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने अग्रेसर असल्याचे वक्तव्य जयशंकर यांनी केले आहे.
कोरोना महामारीदरम्यान भारताचा पुढाकार
जगभरात फिरलात तर 100 देश कोरोना संकटात भारतामुळेच लस मिळाल्याचे सांगताना दिसून येतील. स्पेनचे अध्यक्ष सांचेझ यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या पुरवठ्यासाठी पंतप्रधान मोदींना फोन केला होता. संकटसमयी भारत विविध घटकांशी चर्चा करणे आणि त्यांना मदत करण्यास तयार असतो. येथे पैसे किंवा साधनसामग्रीची बाब नाही. एक सेतू म्हणून विश्वसनीय ठरण्याची ही बाब असल्याचे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.
रशिया-युक्रेनवर भूमिका
भारताला आता जागतिक संवादात योगदान देणारा देश म्हणून ओळखले जाते. अत्यंत कमी देश आहेत जे रशियाशी बोलू शकतात आणि युक्रेनशी देखील. पंतप्रधान मोदी हे रशिया अन् युक्रेनच्या दौऱ्यावरही गेले होते. अत्यंत कमी देश इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांशी चर्चा करू शकतात. पंतप्रधान मोदी हे करू शकतात. आम्ही क्वाडचा हिस्सा आहोत आणि ब्रिक्सचे देखील, असे जयशंकर म्हणाले. तसेच त्यांनी जी-20 मध्ये आफ्रिकेला सामील करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा उल्लेख केला आणि कोरोना महामारीदरम्यान भारताने बजावलेल्या भूमिकेचा दाखला दिला आहे.