For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा पुरूष संघ विजयी तर महिला पराभूत

06:45 AM Apr 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताचा पुरूष संघ विजयी तर महिला पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था, हॉर्सेन्स (डेन्मार्क)

Advertisement

येथे सुरू असलेल्या 2026 च्या थॉमस आणि उबेर चषक सांघिक फायनल्स आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पुरूष संघाने विजयी सलामी देताना कॅनडाचा 4-1 अशा फरकाने पराभव केला. मात्र महिलांच्या विभागात यजमान डेन्मार्कने भारताचा 3-2 अशा फरकाने पराभव केला.

पुरूषांच्या विभागातील अ गटातील झालेल्या लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनला कॅनडाच्या व्हिक्टर लेईने पराभूत केले. पण त्यानंतर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरूष दुहेरीचा सामना जिंकून आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात भारताच्या 20 वर्षीय आयुष शेट्टीने कॅनडाच्या ब्रायन यांगचा 21-13, 21-17 असा पराभव करत आपल्या संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. पुरूष दुहेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या हरिहरन अंशकरुण यांनी कॅनडाच्या जोडीचा पराभव करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. तर शेवटच्या एकेरी सामन्यात किदांबी श्रीकांतने कॅनडाच्या नेगुयनचा 21-17, 21-12 अशा फडशा पाडल्याने भारताने ही लढत 4-1 अशा फरकाने जिंकून अ गटात दुसरे स्थान मिळविले. अ गटामध्ये चीन पहिल्या स्थानावर असून त्यांनी सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. पुरूष विभागात चार गट आहेत.

Advertisement

महिलांच्या विभागात उबेर चषकासाठी अ गटातील सलामीच्या लढतीत डेन्मार्कने भारतावर 3-2 अशा फरकाने निसटता विजय मिळविला. या लढतीत भारताच्या पी.व्ही. सिंधूने डेन्मार्कच्या ख्रिस्टोफर्सनचा 21-13, 18-21, 21-17 असा पराभव करत आपल्या संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात डेन्मार्कच्या किजेर्सफेल्टने भारताच्या उन्नती हुडाचा 21-12, 25-23 असा पराभव करत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. तिसऱ्या एकेरी सामन्यात डेन्मार्कच्या अॅमेली शुल्झने भारताच्या तन्वी शर्माचा 19-21, 21-16, 21-16 असा पराभव केला. या सामन्यानंतर डेन्मार्कने भारतावर 2-1 अशी आघाडी घेतली होती. महिला दुहेरीच्या सामन्यात भारताच्या श्रुती मिश्रा आणि प्रिया यांना डेन्मार्कच्या कुडसेक आणि वेर्ज यांनी 21-17, 11-21, 23-21 असे पराभूत केले. हा सामना 70 मिनिटे चालला होता. शेवटच्या दुहेरीच्या सामन्यात तनिषा क्रेस्टो आणि पीव्ही यांनी डेन्मार्कच्या बोजे व बुश यांच्या विरोध पहिला गेम 21-19 असा जिंकला. त्यानंतर या लढतीत दुसऱ्या गेममध्ये तनिष आणि पीव्ही 14-17 अशा पिछाडीवर असताना डेन्मार्कच्या जोडीने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली. अखेर डेन्मार्कने ही लढत 3-2 अशा फरकाने जिंकली.

Advertisement
Tags :

.