For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जामनेरमध्ये होणार भारतातील सर्वात मोठा ‘नमो कुस्ती महाकुंभ’

06:58 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
जामनेरमध्ये होणार भारतातील  सर्वात मोठा ‘नमो कुस्ती महाकुंभ’
Advertisement

भारतातील दिग्गज पैलवानांमध्ये एकाच मंचावर घमासान : खासबाग अखाड्याच्या धर्तीवर स्टेडियमची निर्मिती 

Advertisement

प्रतिनिधी/ जामनेर, जळगाव

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी बिनिया मिन, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी विरुद्ध जम्मू केसरी मुस्तफा खान अशा एकापेक्षा एक अशा 13 कुस्ती दंगली आणि त्याचबरोबर खानदेश आणि परिसरातील 100 पेक्षा अधिक पैलवानांचे द्वंद्व पाहाण्याचे भाग्य येत्या 11 फेब्रूवारीला जामनेरकरांना लाभणार आहे. निमित्त आहे नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा हा मंत्र भारतातील तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचे.

Advertisement

सध्या युवापिढीमध्ये वाढत चाललेल्या उत्तेजक द्रव्य सेवनाचा फॅड रोखण्यासाठी आणि तरुणांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेवत ग्रामविकास, पर्यटन मंत्री, आमदार गिरीष महाजन यांच्या पुढाकाराने जळगाव जिह्यातील जामनेर येथे ‘नमो कुस्ती महाकुंभ‘ या भारतातील सर्वात मोठ्या कुस्ती दंगलचे आयोजन केले आहे. ही कुस्ती दंगल जामनेरच्या गोविंद महाराज क्रीडांगणावर खेळवली जाणार आहे.

जे आजवर कुणालाही जमले नाही, असे भव्य आणि दिव्य आयोजन जामनेरमध्ये केले जाणार आहे. ही एकदिवसीय कुस्ती दंगल आपल्या वैशिष्ट्यापूर्ण लढतींमुळे कुस्तीप्रेमींच्या स्मरणात राहिल, असे दिमाखदार आयोजन 11 फेब्रूवारी, रविवारी केले जाणार आहे. कुस्ती जगतातील रथी-महारथी एकाच वेळी एका मंचावर आणण्याचा इतिहास या स्पर्धेच्या माध्यमातून रचला जाणार आहे. या एकदिवसीय दंगलीमध्ये राज्यातील पैलवानांसह हिंदुस्थानच्या कुस्ती क्षेत्रातील दिग्गजही आपला जोर दाखवण्यासाठी सध्या अखाड्यांमध्ये आपला घाम गाळत आहेत.

या दंगलीत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख भारत केसरी बिनिया मिनला आव्हान देणार आहे. तसेच महेंद्र गायकवाड (उप महाराष्ट्र केसरी) वि. मनजीत खत्री (भारत केसरी), विजय चौधरी (ट्रिपल महाराष्ट्र केसरी) वि. मुस्तफा खान (शेर ए हिन्द), प्रकाश बनकर (उप महाराष्ट्र केसरी) वि. भूपिंदर सिंह (भारत केसरी), किरण भगत (उपमहाराष्ट्र केसरी) वि. गुरुजनट सिंह (पंजाब केसरी),  बालारफिक केसरी (महाराष्ट्र केसरी) वि. मनप्रीत सिंग (पंजाब केसरी), अजय गुज्जर (भारत केसरी) वि. माउली कोकाटे (उप महाराषट्र केसरी), सुमित मलिक (अर्जुन अवॉर्ड, हिंदकेसरी) वि. हॅपी सिंह (पंजाब केसरी), प्रितपाल सिंग वि. शंटी कुमार(दिल्ली केसरी), समीर शेख (महाराष्ट्र चॅम्पियन) वि. कलवा गुज्जर (भारत कुमार), जतींदर सिंह (रुस्तुम ए पंजाब) वि. सत्येन्द्र मलिक (भारत केसरी), कमलजित (रुस्तुम ए हिंद) वि. माउली जमदाडे (भारत केसरी) आणि रेहान खान (मध्य प्रदेश केसरी) वि. कमल कुमार (शेर ए पंजाब) या 13 प्रमुख लढती होणार कुस्तीप्रेमींना दिग्गजांच्या कुस्त्या याची देही याची डोळा पाहाता येणार आहे. या दिग्गजांबरोबर खान्देश आणि परिसरातील 100 पैलवान सुद्धा या दंगलमध्ये आपल्या कुस्तीचे डावपेच दाखविणार आहेत.

विजेत्यांवर लाखोंच्या पुरस्कारांचा वर्षाव

11 फेब्रूवारीला जामनेरमध्ये रंगणारी दंगल संस्मरणीय व्हावी म्हणून ग्रामविकास, पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी 13 दंगलीतील विजेत्यांवर लाखो रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव करणार असल्याची माहिती दिली. एवढेच नव्हे तर विजेत्या खेळाडूला 3 किलो वजनाची चांदीची गदा आणि ‘नमो कुस्ती महाकुंभ‘ हा मानाचा पट्टाही बहाल केला जाणार असल्याचे सांगितले. अव्वल दंगलीतील पराभूत खेळाडूलाही रोख पुरस्कार दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.