For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा शेवटचा गट सामना आज

06:54 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताचा शेवटचा गट सामना आज
Advertisement

कॅनडाविरुद्ध लढतीवर पावसाचे सावट, विराट कोहलीच्या फॉर्मवर राहील लक्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ लाँडरहिल (फ्लोरिडा)

भारत आज शनिवारी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम गट सामन्यात कॅनडाशी खेळणार असून यावेळी स्टार फलंदाज विराट कोहलीचा हरपलेला सूर ही भारतासाठी चिंतेची बाब असेल. फ्लोरिडाच्या अनेक भागांना मुसळधार पावसाने तडाखा दिलेला असल्याने या सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार नाही अशी आशा रसिक बाळगून असतील. सलग तीन विजयांसह भारत ‘सुपर एट’मध्ये पोहोचला असून सदर फेरी संपूर्णपणे वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे.

Advertisement

‘आयपीएल’मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरसाठी 150 पेक्षा जास्त स्ट्राइक-रेटने 700 च्या वर धावा काढून कोहली ‘टी-20 वर्ल्ड कपमध्ये आल्याने तो येथेही त्याच पद्धतीने कामगिरी करत राहील अशी अपेक्षा होती. पण तीन सामने झाले आहेत आणि कोहलीच्या 1.66 च्या सरासरीने अवघ्या पाच धावा आहेत, ज्यात अमेरिकेविरुद्धच्या ‘गोल्डन डक’चा समावेश आहे. त्याला आज कॅनडाविरुद्ध सूर मिळविण्याची सुवर्णसंधी असून ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियमची खेळपट्टी न्यूयॉर्कमधील खेळपट्टीसारखी नसण्याची शक्यता आहे.

कर्णधार रोहित शर्माच्या बरोबरीने कोहली सलामीला येत असल्याने त्याच्या अपयशाने पुढील फलंदाजांवर काही प्रमाणात दबाव टाकलेला आहे. रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांनी कोहलीपेक्षा अधिक काही केले आहे. पंतने आयर्लंड आणि पाकिस्तानविऊद्ध 36 आणि 42 धावा केल्या, तर सूर्यकुमारने अमेरिकेविऊद्ध महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावले. शिवम दुबेने अमेरिकेंविऊद्ध केलेल्या 31 धावांमुळे त्याला आज आणखी एका सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र जर भारताला यशस्वी जैस्वालला आणायचे असेल, तर त्याला सलामीवीर म्हणून खेळवावे लागेल आणि कोहलीला त्याच्या तिसऱ्या क्रमांकावर परतावे लागेल.

इतर संघांप्रमाणेच भारताच्या फलंदाजीवर न्यूयॉर्कमधील ड्रॉप-इन खेळपट्ट्dयांचा परिणाम झालेला असला, तरी त्यांची गोलंदाजी प्रभावी राहिलेली आहे. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग या त्रिकुटाने प्रतिस्पर्धी फलंदाजांना वाव दिलेला नाही. पंड्या आणि अर्शदीप यांची कामगिरी व्यवस्थापनाला विशेष आनंद देणारी असेल. अद्याप एकही बळी मिळू न शकलेले मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा हेही लवकरच त्यांच्याप्रमाणे परिणामकारक ठरतील अशी आशा थिंक टँक बाळगून असेल. आज संघ व्यवस्थापन कुलदीप यादव व युजवेंद्र चहल यापैकी एकाला किंवा दोघांनाही संधी देण्याचा विचार करू शकते. दुसरीकडे, कॅनडाने आयर्लंडवर 12 धावांनी विजय मिळविलेला असला आणि सलामीवीर एरॉन जॉन्सनसारखे खेळाडू आश्चर्यचकित करू शकत असले, तरी भारताला रोखणे हे कॅनेडियन संघाच्या क्षमतेपलीकडचे काम आहे.

संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

कॅनडा : साद बिन जफर (कर्णधार), एरॉन जॉन्सन, दिलॉन हेलिगर, दिलप्रीत बाजवा, ऋषीव जोशी, जेरेमी गॉर्डन, जुनैद सिद्दीकी, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किरटॉन, परगत सिंग, रविंदरपाल सिंग, रय्यानखान पठाण, श्रेयस मोव्वा.

सामन्याची वेळ : (भारतीय वेळेनुसार) रात्री 8 वा.

Advertisement

.