‘पंतप्रधान मोदींकडून भारताची प्रतिमा मलिन’
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका : ट्रम्प यांच्याशी मैत्री करून देशाला आणले अडचणीत
खरगे प्रतिनिधी/ बेंगळूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची प्रतिष्ठा खराब करत आहेत. तसेच त्यांच्या परराष्ट्र धोरणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन होत आहे, अशी टीका एआयसीसी अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. रविवार कलबुर्गी विधानसभा मतदारसंघातील चित्तापुरात 1,069 कोटी ऊपयांच्या विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
खर्गे पुढे म्हणाले, ट्रम्प हे हुकूमशहा असून मोदी त्यांचे गुलाम आहेत. अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदीला फक्त एक महिना परवानगी दिली आहे. मोदी अमेरिकन लोकांचे म्हणणे ते ऐकत आहेत. ट्रम्प यांच्याशी मैत्री करून मोदींनी आपल्या देशाला अडचणीत आणले आहेत, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धावर वक्तव्य करताना, जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना अलिप्तता करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे जागतिक शांतता निर्माण झाली. पण, मोदी आता काय करत आहेत? मोदी इस्रायल दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांनी इराणवर बॉम्बहल्ला केला. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांची अमेरिकेने हत्या केली. जर एखाद्या देशाच्या प्रमुखाची हत्या झाली तर तो देश शांततेत राहील का? जग शांततेत राहील का, असा प्रश्नही खर्गे यांनी केला.
भारतात 65 टक्के तर अमेरिकेत केवळ 3 टक्के शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत. अमेरिकेत आपल्या देशाच्या उत्पादनांवर कोणताही कर नाही. तथापि, आपल्या देशात अमेरिकन उत्पादनांवर अंदाधुंदपणे कर लादले जात आहेत. ट्रम्प म्हणतात की मोदी माझे मित्र आहेत. पण जर तुम्ही रशियाकडून तेल खरेदी केले तर तुमच्यावर कर लादतो, असे म्हणतात. मी ट्रम्प यांच्याशी दररोज बोलत असतो, असे मोदी म्हणतात. तुम्ही कर लादण्याबद्दल बोलत आहात का?, एपस्टिन फाइलमध्ये कोण कुठे गेले याची माहिती आहे, असे म्हटले जात आहे. ते समोर ठेवूनच ट्रम्प मोदींना धमकावत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.