डेव्हिस लढतीत भारताचा टोगोवर एकतर्फी विजय
विश्वगट एकमधील स्थान कायम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यजमान भारताने येथे रविवारी झालेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या विश्वगट 1 प्लेऑफमधील लढत एकतर्फी जिंकताना टोगोचा 4-0 असा पराभव केला. या विजयामुळे भारतीय डेव्हिस संघाने विश्वगट एक मधील आपले स्थान राखले आहे.
या लढतीमध्ये शनिवारी भारताच्या टेनिसपटूनी पहिले दोन्ही एकेरी सामने जिंकून टोगोवर 2-0 अशी आघाडी मिळवली होती. शशिकुमार मुकुंद आणि रामकुमार रामनाथन यांनी एकेरीचे सामने जिंकले होते. त्यानंतर रविवारी दुहेरीच्या सामन्यात एन. बालाजी आणि डेव्हिस चषक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या बोलिपल्ली या जोडीने टोगोच्या अकोमोलो आणि पॅडिओ यांचा 6-2, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत भारताला 3-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. दरम्यान परतीच्या पहिल्या एकेरी सामन्यात 21 वर्षीय करण सिंगने पॅडिओचा 6-2, 6-3 असा पराभव केला. भारताने टोगोवर 4-0 असा एकतर्फी विजय हस्तगत केला. या एकतर्फी आघाडीमुळे उभय संघातील पाचवा आणि शेवटचा परतीचा एकेरी सामना खेळला गेला नाही.