कंपन्यांवरील बंदीनंतर भारताचा हस्तक्षेप
अमेरिकेकडून 19 भारतीय कंपन्यांवर निर्बंध : रशियाला मदत केल्याचा ठपका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रशियासोबतच्या संबंधांमुळे अमेरिकेने अनेक भारतीय कंपन्यांवर बंदी घातली आहे. यावर भारत सरकारने हस्तक्षेप करत या कंपन्या भारताच्या नियमांचे उल्लंघन करत नसल्याचे स्पष्ट केले. वरिष्ठ पातळीवरील अधिकारी या मुद्यावर अमेरिकन अधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याचेही सरकारने म्हटले आहे. युव्रेन युद्धात रशियाला मदत केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने जगभरातील शेकडो कंपन्यांवर बंदी घातली आहे. यामध्ये 19 भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे. या कंपन्यांनी रशियाला तंत्रज्ञान आणि उपकरणे पुरवल्यामुळे रशियाची लष्करी ताकद वाढल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.
कंपन्यांवरील बंदीबाबत भारत सरकार अमेरिकेशी चर्चा करत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी यासंबंधी माहिती देताना ‘आम्ही या मुद्यांवर स्पष्टीकरण देण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांशी बोलत आहोत’ असे सांगितले. बंदी घातलेल्या कंपन्यात भारतीय कायद्यांचे उल्लंघन करत नाहीत, असा भारताचा विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारताकडे धोरणात्मक व्यापार आणि प्रसार नियंत्रणाबाबत मजबूत कायदेशीर आणि नियामक फ्रेमवर्क आहे. साहजिकच भारतीय कंपन्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंधांची आणि युएनएससी ठराव 1540 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करत असल्याचेही जायस्वाल यांनी सांगितले.