For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा युक्रेनवर एकतर्फी विजय

06:34 AM Apr 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताचा युक्रेनवर एकतर्फी विजय
Advertisement

भारतीय महिलांचे स्पर्धेतील आव्हान जिवंत

Advertisement

वृत्तसंस्था, हॉर्सेन्स (डेन्मार्क)

येथे सुरु असलेल्या 2026 च्या थॉमस आणि उबेर चषक सांघिक पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी महिलांच्या विभागातील झालेल्या लढतीत भारताने युक्रेनचा 4-1 अशा फरकाने पराभव करत स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले.

Advertisement

उबेर चषकासाठीच्या महिलांच्या विभागात भारतीय महिला संघाला अ गटातील पहिल्या लढतीत यजमान डेन्मार्ककडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर रविवारी झालेल्या अ गटातील दुसऱ्या लढतीत मात्र भारतीय महिला बॅडमिंटनपटूंनी दर्जेदार कामगिरी करत युक्रेनचे आव्हान संपुष्टात आणले.

भारत आणि युक्रेन यांच्या लढतीतील खेळविण्यात आलेल्या पहिल्या एकेरीच्या सामन्यात भारताच्या उन्नती हुडाने युक्रेनच्या पोलिना बुरोव्हाचा 21-19, 22-20 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात भारताच्या तन्वी शर्माने युक्रेनच्या कँटेमीरवर 21-12, 17-21, 21-10 असा विजय मिळविला. या विजयामुळे भारताने युक्रेनवर 2-0 अशी आघाडी मिळवली होती. तिसऱ्या एकेरी सामन्यात भारताच्या देविका सिहागने युक्रेनच्या मारिया स्टोलिरेंकोचा 23-21, 21-13 असा फडशा पाडला. त्यानंतर झालेल्या महिला दुहेरीच्या सामन्यात युक्रेनच्या बुरोव्हा आणि कँटीमीर यांनी भारताच्या कवीप्रिया सेल्व्हम आणि सिमरन सिंगी यांचा 21-11, 21-17 असा पराभव करत आपल्या संघाचे खाते उघडले. मात्र शेवटच्या महिला दुहेरीच्या लढतीत तनिशा क्रेस्टो आणि पीव्ही सिंधू यांनी युक्रेनच्या लेव्हरोव्हा आणि स्टोलिरेंको यांचा 21-18, 21-15 अशा गेम्समध्ये पराभव केला. भारतीय महिलांनी युक्रेनविरुद्धची लढत जिंकून अ गटात आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. आता अ गटात सोमवारी भारतीय महिला संघाचा शेवटचा सामना बलाढ्या चीन बरोबर होणार आहे. या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी भारताला बलाढ्या चीनला पराभूत करावेच लागेल.

Advertisement
Tags :

.