For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेच्या शेजारी भारताचा मास्टरस्ट्रोक

06:45 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेच्या शेजारी भारताचा मास्टरस्ट्रोक
Advertisement

11 अब्ज बॅरल तेलसाठा असलेल्या गयानाला डोर्नियर विमान

Advertisement

इराण युद्धादरम्यान जगात तेल, एलएनजी आणि एलपीजीवरून हाहाकार उडाला आहे. दक्षिण कोरियापासून श्रीलंकेपर्यंत इंधन वाचविण्याच्या उपाययोजनांवर भर दिला जातोय. या महासंकटादरम्यान भारताने आता स्वत:च्या पर्यायांवरील लक्ष वाढविले आहे. यानुसार भारताने दक्षिण अमेरिकन देश गयानाला डोर्नियर टेहळणी विमान दिले आहे. भारतीय वायुदलाचे सी-17 ग्लोबमास्टर मालवाहू विमानाच्या मदतीने एच-228 विमान सोपविण्यात आले आहे. या विमानाला एचएएलने निर्माण केले आहे. या विमानामुळे गयानाच्या नागरी उड्डाण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. गयानात अलिकडेच तेलाचा मोठा साठा सापडला आहे. अनुमानानुसार हा तेलसाठा 11 अब्ज बॅरल्सचा असू शकतो. या तेलसाठ्यावरून गयानाचा शेजारी देश व्हेनेझुएलासोबत तणाव सुरू आहे.

भारतीय सी-17 ग्लोबमास्टर डोर्नियर श्रेणीचे दुसरे विमान घेऊन पोहोचणार आहे. भारत आणि गयानादरम्यान सहकार्य अत्यंत वेगाने वाढतेय. मार्च 2024 मध्ये दोन एचएएल डोर्नियर 228 विमानांवरून करार झाला होता. हे पाऊल दोन्ही देशांदरम्यान मजबूत होणारे संबंध आणि व्यापक भागीदारी खासकरून विमानोड्डाण सुविधा आणि क्षेत्रीय संपर्कव्यवस्थेवरून दर्शविते असे म्हणत भारतीय उच्चायुक्तांनी विमानतळावर या विमानाचे स्वागत केले आहे.

Advertisement

व्हेनेझुएलासोबत तणाव

या विमानामुळे गयाना स्वत:च्या संपर्कव्यवस्थेला सुधारू शकणार आहे. खासकरून दुर्गम भागांमध्ये नजर ठेवू शकेल. याचबरोबर गयानाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला यामुळे चालना मिळू शकेल. व्हेनेझुएलासोबत तेलसाठ्यावरून वाद सुरू असताना गयानाला भारताने ही मदत केली आहे. निकोलस मादुरो हे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेकदा गयानाला धमकी दिली होती. गयानाकडे आता 11 अब्ज बॅरल्स तेलसाठा असून तो त्याच्या स्टाबराकइक ब्लॉकमध्ये आहे. यामुळे गयाना एक मोठा तेल निर्यातदार देश ठरला आहे. तर व्हेनेझुएला गयानाच्या एक तृतीयांश भूमीवर दावा करत आहे. खासकरून खनिजसमृद्ध इस्सेक्विबो भागावरून वाद मोठा आहे.  व्हेनेझुएलाने 1899 च्या आंतरराष्ट्रीय मध्यस्थीला फेटाळत ते अवैध असल्याचा दावा केला आहे.

अमेरिका, भारताकडून मदत

2015 मध्ये दिग्गज ऑइल कंपनी एक्सॉनमोबिलला या वादग्रस्त सागरी भागात मोठ्या प्रमाणात तेल साठा मिळाला होता. यामुळे पूर्ण भागात क्षेत्रीय शक्तिसंतुलन बिघडले आहे. निकोलस मादुरेंच्या काळात 2023 मध्ये व्हेनेझुएलाने जनमत चाचणी करवत या भागावर कब्जासाठी पाऊल उचलले होते. याचबरोबर व्हेनेझुएलाच्या नकाशात या भागाला देशाचा हिस्सा दाखविले जाऊ लागले. याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेने गयानासोबत सैन्याभ्यास केला होता. अमेरिकेने या वादावर शांततापूर्ण पद्धतीने तोडगा काढण्याचा सल्ला दिला होता. व्हेनेझुएलाच्या या धमकीनंतरही गयानाने जोरदार आर्थिक प्रगती केली आणि आता मोठ्या प्रमाणावर तेल निर्यात करत आहे. आखाती देशांवरील स्वत:ची ऊर्जा निर्भरता कमी करण्यासाठी भारतही गयानासोबत मैत्री मजबूत करत असल्याचे मानले जातेय.

Advertisement
Tags :

.