भारताचे सुवर्ण ‘पंचक’ !
? दोन दिवसांत 11 सुवर्णपदकांची भर ? ? शनिवारी पाच सुवर्णांची कमाई
त. भा. प्रतिनिधी
वृत्तसंस्था, नागोया : भारताच्या ‘स्टार’ खेळाडूंनी भरलेल्या क्रिकेट आणि हॉकी संघांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या विजेतेपदांचे रक्षण केले, परंतु 17 वर्षीय तिरंदाज कुमकुम मोहोड आणि गोल्फर प्रणवी उर्स यांनी अनपेक्षितपणे इतिहास रचला. त्यांच्या या कामगिरीमुळे स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात शनिवारी पाच सुवर्णपदकांची भर पडली आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सन्मानजनक चौथे स्थान पटकावले.
मागील स्पर्धेत मिळवलेल्या 106 पदकांची पुनरावृत्ती करण्यात किंवा त्याहून अधिक पदके मिळवण्यात देशाला अपयश आले, परंतु 85 पदकांची ही कामगिरी समाधानकारक आहे. मात्र, विशेषत: नेमबाज आणि बॅडमिंटनपटूंकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. सध्या भारताने 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्यपदके मिळवली आहेत.
या 21 सुवर्णपदकांपैकी 11 पदके शेवटच्या दोन दिवसांत मिळाली आणि अंतिम स्थानांमध्ये अजूनही थोडा बदल होऊ शकतो, कारण आज रविवारी होणाऱ्या काही अश्वारोहण स्पर्धांत भारताचा सहभाग राहणार आहे. परंतु शनिवार हा देशासाठी आनंदोत्सवाचा दिवस ठरला. कारण क्रिकेट आणि हॉकीच्या परिचित खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील क्रिकेट संघाने निशिन येथे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 19 धावांनी विजय मिळवला, तर हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील हॉकीपटूंनीही उत्कृष्ट कामगिरी करत काकामिगाहारा येथे मलेशियाला अंतिम सामन्यात 5-1 ने पराभूत केले. या सुवर्णपदकामुळे लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या 2028 च्या ऑलिम्पिक खेळांसाठी हॉकी संघाची थेट पात्रताही निश्चित झाली आहे.

या दिवशीचा आणखी एक सुवर्णपदक विजेता ठरला अत्यंत कमी प्रसिद्धी मिळवणारा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता अमन सेहरावत. त्याने 57 किलो वजन गटात अव्वल स्थान पटकावून आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली. पण प्रणवी आणि कुमकुम यांचे यश या दिवसाच्या विशेष उल्लेखनीय कथा ठरल्या. कुमकुम वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला तिरंदाज ठरली, तर प्रणवीने गोल्फमध्ये तीच कामगिरी केली. दोघींनीही दबावाखाली प्रचंड संयम दाखवला.
कुमकुम दोन सुवर्ण आणि एका रौप्यपदकासह मायदेशी परतणार आहे आणि आशियाई खेळांतील तिच्या या पदार्पणाला स्वप्नवतच म्हणता येईल. महाराष्ट्राच्या या खेळाडूने ऑलिम्पिक खेळांमध्ये स्थान मिळवले आहे. प्रणवीनेही एकापेक्षा जास्त पदके मिळवली. तिच्या कामगिरीमुळेच भारतीय महिला गोल्फ संघाने रौप्यपदक पटकावले. या दिवशीचे दुसरे रौप्यपदक कुस्तीपटू अंतिम पांघल (महिलांचा 53 किलो गट) हिने पटकावले, तर रिकर्व्ह तिरंदाज नीरज चौहानने आपल्यापेक्षा उच्च मानांकित सहकारी धीरज बोम्मादेवराचा पराभव करून पुऊषांचे वैयक्तिक कांस्यपदक मिळवले.