2028 पर्यंत भारताचे पहिले अंतराळ मॉड्यूल स्थापणार
इस्रोची माहिती : भारत मंडपम येथे विविध वस्तूंचे प्रदर्शन, सादरीकरण : राष्ट्रीय अंतराळ दिनाचे औचित्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भारत मंडपम येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात 2028 मध्ये पहिले अंतराळ मॉड्यूल स्थापन केले जाणार असल्याचे इस्रोने जाहीर केले. तसेच 2035 पर्यंत अंतराळात बीएएसचे पाच मॉड्यूल नेण्याचे इस्रोचे उद्दिष्ट असून या माध्यमातून तेथे एक पूर्ण अवकाश प्रयोगशाळा बनवण्याचा विचार आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून अवकाशातील विविध निरीक्षणे नोंदवण्यात येणार आहेत. ही कामगिरी अवकाश संशोधनात भारताचे स्थान अधिक उंचावणार आहे.
भारत मंडपम येथे दोन दिवस चालणाऱ्या समारंभात प्रथमच भारतीय अंतराळ स्थानकाचे (बीएएस) मॉडेल जगासमोर सादर करण्यात आले. ‘बीएएस’ हे भारताचे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित अंतराळ स्थानक असून ते पृथ्वीपासून 450 किलोमीटर अंतरावर लो अर्थ ऑर्बिटमध्ये (एलईओ)s स्थापित केले जाईल. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रोने आपल्या आगामी मोहिमांची माहिती दिली आहे. तसेच भारतीय अंतराळ स्थानक (बीएएस) कसे दिसेल याची पहिली झलक देखील दाखवली आहे. इस्रोने शनिवारी दिल्लीत ‘बीएएस’च्या पहिल्या मॉड्यूलचे मॉडेल सादर केले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत, त्याचे पहिले मॉड्यूल 2028 मध्ये लाँच केले जाईल तर अंतराळ स्थानकाचा संपूर्ण भाग 2035 पर्यंत ऑपरेशनसाठी तयार होईल. भारताचे हे अंतराळ स्थानक स्वदेशी संशोधनाचे केंद्र बनवण्याचा निर्धार इस्रोने व्यक्त केला आहे.
अंतराळ कार्यक्रमात भारताची मोठी झेप
‘बीएएस’ हे अंतराळ स्थानक सूक्ष्म-गुरुत्वाकर्षण अभ्यासासह दीर्घकालीन मानवी अंतराळ मोहिमांसाठी तंत्रज्ञानाची चाचणी करेल. अंतराळात स्वत:ची कक्षीय प्रयोगशाळा स्थापन करण्याचा भारताचा प्रवास त्याच्या अंतराळ कार्यक्रमातील एक मोठी झेप आहे. ही कामगिरी भारताला अंतराळ क्षेत्रातील आघाडीच्या देशांपैकी एक बनवणार आहे.
भारत आपली चांद्रयान-4 मोहीमही राबविणार आहे. भारत 2040 मध्ये चंद्रावर पाऊल ठेवेल असे इस्रो अध्यक्षांनी म्हटले आहे. या यशानंतर भारत चंद्रावर मानव पाठवणाऱ्या देशांच्या एलिट क्लबमध्ये सामील होईल. इस्रो प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. शुभांशू शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) पाठवल्याबद्दलचे श्रेय इस्रो अध्यक्षांनी पंतप्रधानांच दिले आहे.
भारतीय अंतराळ स्थानकाची वैशिष्ट्यो...
► भारतीय अंतराळ स्थानकावर शास्त्रज्ञ मानवी आरोग्यावर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा परिणाम अभ्यासू शकतील.
► हे स्थानक दीर्घकालीन मानवी उपस्थितीसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यास मदत करेल.
► वैज्ञानिक संशोधन, जीवन विज्ञान, औषध आणि आंतरग्रहीय मोहिमांसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनेल.
► भारत त्यात अंतराळ पर्यटन सुविधा देखील विकसित करेल. याचा लाभ आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी होईल.
► वैज्ञानिक शोधासह तरुणांना अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे प्रेरित करण्यात मोठी भूमिका बजावेल.