भारताचा जीडीपी दर 7.5 टक्क्यांपर्यंत पोहोचणार
एनसीएइआरच्या अहवालामधून अंदाज व्यक्त : आर्थिक वर्ष 2024-25
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
2024-25 या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर 7 टक्क्यांच्या वर आणि अगदी 7.5 टक्क्यांच्या जवळपास असू शकतो. नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएइआर) ने बुधवारी जारी केलेल्या मासिक आर्थिक आढाव्यात असे म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता आणि वाढीची गतिशीलता दर्शविणाऱ्या उच्च-वारंवारता निर्देशकांच्या माध्यमातून अंदाज तयार करण्यात आला आहे. एनसीएईआरच्या महासंचालक पूनम गुप्ता म्हणाल्या, ‘पहिल्या तिमाहीत आर्थिक क्रियाकलापांमध्ये झालेली तेजी, गुंतवणूक, वाढ आणि स्थूल आर्थिक स्थिरता आणि सामान्य मान्सूनवर धोरणात्मक लक्ष केंद्रीत केल्यामुळे सदरच्या स्थितीचा अभ्यास करुनच जीडीपी दर जाहीर करण्यात आला आहे.’
भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज 7 टक्क्यांवरून 7.2 टक्के केला आहे. इतर अनेक संस्थांनी वाढीचा अंदाज वाढवला आहे आणि सर्व वाढीच्या अंदाजांची एकूण सरासरी 6.9 टक्के आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि इतर रेटिंग एजन्सींनी 2024 साठी जागतिक वाढीचा अंदाज वाढवला आहे. 2024 साठी वाढीचा अंदाज 3.2 ते 2.6 टक्के दरम्यान आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत गुप्ता म्हणाले की, चलनवाढ वरच्या पातळीवर पोहोचल्याचे दिसून येत आहे आणि आणखी आर्थिक परिस्थिती खाली घसरण्याची शक्यता नाही. गुप्ता म्हणाले की, मे महिन्यात किरकोळ महागाई 4.7 टक्क्यांच्या 12 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे.