भारताचा जीडीपी दर 7.2 टक्के राहणार : बार्कलेजचा अंदाज
चौथ्या तिमाहीकरीताचा अंदाज : कृषी उत्पादन चांगले
वृत्तसंस्था/ मुंबई
आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी दर 7.2 टक्के इतका राहू शकतो, असा अंदाज बार्कलेज इंडिया यांनी व्यक्त केला आहे. कृषी क्षेत्रातील प्रगती त्याचप्रमाणे थेट निव्वळ कराच्या उत्पन्नामध्ये झालेली वाढ या पार्श्वभूमीवर पाहता भारताचा जीडीपी दर वरील प्रमाणे होऊ शकतो. वर्षाच्या आधारावर पाहता कृषी क्षेत्राचा विकास हा उत्तरोत्तर वाढीच्या दिशेने पाहायला मिळतो आहे. उत्तम पिक उत्पादनामुळे कृषी क्षेत्राला विकासाची संधी प्राप्त झाली आहे.
काय म्हणाल्या मुख्य अर्थतज्ञ
यंदा गव्हाचेही विक्रमी उत्पादन होणार असल्याचे बोलले जात आहे. आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 5.6 टक्के इतका असणारा कृषी क्षेत्राचा विकास दर चौथ्या तिमाहित 5.8 टक्के राहू शकतो असेही बार्कलेजच्या मुख्य अर्थतज्ञ आस्था गुडवाणी यांनी म्हटले आहे.
अन्नधान्य उत्पादनही वाढले
याच दरम्यान देशाचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सुद्धा भारताच्या अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीमध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये अन्नधान्याचे उत्पादन 106 लाख टनाने वाढून 1663 लाख टनांवर पोहोचले आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये अन्नधान्य उत्पादनामध्ये 6.8 टक्के वाढ दर्शविली गेली आहे.