टेबल टेनिसमध्ये भारताचे पदक निश्चित
मानुष शहा-दीया चितळेचे मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था, नागोया : एशियन गेम्समध्ये भारताच्या टेबल टेनिस संघाने पदक निश्चित केले आहे. मानुष शहा आणि दीया चितळे या भारतीय जोडीने मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या वोंग चुन-टिंग आणि डू होई केम या जागतिक क्रमवारीतील चौथ्या मानांकित जोडीवर 3-1 असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयामुळे भारताचे टेबल टेनिसमधील किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे.
सामन्याची सुरुवात भारताने आक्रमक पद्धतीने केली. मानुष आणि दीया यांनी पहिला गेम 11-6 असा जिंकत आघाडी घेतली. मात्र दुस्रया गेममध्ये हाँगकाँगच्या जोडीने जोरदार पुनरागमन केले. चुरशीच्या लढतीत हा गेम 15-13 असा जिंकत त्यांनी सामना 1-1 असा बरोबरीत आणला. त्यानंतर भारतीय जोडीने संयम राखत आपल्या खेळातील चुका कमी केल्या आणि तिसरा गेम 11-9 असा जिंकून पुन्हा आघाडी मिळवली. चौथ्या गेममध्ये मानुष शहा आणि दीया चितळे यांनी सुरुवातीपासूनच दबाव निर्माण केला. वेगवान फटके, अचूक प्लेसमेंट आणि आक्रमक खेळाच्या जोरावर भारतीय जोडीने हा गेम 11-5 असा जिंकला. अखेर भारताने सामना 3-1 असा खिशात घालत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
उपांत्य फेरीत मानुष-दीया जोडीसमोर चीनची सन यिंगशा आणि वांग चुकिन ही जागतिक क्रमवारीतील दुस्रया क्रमांकाची जोडी असणार आहे. त्यामुळे भारतीय जोडीसमोर मोठे आव्हान आहे. मात्र हाँगकाँगच्या बलाढ्या जोडीवर मिळवलेल्या विजयामुळे मानुष-दीया यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे.
भारताच्या टेबल टेनिसच्या इतिहासात आणखी एक पदक
या कामगिरीमुळे एशियन गेम्सच्या इतिहासात भारताला टेबल टेनिसमधील चौथे पदक निश्चित झाले आहे. 2018 च्या जकार्ता एशियन गेम्समध्ये भारताच्या पुरुष संघाने कांस्यपदक मिळवले होते. त्याच स्पर्धेत शरथ कमल आणि मनिका बत्रा यांनी मिश्र दुहेरीत कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर 2023 च्या हांगझोऊ एशियन गेम्समध्ये सुतीर्था मुखर्जी आणि ऐहिका मुखर्जी यांनी महिला दुहेरीत कांस्यपदक जिंकले होते.