भारतात ‘ऑफिस मार्केट’ला मिळाली गती
पहिल्या तिमाहीत जवळपास 15 टक्क्यांची वाढ
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
जागतिक पातळीवर अनिश्चितता निर्माण झालेली असूनही, भारतातील प्रमुख सात शहरांमधील ऑफिस मार्केटने 2026 ची सुरुवात जोरदार गतीने केली आहे. पहिल्या तिमाहीत (1 2026) 183 लाख चौरस फुटांचे लीजिंग नोंदवले गेले, जे वार्षिक तुलनेत 15 टक्क्यांनी अधिक राहिले आहे. विविध क्षेत्रांमधील वाढती मागणी आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्सच्या (जीसीसीएस) विस्तारामुळे जागतिक अनिश्चितता असूनही ही गती कायम राहिली आहे.
बंगळूर आणि हैदराबादचा निम्मा वाटा?
बंगळूर आणि हैदराबादने मिळून एकूण तिमाही लीजिंगमध्ये जवळपास निम्मा म्हणजेच 87 लाख चौरस फुटांचा वाटा उचलला. त्याच वेळी, मुंबई, पुणे, दिल्ली-एनसीआर आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये ग्रेड-ए जागेची मागणी मजबूत राहिली, असून या ठिकाणी प्रत्येक शहरात 20 ते 30 लाख चौरस फूट जागा लीजवर देण्यात आली असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, हैदराबाद आणि पुण्यातील ऑफिस स्पेसची मागणी वार्षिक तुलनेत दुप्पटीहून अधिक वाढली आहे.
कॉलियर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (ऑफिस सर्व्हिसेस) अर्पित मेहरोत्रा म्हणाले की, 2026 च्या पहिल्या तिमाहीत प्रमुख सात बाजारपेठांमध्ये 183 लाख चौरस फूट ‘ग्रेड-ए’ जागेचे भाडेपट्ट्याने देणे हे भारताच्या ऑफिस मार्केटची ताकद दर्शवते. एकूण मागणीमध्ये जीसीसी केंद्रांचे योगदान जवळपास निम्मे आहे.
कार्यालयीन मागणीत तंत्रज्ञान कंपन्यांचा 36 टक्के वाटा असून फ्लेक्स स्पेसच्या मागणीत 77 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. 2026 च्या पहिल्या तिमाहीत, 144 लाख चौरस फूट पारंपरिक कार्यालयीन जागा भाड्याने देण्यात आली, ज्यात तंत्रज्ञान आणि बीएफएसआय क्षेत्रांनी प्रमुख भूमिका बजावली. एकत्रितपणे, या दोन क्षेत्रांचा वाटा 95 लाख चौरस फूट होता, जो एकूण पारंपरिक मागणीच्या जवळपास दोन-तृतीयांश आहे.