For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रो लीग हॉकीमध्ये भारताचा पहिला विजय

06:36 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रो लीग हॉकीमध्ये भारताचा पहिला विजय
Advertisement

पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियावर 3-1 गोलफरकाने मात

Advertisement

वृत्तसंस्था/ होबार्ट, ऑस्ट्रेलिया

एफआयएच प्रो लीगमधील पराभवाची मालिका खंडित करताना भारतीय हॉकी संघाने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या यजमान ऑस्ट्रेलियाचा शूटआऊटमध्ये 3-1 असा पराभव करीत पहिला विजय नोंदवला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत राहिले होते.

Advertisement

पहिल्या तीन सत्रात दोन्ही संघांकडून तोडीस तोड खेळ झाल्याने एकही गोल होऊ शकला नव्हता. पण होबार्ट टप्प्यातील शेवटच्या सामन्यात विजय मिळविल्याने  भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलेला असणार आहे. 49 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने पहिला गोल नोंदवून आघाडी घेतली. जेरेमी हेवर्डने पेनल्टी कॉर्नरवर हा गोल नोंदवला. पण त्यांचा हा आनंद फार वेळ टिकला नाही. शिलानंद लाक्राने 51 व्या मिनिटाला शानदार मैदानी गोल नोंदवत भारताला बरोबरी साधून दिली. यानंतर दोन्ही संघांनी आघाडी घेत विजयी गोल नोंदवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण दोन्ही संघांना गोल नोंदवण्यात अपयशच आल्याने सामना शूटआऊटमध्ये गेला. यामध्ये भारताने बाजी मारत 2 गुण मिळविले तर ऑस्ट्रेलियाला एक गुण मिळाला.

शूटआऊटमध्ये लाक्रा, मनिंदर सिंग, विष्णुकांत सिंग यांनी भारताचे गोल केले तर ऑस्ट्रेलियाचा एकमेव गोल हेवर्डने नोंदवला. भारतीय गोलरक्षक शशीकुमार होन्नेनाहळ्ळीने अप्रतिक गोलरक्षण करीत ऑस्ट्रेलियाचे तीन गोल थोपवल्याने भारताला बोनस गुण मिळाला.

पहिल्या तीन सत्रांत गोलफलक कोराच राहिल्यानंतर शेवटच्या सत्रात दोन्ही संघांना गोल नोंदवण्यात यश आले. 49 व्या मिनिटाला कर्णधार हेवर्डने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये यशस्वी रूपांतर केले. पण भारताने लगेचच 51 व्या मिनिटाला बरोबरी साधली. या गोलसाठी हार्दिक सिंगने चाल रचली. त्याने आगेकूच करीत उजव्या बगलेत असणाऱ्या अभिषेककडे चेंडू पुरविला. अभिषेकने तो पुढे नेला आणि पूवण्णा चंदुरा बॉबीकडे अचूक पास दिला. त्याने तो गोलपोस्टच्या अगदी जवळ असणाऱ्या शिलानंद लाक्राकडे दिला आणि लाक्राने शांतपणे चेंडू गोलपोस्टमध्ये मारला. यानंतर भारताने दबाव वाढवत अनेक पेनल्टी कॉर्नर्स आणि अखेरच्या क्षणांत काही संधीही निर्माण केल्या. पण त्यांच्यासह यजमानांनाही यश मिळाले नाही.

राऊरकेला येथे झालेल्या प्रो लीग टप्प्यात भारताने चारही सामने गमविले होते. स्पेनकडून 0-2, ऑस्ट्रेलियाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-5, परतीच्या सामन्यात स्पेनकडून शूटआऊटमध्ये 3-4 असा तर होबार्ट टप्प्यातील पहिल्या सामन्यातही पराभव स्वीकारावा लागला होता. नऊ संघांच्या या स्पर्धेत भारताने 8 सामन्यांतून 4 गुण घेत आठवे स्थान मिळविले आहे. भारताचे पुढील सामने रॉटरडॅम टप्प्यात नेदरलँड्स व जर्मनीविरुद्ध 21 जूनपासून होणार आहेत.

Advertisement
Tags :

.