भारताचा जीडीपी दर 6.5 टक्केपेक्षा अधिक राहणार : मुडीजचा अंदाज
वृत्तसंस्था/मुंबई
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा जीडीपी दर 6.5 टक्केपेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज रेटींग एजन्सी मुडीज यांनी व्यक्त केला आहे. संस्थेच्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.3 टक्के दराने विकसीत होणार आहे. सरकारी उच्च भांडवल खर्च आणि करामध्ये कपात त्याचप्रमाणे व्याजदरामध्ये कपात करण्याच्या धोरणामुळे भारताचा विकासदर चांगल्या स्थितीत दिसून येणार आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था अधिक गतीने पुढे सरकताना दिसणार आहे, असेही मुडीजने म्हटले आहे. बँकींग क्षेत्रामध्ये स्थिर स्थिती राहणार असून पुढच्या आर्थिक वर्षांमध्ये भारतीय बँका कांहीशी सुधारणात्मक स्थिती प्राप्त करू शकणार आहेत. गॅरंटीशिवाय दिले जाणारे कर्ज, सूक्ष्म आर्थिक कर्ज आणि छोट्या व्यवसायांसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या स्थितीमध्ये कांहीसा दबाव पाहायला मिळणार आहे.
स्थिती सुधारणार
2024 च्या मध्यावर अस्थायी स्वरूपाच्या नरमाईनंतर आता भारताची आर्थिक स्थिती गतीने सुधारत जाईल, अशीही आशा मुडीज यांनी व्यक्त केली आहे. जागतिक स्तरावर मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये भारताची कामगिरी अधिक उठून दिसणार आहे, असेही मुडीजने म्हटले आहे.