भारताचा ‘ग्लोब-ई’मध्ये समावेश
भ्रष्टाचार रोखण्यासाठी भारत आता महत्वाची भूमिका निभावू शकणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
जागतिक भ्रष्टाचार विरोधी कक्ष ‘ग्लोब-ई’ च्या सुकाणू समितीत भारताचा समावेश झाला आहे. मतदानाच्या अनेक फेऱ्यांनंतर भारताची निवड करण्यात आली आहे. या कक्षाचे कार्यालय चीनची राजधानी बिजींगमध्ये आहे. भारताची निवड झाल्याचा निर्णय गुरुवारी घोषित करण्यात आला. या संस्थेत 121 देशांचा समावेश आहे. तसेच 291 प्राधिकारणांचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या या कक्षाचे पाचवे महाअधिवेशन बीजिंगमध्ये होत आहे. या कक्षाचे पूर्ण नाव ‘ग्लोबल ऑपरेशनल नेटवर्क ऑफ अँटिकरप्शन लॉ एन्फोर्समेंट अॅथोरिटीज’ असे आहे. भ्रष्टाचाराच्या जागतिक संकटाला रोखण्यासाठी भारत आता एक महत्वाची भूमिका घेऊ शकतो. या क्षेत्रातील भारताचा अनुभव कक्षाला मार्गदर्शक ठरु शकतो. भारत आता या कक्षाचा एक सन्माननीय सदस्य झाला आहे, अशी भलावण या कक्षाच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या समावेशाची घोषणा करताना केली.
सीबीआयकडून स्वागत
भारताची केंद्रीय गुन्हा अन्वेषण संस्था सीबीआयने भारताच्या समावेशाचे स्वागत पेले आहे. या कक्षाच्या कार्यात भारताची भूमिका यापुढे फार महत्वाची असेल, अशी प्रतिक्रिया सीबीआय प्रवक्त्याने व्यक्त केली आहे. आता भारताचा गृहविभाग हा या कक्षाचे केंद्रीय प्राधिकरण म्हणून, तर सीबीआय आणि प्रवर्तन निदेशालय किंवा ईडी या भारताच्या सदस्य संस्था या कक्षाच्या सदस्य संस्था म्हणून काम करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहविभागाकडून देण्यात आली आहे.
केव्हा प्रारंभ झाला ?
ग्लोब-ई या कक्षाचा प्रारंभ जून 2021 मध्ये करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेच्या विशेष सत्रात हा प्रारंभ करण्यात आला होता. भ्रष्टाचाराच्या विरोधासाठी हे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. जगभरात भ्रष्टाचाराला आळा घालणे हा या कक्षाच्या स्थापनेचा प्रमुख हेतू आहे.
काम काय चालते?
या कक्षात जगातील जवळपास सर्व देशांच्या गुन्हा अन्वेषण संस्थांना एकमेकींशी संपर्क करण्याची संधी मिळते. या संस्थांचे प्रतिनिधी स्वत:च्या भ्रष्टाचारविरोधी प्रक्रिया, गुन्हेगारी क्षेत्रातील गुप्तहेरगिरी, भ्रष्टाचार नियंत्रणासाठी असलेले विविध देशांचे नियम आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात एकमेकींना साहाय्य अशा विविध मार्गांनी माहितीची देवाणघेवाण करतात. हा कक्ष भ्रष्टाचारविरोधात सहकार्य करण्यासंबंधीचे एक महत्वाचे व्यासपीठ आहे. आता भारताचाही यात समावेश झाल्याने भारत हा कक्ष अधिक बळकट करण्यासाठी साहाय्यभूत ठरणार आहे. या कक्षात प्रवेश मिळावा म्हणून भारत नेहमी प्रयत्नशील राहिला आहे. या प्रयत्नाला आज यश मिळाल्याने सर्वांना आनंद वाटत आहे, असे प्रतिपादन सीबीआयने केले आहे.
जी-20 परिषदेतही...
गेल्या वर्षी भारताकडे जी-20 परिषदेचे अध्यक्षपद होते. त्यावेळी भारताच्या पुढाकाराने जागतिक भ्रष्टाचाराच्या विरोधात या परिषदेने दोन उच्च पातळीवरील प्रस्ताव स्वीकारण्यात आले होते. या प्रस्तावांमध्ये ग्लोब-ईचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर आता भारतच या कक्षाच्या सुकाणू समितीचा सदस्य झाला आहे. कक्षाला बळ देण्याचा आम्ही प्रयत्न करु. असेही स्पष्ट करण्यात आले.
भारताला काय मिळू शकते?
या कक्षाच्या संचालन समितीचे सदस्यत्व भारताला मिळाल्याने भारताचाही मोठा लाभ होणार आहे. गुन्हा अन्वेषण प्रक्रिया कोणत्या देशात कशी चालते, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग गुन्हा अन्वेषण क्षेत्रात कसा होतो, भारताला आपल्या प्रक्रियेत कोणत्या सुधारणा कराव्या लागणार आहेत, तसेच भारताला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी क्षेत्राशी दोन हात करताना कोणत्या प्रक्रियेचा अवलंब करावा लागणार आहे, इत्यादी मुद्द्यांची माहिती भारताला या कक्षाच्या माध्यमातून मिळू शकते.