भारताची महासत्तेकडे वाटचाल!
पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन, काँग्रेसवर टीका, केंद्राच्या योजनांचा अनेकांना लाभ
प्रतिनिधी/ बेळगाव
भाजप हा पक्ष छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, संत बसवेश्वर यांच्या विचारधारांवर चालणारा पक्ष आहे. कर्नाटकाचे सर्वाधिक नुकसान हे काँग्रेसच्या कालावधीतच झाले. कर्नाटकातील रस्ते, सिंचन, औद्योगिक विकास खुंटला असल्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मागील दहा वर्षात भारताची वाटचाल शक्तिशाली देशाकडे होत आहे. ‘मदर ऑफ डेमॉक्रॉसी’ म्हणून संपूर्ण जगभरात ओळखले जात आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. बी. एस. येडियुराप्पा मार्ग येथील मालिनी सिटी येथे झालेल्या जाहीर प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. भाजपचे लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर व अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारासाठी रविवारी सकाळी जाहीर सभा घेण्यात आली. मोदींच्या या प्रचारसभेला लाखोंची उपस्थिती होती.
25 कोटी गरीब जनता दारिद्ररेषेच्या बाहेर आली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांचा आत्मविश्वास वाढला असून भारत मजबूत होत आहे. त्यामुळे देशभर आनंद साजरा होत असताना दुसरीकडे काँग्रेस मात्र परिवारवादामध्ये फसली आहे. देशाच्या कोणत्याही चांगल्या कामात आडकाठी आणण्याचे काम काँग्रेसने केले आहे. कोरोना काळात देशात तयार करण्यात आलेल्या व्हॅक्सिनवर संशय घेण्यात आला. त्यानंतर ईव्हीएमलाही विरोध केला. परंतु, काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमबाबत चुकीचे भाष्य करू नये, असे सुनावले आहे.
दहा कोटी महिलांना बचत गटाचा लाभ
भाजप व मित्रपक्षांच्या एनडीए सरकारने बचत गट तसेच कृषी उत्पादन संघांना सहाय्य केले. दहा वर्षात 10 कोटींहून अधिक महिलांना बचत गटाचा लाभ मिळाला आहे. बेळगाव जिल्हा ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. उसाला चांगला भाव मिळावा, यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यात येत आहे. यामुळे साखर उद्योग अजून भरभराटीला येऊ लागल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.
कायदा-सुव्यवस्था कोलमडली
कर्नाटकात भाजपची सत्ता असताना गुन्हेगारीचे प्रमाण नगण्य होते. परंतु, सध्या मात्र काँग्रेस राजवटीत कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. चिकोडी येथे जैन साधूंची झालेली हत्या, मुनवळ्ळी येथे महिलेवर अत्याचार, हुबळी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीची निर्घृण हत्या झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडली असल्याचा आरोप मोदी यांनी केला.
मोदी मोदी घोषणांनी परिसर दणाणला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सकाळी 11 च्या सुमारास मालिनी सिटी येथे आगमन झाले. शनिवारी रात्री वास्को-गोवा येथील प्रचारसभा संपवून ते बेळगावमधील एका खासगी हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. बी. एस. येडियुराप्पा मार्ग येथे मोदींचा ताफा पोहोचताच मोदी मोदीच्या घोषणांनी परिसर दणाणला. नरेंद्र मोदी यांचे कटआऊट घेऊन भाजपचे कार्यकर्ते सभेस्थळी हजर होत होते. यामध्ये महिलांची संख्या सर्वाधिक होती. विशेषत: बेळगाव ग्रामीण, उत्तर व दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांची संख्या सर्वाधिक होती. मोदी यांच्या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
मोदी म्हणाले...
- काँग्रेसचे कुटुंब वादात, देशहिताकडे दुर्लक्ष
- नेहाच्या मारेकऱ्यांवर कारवाई कधी?
- भाजपच्या कल्याणकारी योजनांना काँग्रेसकडून खोडा
- प्रत्येक बुथवर भाजपचा विजय होईल
- देशासाठी 24 तास कार्यरत
क्षणचित्रे
- सकाळी 8 वाजल्यापासून सभास्थळी कार्यकर्त्यांची गर्दी
- जय श्रीराम, मोदी मोदी, अबकी बारच्या घोषणा
- पंतप्रधानांना पाहण्यासाठी महामार्गावरही अलोट गर्दी
- पुरुषांपेक्षा महिलांची उपस्थिती लक्षणीय
- तळपत्या उन्हातही मोठी उपस्थिती
- वाहनांच्या पार्किंगसाठी जागा अपुरी