भारताची लढत आज थायलंडशी
वृत्तसंस्था/ मस्कत, ओमान
भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघ मस्कत, ओमान येथे थायलंडविऊद्धच्या सलामीच्या सामन्याने पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक 2024 स्पर्धेतील मोहिमेची आज बुधवारी सुरुवात करणार आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या आणि 4 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत भारताला कोरिया, जपान, चिनी तैपेई आणि थायलंडसह गट ‘अ’मध्ये स्थान देण्यात आले आहे.
या वर्षीच्या स्पर्धेत 10 संघांचा समावेश आहे, ज्यामध्ये ‘ब’ गटात पाकिस्तान, मलेशिया, बांगलादेश, ओमान आणि चीन यांचा समावेश आहे. 2004, 2008, 2015 आणि 2023 असे चार वेळा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. गेल्या वर्षी भारताने अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. गेल्या वर्षी स्पर्धेत खेळलेले अमीर अली आणि रोहित आता अनुक्रमे कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करतील.
आजच्या थायलंडविरुद्धच्या सलामीच्या लढतीनंतर भारताचा सामना 28 नोव्हेंबरला जपानशी होईल, त्यानंतर 30 नोव्हेंबरला चिनी तैपेईशी सामना होईल. त्यांची अंतिम गट लढत 1 डिसेंबरला कोरियाशी होणार आहे. 3 डिसेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने, भारतीय संघाला पूल ए मधील पहिल्या दोनमध्ये स्थान मिळणे आवश्यक आहे.
कनिष्ठ आशिया चषकातील आमची मोहीम सुरू करण्यासाठी आम्ही उत्साहित आणि पूर्णपणे तयार आहोत. आमचा संघ कठोर परिश्रम करत आहे आणि आम्हाला आमच्याकडून चांगली कामगिरी घडण्याचा विश्वास आहे. गटात थायलंड, जपान आणि कोरियासारख्या मजबूत संघांविऊद्ध आम्ही खेळणार आहोत आणि ते आव्हानात्मक असेल. परंतु आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करण्यास तयार आहोत. आम्हाला आमचे विजेतेपद राखून ठेवायचे आहे आणि आमच्या देशाला पुन्हा एकदा अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवायची आहे, असे कर्णधार अमीर अलीने ‘हॉकी इंडिया’ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.