विश्व तिरंदाजीत भारताचे पदक निश्चित
वृत्तसंस्था/ फ्लोरिडा
येथे सुरु असलेल्या विश्वचषक स्टेज-1 तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने रिकर्व्ह या प्रकारात स्पेनचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या कामगिरीमुळे भारताचे या स्पर्धेतील किमान एक पदक निश्चित झाले आहे.
या स्पर्धेपूर्वी भारतीय पुरुष आणि महिला तिरंदाजपटूंना अमेरिकेकडून व्हिसा वेळेवर मिळाला नाही. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी काही तास अगोदर भारतीय पुरुष तिरंदाजपटूंचा संघ स्पर्धेच्या ठिकाणी दाखल झाला. पुरुषांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारातील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने स्पेनचा 6-2 अशा फरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता पुरुष सांघिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात सुवर्ण पदकासाठी भारताची गाठ तृतीय मानांकित चीनबरोबर रविवारी होणार आहे.
स्पेन विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारताचे तिरंदाजपटू तरुणदीप राय तसेच अतेनु दास यांनी दर्जेदार कामगिरी केली. या स्पर्धेत पुरुषांच्या सांघिक कम्पाउंड प्रकारात भारताने कांस्यपदक मिळवून पदक तक्त्यात आपले खाते उघडले आहे. या स्पर्धेत भारताच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. महिलांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारातील लढतीत यजमान अमेरिकेने भारताचा 6-2 अशा फरकाने पराभव केला. प्रवासाच्या थकावटीमुळे भारतीय महिला तिरंदाजपटू दीपिका कुमारी, अंकिता भक्त आणि अनुष्का कुमारी यांची कामगिरी निराशजणक झाली.