भारताची झुंज अपयशी, ऑस्ट्रेलियन महिला उपांत्य फेरीत
उपांत्य फेरीची आशा धुसर : पाक-न्यूझीलंड सामन्यावर पुढील भवितव्य
वृत्तसंस्था/ शारजाह
आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह अपराजित राहत ऑस्ट्रेलियन संघाने उपांत्य फेरीतील स्थान पक्के पेले आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑसी संघाने 151 धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला 9 बाद 142 धावापर्यंत मजल मारता आली. टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठायची असेल तर पाकिस्तानला न्यूझीलंड संघाचा पराभव करावा लागेल. 32 धावांत 2 बळी टिपणाऱ्या सोफी मॉलिन्यूला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
प्रारंभी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कांगारुंनी 7 बाद 151 धावा केल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून नियमित कर्णधार अॅलिसा हिली खेळली नाही, त्यामुळे ताहिला मॅकग्राने नेतृत्व केले. मॅकग्राने या सामन्यात 32 तर एलिस पेरीनेही 32 धावांचे योगदान दिले. संघाकडून सर्वाधिक धावा ग्रेस हॅरिसने केल्या, तिने 40 धावांची खेळी केली. इतर खेळाडूंनी मात्र निराशा केली. भारताकडून गोलंदाजीत रेणुका ठाकूर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
टीम इंडियाचा विजयासाठी संघर्ष
152 धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. टीम इंडियाची सलामीची फलंदाज शेफाली वर्मा 20 धावा करून बाद झाली. ती बाद झाल्यानंतर स्मृतीही 6 धावांवर बाद झाली. जेमिमा चांगली फटकेबाजी करत होती, पण तीही मोठा फटका खेळताना 16 धावा करून बाद झाली. जेमिमा बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती यांच्यात 63 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. पण या दोघी भारताला विजयापर्यंत घेऊन जावू शकल्या नाहीत. दीप्तीही 29 धावा करून बाद झाली. दीप्ती बाद झाल्यानंतर हरमनप्रीतला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. ठराविक अंतराने विकेट गेल्याने टीम इंडियाला निर्धारित 20 षटकांत केवळ 9 बाद 142 धावा करता आल्या. सदरलँड व सोफी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या तर तीन फलंदाज धावचीत झाल्या.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 8 बाद 151 (ग्रेस हॅरिस 40, मॅकग्रा 32, एलिस पेरी 32, रेणुका संग व दीप्ती शर्मा प्रत्येकी दोन बळी)
भारत 20 षटकांत 9 बाद 142 (शेफाली वर्मा 20, हरमनप्रीत कौर नाबाद 54, दीप्ती शर्मा 29)
उपांत्य फेरीच्या आशा धुसर
आता भारताला उपांत्य फेरीत जाण्यासाठी न्यूझीलंड वि पाकिस्तान सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठायची असेल तर पाकिस्तानला न्यूझीलंड संघाचा पराभव करावा लागेल. भारताचा नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा सरस असल्याने ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतरही भारतीय संघ 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा नेट रनरेट आता धन 0.322 असा आहे. तर न्यूझीलंड संघाचा नेट रनरेट धन 0.282 आहे. जर न्यूझीलंड संघाने पाकिस्तानचा पराभव केला तर न्यूझीलंड उपांत्य फेरीत दाखल होईल. पाकची या स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी पाहिल्यास न्यूझीलंडला ते हरवू शकतील असे वाटत नाही. असे असले तरी क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. गट ब मध्येही इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व विंडीज यांच्यात उपांत्य फेरी गाठण्यासाठी चुरस लागली आहे. सोमवारी होणाऱ्या सामन्यांच्या निकालानंतर या गटातून बाद फेरी गाठणारे दोन संघ निश्चित होतील.