भारताचे ऑलिम्पिक स्वप्न क्रिकेटवर अवलंबून
वृत्तसंस्था / लॉसेनी
2028 साली लॉस एन्जिल्स येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे. दरम्यान क्रिकेटच्या समावेशामुळे ऑलिम्पिक चळवळीचा वेग आता अधिक वाढणार असून हा निर्णय नव्या व्यापारीक्षेत्रांना भरारी देणारा ठरेल, अशी आशा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष व माजी जागतिक दर्जाचे धावपटू सेबेस्टियन को यांनी व्यक्त केली आहे.
ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये 1900 च्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होत आहे. 2028 च्या लॉस एन्जिल्स ऑलिम्पिकमध्ये टी-20 क्रिकेटचा प्रकार राहील. लॉस एन्जिल्स ऑलिम्पिकमध्ये पाच नव्या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्याचा निर्णय 2023 मध्ये घेण्यात आला होता. विश्व अॅथेलेटिक्स संघटनेचे सेबेस्टियन को हे प्रमुख आहेत. क्रिकेटला आता द.आशियामध्ये अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. 2024 च्या नोव्हेंबरमध्ये सेबेस्टियन को यांनी आपल्या भारत भेटीमध्ये ऑलिम्पिक चळवळीत क्रिकेटला आता अधिकृत मान्यता मिळण्यासाठी द. आशियातील मोठ्या शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे को यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या खास मुलाखतीत म्हटले आहे. लंडन प्रमाणेच आता न्यूयॉर्क शहरातही क्रिकेटचे शौकिन मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. भारत, पाकिस्तान किंवा द. आशियातच नव्हे तर त्या पलिकडेही क्रिकेटला प्रचंड प्रतिसाद लाभत असल्याने ऑलिम्पिक चळवळीच्या दृष्टिने ही बाब महत्त्वाची ठरणार आहे, असेही को म्हणाले.
2032 ची ऑलिम्पिक स्पर्धा ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. तथापि, या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश असेल किंवा नाही याचे भाकित सध्या करता येणार नाही. पण 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धा आयोजन शर्यतीमध्ये भारत इच्छुक आहे. दरम्यान भारताला 2036 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाले तर क्रिकेटचा समावेश पहावयास मिळेल, अशी आशा सेबेस्टियन को ने व्यक्त केली आहे. तथापि, भारताच्या ऑलिम्पिकचे स्वप्न क्रिकेटवर अवलंबून राहिल, असेही को म्हणाले.