हिंदी महासागरात भारताचे मोठे संशोधन
अनेक रहस्ये उकलण्याची शक्यता, नैसर्गिक संपत्तीचे स्रोतही शोधले जाण्याची माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
स्वयंचलित जलसंशोधन वाहनाच्या साहाय्याने भारताने हिंदी महासागराच्या दक्षिण भागातील तळाशी मोठे संशोधनकार्य हाती घेतले आहे. भारतीय सागरी तंत्रज्ञान संस्थेने (एनआयओटी) डॉ. एन. आर. रमेश यांच्या नेतृत्वातील संशोधकांनी हे कार्य हाती घेतले आहे. सागर तळाशी असणाऱ्या उष्ण दऱ्यांचे मॅपिंग या संशोधकांनी केले असून या संशोधनातून सागराच्या पोटात दडलेली अनेक रहस्ये उघड होण्याची शक्यता आहे. तसेच सागरी संपत्तीच्या स्रोतांचा शोध लागण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. हिंदी महासागराच्या भारतीय भागांमध्ये हे संशोधन होत असून त्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे.
या कार्यात या संस्थेला राष्ट्रीय ध्रूवीय आणि सागरी संशोधन केंद्राचेही समान योगदान आहे. अत्याधुनिक साधनांचा उपयोग करुन या दोन्ही संस्था सागरतळाचा शोध घेत आहेत. संशोधनाचा प्राथमिक टप्पा आता पूर्ण झाला आहे. हे संशोधन ज्या स्वयंचलित जलसंशोधन वाहनाच्या माध्यमातून होत आहे, त्याचे नामकरण ‘सागरनिधी’ असे करण्यात आले आहे. समुद्राच्या पृष्ठभागाच्या 4 हजार 500 मीटर खाली असणाऱ्या उंच-सखल भागांचे सर्वेक्षण या संशोधनात केले जात आहे.
याच महिन्यात प्रारंभ
या व्यापक आणि विस्तृत संशोधन तसेच सर्वेक्षणाला याच महिन्याच्या प्रथम सप्ताहात प्रारंभ करण्यात आला होता. भारताने हाती घेतलेले हे अशा प्रकारचे प्रथमच संशोधन आहे. या संशोधनात सागरतळाची असलेल्या उष्ण दऱ्यांचा (हैड्रोथर्मल व्हेंट) शोध लागला असून त्यांची पाहणी करण्याचे काम होत आहे. या दऱ्यांमध्ये एक अद्भूत जीवसृष्टी तसेच इकोसिस्टिमचा शोध लागला असून खनीज संपत्तीचे स्रोतही नंतरच्या संशोधनात हाती लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारचा पुढाकार
याकामी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी या अभियानासाठी मोठे साहाय्य मिळवून दिले आहे. भारताच्या आर्थिक आणि तंत्रवैज्ञानिक प्रगतीसाठी अशी संशोधने आणि सर्वेक्षणे महत्वाची असून त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येईल. प्रगतीचा वेग राखण्यासाठी भारताला साधनसंपत्तीच्या मोठ्या प्रमाणात आवश्यकता असून ती सागरतळाशी शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
खनिज संपत्तीची शक्यता
सागरतळाशी असणाऱ्या हैड्रोथर्मल सल्फाईड क्षेत्रांमध्ये भारताला अधिक स्वारस्य आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सोने, चांदी आणि तांबे यांची खनिजे दडलेली असण्याची शक्यता आहे. ती खरी ठरल्यास भारताच्या आर्थिक विकासात या नैसर्गिक संपत्तीचे महत्वाचे योगदान भविष्य काळात होऊ शकते. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजवरच्या काळात असे संशोधन भारतात केव्हाही हाती घेण्यात आले नव्हते. इतर प्रगत देशांनी मात्र, सागरतळाच्या संशोधनात गेल्या 50 वर्षांपासून प्रयत्न केल्याने त्यांना प्रगती साधता आली. भारताने गेल्या 10 वर्षांमध्येच या दिशेने विचार करण्यास प्रारंभ केला. सागरीय तलसर्वेक्षण साधनांची निर्मिती केली. तसेच काही साधने अन्य देशांमधून आयात केली. यापुढे या संशोधनाचा वेग वाढविण्यात येणार असून गुंतवणुकीचे प्रमाणही वाढविण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.
मोजक्या देशांमध्ये समावेश
सागर तळाचे संशोधन करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसीत केलेली राष्ट्रे संख्येने अगदी कमी आहेत. केवळ 10 देशांनी आजवर हे प्रयत्न केलेले आहेत. आता भारतानेही या देशांच्या सूचीत स्वत:चा समावेश करुन घेतला आहे. भारत करत असलेले हे संशोधन जवळपास पूर्णत: स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे केले जात आहे, हे सर्वात मोठे वैशिष्ट्या आहे. यासाठी ‘ओएमई 6000’ ही यंत्रणा विकसीत करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून सागरतळाची इकोसिस्टिम, जीवसृष्टी, साधन संपत्ती आणि सागरी भूगोलाचे अध्ययन केले जाणार आहे.
मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश
ड भारताच्या कक्षेतील सागर तळाशी साधनसंपत्ती सापडण्याची शक्यता
ड स्वबळावर सागरतळ संशोधन करणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश
ड ‘ओएमई 6000’ या स्वदेश निर्मित यंत्रणेचा या संशोधनासाठी विकास