‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ भारताच्या कृत्रिम प्रज्ञेचे वाढते प्रभुत्व
‘21 व्या शतकात भारत जगावर राज्य करेल तो केवळ धर्म आणि संस्कृती नव्हे तर प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे’ स्वामी विवेकानंदांचे हे स्वप्न साकार होत आहे. त्यांच्या विचारांची प्रचिती नवी दिल्ली येथे 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या पहिल्या जागतिक एआय इम्पॅक्ट परिषदेच्या माध्यमातून होणार असून या परिषदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे बोधवाक्य घेऊन ही परिषद कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचा मानवी कल्याणासाठी उपयोग करण्यास कटीबद्ध झाली आहे. दक्षिणेकडील जगात संपन्न होणारी ही पहिलीच कृत्रिम प्रज्ञा शिखर परिषद आहे. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाच्या आधारे सर्व जगाचे, सर्व जणांचे सुख म्हणजेच सर्वांचे कल्याण, सर्वांचे हित साध्य ही परिषद व्यापक विचारमंथन घडवीत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मानवी कल्याणासाठी अधिकाधिक उपयोग कसा करता येईल याचा ध्यास घेऊन पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी या परिषदेचे आयोजन केले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाने एक नवे वादळ निर्माण केले आहे आणि या क्षेत्रातील भारताची प्रगती वाखाणण्यासारखी आहे. मायक्रोसॉफ्टचे अहमद मझारी यांनी म्हटल्याप्रमाणे 2030 मध्ये संपूर्ण जगाला नेतृत्व देण्याचे आणि जगाची एआय डिझाईन कॅपिटल होण्याचे सामर्थ्य भारतामध्ये आहे आणि भारतीय शास्त्रज्ञ या सामर्थ्याचा प्रत्यय नित्य नव्याने आणून देत आहेत. नवी दिल्लीची शिखर परिषद ही या प्रक्रियेचा एक मौलिक असा मैलाचा दगड ठरणार आहे. जगाच्या तीस देशातील 300 हून अधिक प्रतिनिधी या शिखर परिषदेस उपस्थित राहणार आहेत तसेच दहा देशांतील प्रदर्शनींचा सहभाग असणार आहे. त्यातून होणारे लोकशिक्षण नव्या वातावरण निर्मितीस पोषक ठरेल. कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रात अर्थपूर्ण सहभागासाठी ही शिखर परिषद एक नवा वळणबिंदू ठरणार आहे. भारताचे जबाबदार लोककेंद्री आणि विकास प्रेरक कृत्रिम प्रज्ञा धोरण या परिषदेत प्रतिबिंबित होत आहे
वैज्ञानिकांची मांदियाळी
कृत्रिम प्रज्ञा साधनांचे लोकशाहीकरण करण्यासाठी जागतिक पातळीवर एक नवे व्यासपीठ विकसित करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. त्यासाठी 20 सरकारांचे प्रमुख तसेच पन्नासहून अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि 100 हून अधिक जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी या परिषदेत बौद्धिक योगदान देणार आहेत. जणू ही नवोन्मेष प्रतिभाशाली वैज्ञानिकांची मांदियाळी ठरली आहे. पंतप्रधान या परिषदेच्या उद्घाटनाचे अभिभाषण करणार आहेत. शिवाय या परिषदेत गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारतीय वंशाचे सुंदर पिचाई तसेच ओपन एआयचे प्रमुख कार्यकारी अधिकारी सॅम आल्टमन आणि एनव्हिडीयाचे कार्यकारी अधिकारी जेनसेन हुंग यासारखे जागतिक तंत्रज्ञानातील दिग्गज या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचे ध्येय मोठे सुस्पष्ट आहे. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचे फायदे केवळ श्रीमंत बलिष्ठ देशापुरते मर्यादित नसून ते सर्वांच्या कल्याणासाठी सर्वांना उपलब्ध करून द्यावयाचे आहे, याची खात्री करणे आणि भावी कल्याणासाठी एआयचा अधिक जबाबदार व अधिक सक्षम विकासासाठी पथदर्शी मार्ग म्हणजे रोड मॅप तयार करणे या दिशेने या परिषदेत विचारमंथन होणार आहे. संपूर्ण जगातील कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेले संशोधक या परिषदेत आपली उपस्थिती लावतील आणि त्यांच्या मौलिक योगदानातून नवी सैद्धांतिक मांडणी विकसित होईल जी भारताच्या नेतृत्वाखाली कृत्रिम प्रज्ञा-तंत्रज्ञानाच्या सुरक्षित उपयोजनांसाठी नैतिक आणि आध्यात्मिक नियमाचे नवे सूत्र प्रदान करेल.
आर्थिक समृद्धीचे माध्यम
भारताच्या विकास प्रक्रियेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक मध्यवर्ती आधारस्तंभ बनली आहे. त्यामुळे भारतीय उपखंडात सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा पुरवठा साखळीचे सबलीकरण आणि पायाभूत व्यवस्थेच्या विकासातील विविध सेवा प्रक्रिया सक्षम करण्यास नवी संजीवनी लाभणार आहे. मानवी प्रगती ही नेहमीच तंत्रज्ञानाच्या गतीवर्धनावर अवलंबून असते. त्यामुळे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व क्षेत्रात एआयचा उपयोग भारताला अधिक बलशाली आर्थिक सत्ता बनविण्यासाठी प्रेरक ठरत आहे. कृषी, आरोग्य सेवा तसेच शिक्षण, उत्पादन, हवामान, कृती आणि लोकप्रशासन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातसुद्धा आता कृत्रिम प्रज्ञा वरदान ठरत आहे. भारतासाठी कृत्रिम प्रज्ञाचे लोकशाहीकरण अत्यंत आवश्यक आहे कारण त्यामुळे भारतीय समाजातील तळागाळातील गरीब दुखी कष्टी माणसाला न्याय मिळण्यासाठी अधिक प्रमाणात लाभ होऊ शकतो आणि 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र गतीने बनवू शकते. सर्व क्षेत्रात विकासाचा डेटा हा पाया आहे. त्यामुळे आता डिजिटल अर्थव्यवस्था अधिक सुदृढ करण्यात एआयचे प्रयोजन अधिक हितकर ठरत आहे. त्यामुळे लघु व मोठे उद्योग असो की स्टार्टअप उद्योग असो अर्थव्यवस्था गतिमान करण्यात संशोधन फलदायी ठरू शकते. सार्वजनिक संस्था तसेच स्वयंसेवी संस्था यांनासुद्धा नवोपक्रमामुळे नवचैतन्य लाभू शकते. भारतामध्ये एआय साधनांचा गतीने विस्तार होत आहे. 2025 च्या नीती आयोग अहवालानुसार समावेशक सामायिक विकासाच्या प्रक्रियेत सेवा बाजारपेठांची उपलब्धता आणि वित्तीय प्रणालीमध्ये एआय प्रवेश वाढवून आपण आर्थिक प्रगतीला अधिक गती देऊ शकतो. भारतातील 490 दशलक्ष अनौपचारिक कामगारांना सक्षम बनविण्याच्या प्रयत्नामुळे या क्षमता अधिक बलशाली ठरतील. सार्वजनिक प्रशासनातील एआयचा वापर हा सुद्धा आर्थिक बळ वाढविण्यासाठी पूरक ठरू शकेल. महिला तरुण आणि शेतकरी यांच्या सबलीकरणास यामुळे नवी संजीवनी लाभेल.
नियोजनातील दूरदृष्टी
या परिषदेच्या नियोजनातील दूरदृष्टी ही समग्र जगाच्या हितसंवर्धनावर आधारलेली आहे. या तंत्रज्ञानाचा जन्म झाला तो गोपनीय माहितीच्या प्रसारासाठी. त्यातून ताण-तणाव वाढत गेले होते परंतु आता भारताने घेतलेला पुढाकार हा कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाच्या मानवी कल्याणावर आधारलेला आहे. शिवाय या निमित्ताने कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाची नवे प्रवाह प्रकट करणारे वैश्विक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय प्राधान्यक्रम कोणते आहेत आणि जगातील प्रत्येक देशाच्या भल्यासाठी या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होऊ शकतो, यावरही या परिषदेत चर्चा अपेक्षित आहे. कृत्रीम प्रज्ञावर आधारित ग्रंथ विचारसामुग्री ज्ञानसंग्रहाच्या रुपाने सर्वांना उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. या परिषदेच्या यशस्वी नियोजनामागे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची तपश्चर्या आहे, साधना आहे तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा समूह हा आंतरदृष्टीने भारावलेला आहे. अल्पावधीत काय कसे व किती साध्य करावे याबाबतचा दृष्टिकोन स्वच्छ असल्यामुळे कमीत कमी वेळात अधिकाधिक चांगले कार्य करण्यावर भर असणार आहे.
कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रातील भारताच्या नेतृत्वाची एक तेजस्वी झलक या निमित्ताने पाहायला मिळेल शिवाय कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रातील जागतिक भागीदारीच्या अनेक नव्या दिशा या परिषदेच्या बैठकातून प्रकट होतील आणि प्रामुख्याने जागतिक नेते या निमित्ताने नवी दिल्लीत घोषणापत्र तयार करतील आणि या घोषणापत्रातून संपूर्ण जगाला बदलून टाकणारी नवी वैचारिक शक्ती प्रकट होईल अशी अपेक्षा आहे. आज अमेरिका असो की इंग्लंड अथवा फ्रान्स जगातील सर्व देशात कृत्रिम प्रज्ञा संशोधन मोठ्या दूरदृष्टीने आणि आत्मविश्वासाने चालू आहे. या संशोधनात भारतीय तरुण आघाडीवर आहेत तसेच कृत्रिम प्रज्ञा स्टार्टअपमध्ये सुद्धा भारतीय संशोधकांचा पुढाकार आहे. त्यामुळे घडणारे विचारमंथन हे अस्सल भारतीय असणार आहे आणि ते संपूर्ण जगाला नवी दृष्टी देणार आहे.
परिषदेचे यशसूत्र नियोजनामध्ये
सुमारे 7000 पेक्षा जास्त प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित राहतील आणि शिखर परिषदेस 130 पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी हजेरी लावतील. या परिषदेचे खरे यश हे तिच्या अद्भुत नियोजन आणि गतीवर्धनात आहे. सर्वांसाठी कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान हे घोषवाक्य घेऊन प्रामुख्याने महिला, तरुण आणि नवनवीन स्टार्टअपसाठी विशेष सेवा संधी या निमित्ताने खुल्या होतील. जागतिक आव्हानांना कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान कसे सामोरे जाईल, याबाबतचे विचारमंथन हे खरोखर पथदर्शक असेल. या परिषदेच्या निमित्ताने 300 हून अधिक सहभागी प्रगती मैदानावरील जागतिक प्रदर्शनात सहभागी होतील आणि विविध समस्यांवर आपली सक्षम अशी सोडवणूक करणारी समीकरणे प्रदर्शित करणार आहेत. या प्रदर्शनातून एक अद्भुत असे मार्गदर्शन संपूर्ण भारतीय पिढीवर होणार आहे. या परिषदेद्वारे भारताचे स्वत:चे कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान, सिद्धांत विकसित होतील तसेच पायाभूत सुविधांचा भक्कम असा आधार मजबूत करण्याचा संकल्प सिद्धीस जाऊ शकेल. संपूर्ण जागतिक पातळीवर कृत्रिम प्रज्ञा आधारित लोकप्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाची आणि दमदार पावले टाकण्यासाठी भारत मौलिक भूमिका बजावत आहे. ही भूमिका सतत गतिमान, सतत वर्धिष्णु आणि सतत काळाच्या पुढे कशी राहील यावर भर देण्यात आला आहे.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर