For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीआयएफ लंडन चॅम्पियनशिपमध्ये दीक्षा डागरवर भारताच्या आशा

06:37 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
पीआयएफ लंडन चॅम्पियनशिपमध्ये दीक्षा डागरवर भारताच्या आशा
Advertisement

एलईटी ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये भारतीय गोल्फर अव्वल स्थानी

Advertisement

वृत्तसंस्था

लंडन : एआयजी विमेन्स ओपनमध्ये कट गाठण्यात अपयश आले असले तरी भारतीय गोल्फपटू दीक्षा डागर हिने 2026 हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करत लेडीज युरोपियन टूरच्या (एलईटी) ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये भारतातील अव्वल स्थान कायम ठेवले आहे. दोन वेळची एलईटी विजेती दीक्षा सध्या ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये सहाव्या, तर ’रेस टू कोस्टा डेल सोल’ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.

Advertisement

या आठवड्यात सेंच्युरियन क्लब येथे होणाऱ्या पीआयएफ लंडन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या आव्हानाचे नेतृत्व पुन्हा एकदा दीक्षा डागरकडे असेल. या स्पर्धेत आणखी एक अव्वल-10 मध्ये स्थान मिळवून आपली क्रमवारी अधिक मजबूत करण्याचा तिचा प्रयत्न असेल.

पाच भारतीय गोल्फपटूंचे आव्हान

पीआयएफ लंडन चॅम्पयिनशिपमध्ये भारताचे एकूण पाच गोल्फपटू सहभागी होणार आहेत. नवोदित अवनी प्रशांत हिने एलईटीमधील पदार्पणाच्या हंगामात चांगली छाप पाडली असून ती ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये 45 व्या स्थानावर आहे. प्रणवी उर्स 48 व्या स्थानावर असून तिच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारताची अनुभवी आणि एलईटीवरील पाच वेळची विजेती आदिती अशोक मिश्र्र कामगिरीमुळे सध्या 58 व्या स्थानावर आहे. तर पहिल्याच पूर्ण एलईटी हंगामात अनुभव मिळवत असलेली हिताशी बक्षी 127 व्या स्थानावर आहे.

या हंगामातील रेस टू कोस्टा डेल सोल गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेची पॅसँड्रा अलेक्झांडर आघाडीवर आहे. तर 2025 च्या एलईटी ऑर्डर ऑफ मेरिट विजेती शॅनन टॅन (सिंगापूर) हिचेही या स्पर्धेत विजेतेपदासाठी प्रबळ आव्हान असेल.

दीक्षासाठी महत्त्वाची स्पर्धा

2026 हंगामात अनेक वेळा अव्वल दहामध्ये स्थान मिळवणाऱ्या दीक्षा डागरसमोर पीआयएफ लंडन चॅम्पियनशिपमध्ये आणखी एक दमदार कामगिरी करण्याची संधी आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यास ऑर्डर ऑफ मेरिटमधील तिचे अव्वल भारतीय स्थान अधिक भक्कम होईल आणि हंगामअखेरीस कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी मिळविण्याच्या तिच्या आशाही अधिक बळकट होतील. ‘रेस टू कोस्टा डेल सोल’साठी महत्त्वाचे गुण या स्पर्धेत उपलब्ध असल्याने हंगाम निर्णायक टप्प्यात पोहोचत असताना या स्पर्धेचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या नजरा पुन्हा एकदा दीक्षा डागरच्या कामगिरीकडे लागल्या आहेत.

Advertisement
Tags :

.