भारताची इंग्लंडविरुद्ध आज चौथी टी-20 लढत
कामगिरीत सुधारणा करून आव्हान जिवंत ठेवण्याचे भारतासमोर आव्हान, सॅमसनला सामावून घेण्याची शक्यता
वृत्तसंस्था, ब्रिस्टल
संघनिवडीबाबतच्या पेचप्रसंगांचा सामना करत आणि प्रतिकूल परिस्थितीत जुळवून घेताना संघर्ष करत असलेल्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर गुरुवारी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात मोठे आव्हान असेल. रात्री 10 वाजता सामना सुरू होईल.
संघनिवडीबाबतचा सर्वात मोठा पेच संजू सॅमसनच्या बाबतीत आहे. त्याला 15 वर्षीय आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यातून वगळण्यात आले होते. या किशोरवयीन खेळाडूची कामगिरी आतापर्यंत संघातील इर खेळाडूंपेक्षा वाईट किंवा खूप चांगली अशी झालेली नाही. संघ सध्या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर असल्याने, भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सॅमसनच्या पुनरागमनाची शक्यता नाकारलेली नाही. अवघ्या चार महिन्यांत सॅमसनच्या कारकिर्दीत प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. ती पुन्हा एकदा सुरुवातीच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे.
पुनरागमन मालिकेत कर्णधारपद सोपवल्यानंतर पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या कर्णधार अय्यरला दोष देणे अन्यायकारक ठरेल. मात्र गंभीर यांच्या नेतृत्वाखालील प्रशिक्षक मंडळ आणि अजित आगरकर यांची निवड समिती यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. आणखी एका मालिका पराभावाचा नामुष्कीजनक प्रसंग ते टाळू शकतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. संघ व्यवस्थापनाने घेतलेले रणनीतिक निर्णय चाहत्यांनाही फारसे पसंत पडलेले नाहीत. बुधवारी झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 125 धावांनी दारुण पराभव पत्करल्यानंतर, गंभीर यांच्या नेतृत्वाखालील संघ जेंव्हा बसकडे निघाला तेंव्हा ट्रेंट ब्रिज स्टेडियमबाहेर आम्हाला संजू हवा आहे, अशा घोषणा घुमत होत्या. ऐतिहासिक विजयानंतर लगेचच टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादवला बाजूला सारल्यामुळे प्रचंड टीका झाली होती. आता त्याच स्पर्धेतील नायक असलेल्या सॅमसनकडे दुर्लक्ष करण्याच्या निर्णयामुळे लोकांचा रोष पुन्हा एकदा वाढला आहे. ट्रेंट ब्रिजवरील धक्कादायक पराभवाने संघातील त्रुटी आणि व्यवस्थापनाकडे असलेल्या स्पष्ट दृष्टिकोनाचा अभाव उघड केला आहे. जोफ्रा आर्चर आणि जोश टंग यांच्या वेगवान आणि आक्रमक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. या दोघांनी मिळून सात बळी घेत (ज्यात पहिल्या पाच फलंदाजांचा समावेश होता) भारताचा धुव्वा उडवला.
तिलकवर टांगती तलवार
आता सलामीच्या जोडीला धक्का न लावता सॅमसनला संघात सामावून घेण्यासाठी आणि त्याद्वारे त्याला कोणत्याही दबावाशिवाय आपली शैलीदार फलंदाजी करण्याची संधी देण्यासाठी मधल्या फळीत फेरबदल करावे लागू शकतात. यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनचे स्थान सुरक्षित राहण्याची शक्यता आहे. कारण संघ व्यवस्थापनाचा त्याच्या यष्टिरक्षणावर आणि फलंदाजीच्या कौशल्यावर विश्वास आहे. मात्र उपकर्णधार तिलक वर्माचे स्थान टिकेच्या किंवा बारकाईने तपासणीच्या कक्षेत येऊ शकते. सामन्याचा शेवट प्रभावीपणे करण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जाणारा हा मुंबई इंडियन्सचा फलंदाज आपल्या सहकाऱ्यांप्रमाणेच संघर्ष करताना दिसत आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात एका धावेने झालेल्या पराभवात व्यर्थ ठरलेल्या जिद्दी 55 धावांच्या खेळीचा अपवाद वगळता वर्माची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. इंग्लंडमधील सामन्यांमध्ये त्याला चांगली सुरुवात मिळवूनही त्याचे मोठ्या धावसंख्येत रुपांतर करता आले नाही. (धावा : 13, 24 नाबाद आणि 3). फलंदाजीच्या क्रमात बदल करून आणि सॅमसनला संघात आणून भारत आपली घसरलेली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
बुधवारी झालेल्या सामन्यात आणखी एक गोंधळात टाकणारी रणनीतिक चूक पाहायला मिळाली. भारताचा डाव अवघ्या 76 धावांत आटोपला असताना धावसंख्येचा पाठलाग करताना फिनिशर म्हणून असलेल्या शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाची फलंदाजीसाठी बढती करण्यात आली. फलंदाजीमध्ये जशी मोठ्या सुधारणेची गरज आहे, तशीच स्थिती गोलंदाजी विभागातही विशेषत: फिरकी गोलंदाजांच्या बाबतीत आहे. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवार्तीची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली असून संपूर्ण मालिकेत सात षटके टाकून त्याला केवळ एकच बळी मिळवता आला आहे.
याउलट हॅरी ब्रुकच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघासमोर अशा कोणत्याही समस्या नाहीत. स्फोटक सलामीवीर फिल सॉल्टने 44 चेंडूत 70 धावांची खेळी करत फॉर्ममध्ये पुनरागमन केल्यामुळे इंग्लंडचा संघ आत्मविश्वासाने या सामन्याकडे पाहत आहे. इंग्लंडसाठी सर्वात जमेची बाजू म्हणजे आर्चर आणि टंग ही वेगवान गोलंदाजांची जोडी. या दोघांनी न्यू बॉलसह प्रभावी गोलंदाजी केली असून ते वेगवान मारा आणि उसळी घेणाऱ्या चेंडूंचा प्रभावी वापर करत आहेत. गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगले जुळवून घेतल्यानतंर टंगने आपल्या वरिष्ठ जोडीदारासोबत टी-20 सारख्या सर्वात छोट्या प्रकारातही आपला उत्कृष्ट फॉर्म कायम राखला आहे. मालिकेतील अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान भारतासमोर असताना इंग्लंडचे वेगवान गोलंदाज गुरुवारी आव्हानाची तीव्रता वाढवण्याचा आणि शनिवारी साऊदम्प्टनमध्ये होणाऱ्या अंतिम टी-20 सामन्यापूर्वीच मालिका जिंकण्याचा प्रयत्न करतील.
भारत संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशान, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, प्रसीद कृष्णा, सूर्यवंशी शेडगे, सूर्यवंशी.
इंग्लंड संघ: हॅरी ब्रुक (कर्णधार), फिल सॉल्ट, जोस बटलर, टॉम बँटन, जेकब बेथेल, सॅम कुरन, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, आदिल रशीद, जोश टंग, जॉर्डन कॉक्स, सोनी बेकर, ल्यूक वूड, साकिब महमूद, रेहान अहमद, जेम्स कोल्स.
सामन्याची वेळ : रात्री 10 वा.
थेट प्रक्षेपण : सोनी नेटवर्क, जिओ हॉटस्टार