भारताची निर्यात घटली, व्यापारी तूट उच्चांकावर
निर्यातीचा वेग आठ महिन्यांतील सर्वात कमी : 33.98 अब्ज डॉलर्सची झाली निर्यात : पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात घसरली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगभरातील घटती मागणी आणि भू-राजकीय आव्हानांमुळे निर्यात मंदावली आहे. जुलैमध्ये भारतातून निर्यात 1.48 टक्क्यांनी घसरून 33.98 अब्ज डॉलरची झाली आहे. निर्यातीचा वेग गेल्या आठ महिन्यांतील सर्वात कमी होता.
वाणिज्य विभागाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार जुलैमध्ये आयात 7.46 टक्क्यांनी वाढून 57.48 अब्ज डॉलरची झाली आहे. यामुळे व्यापारी तूट 23.5 अब्ज डॉलरची झाली. गेल्या वर्षी जुलैमध्ये देशाची व्यापारी तूट 19 अब्ज डॉलर इतकी राहिली होती.
वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सांगितले की, जुलैमध्ये वस्तूंच्या निर्यातीत 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. ‘पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत,’ बर्थवाल म्हणाले. पहिले कारण म्हणजे किमतीतील घसरण आणि दुसरे कारण म्हणजे काही उत्पादनांची मागणी कमी होणे. तिसरे कारण म्हणजे देशातील पेट्रोलियम उत्पादनांचा वाढता वापर होय.
एकूण निर्यातीत पेट्रोलियम उत्पादनांचा वाटा 15 टक्क्यांहून अधिक आहे. जुलैमध्ये पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात 22 टक्क्यांनी घसरून 5.23 अब्ज डॉलरची झाली. कच्चे तेल आणि पेट्रोलियमची आयात 17.4 टक्क्यांनी वाढून 13.87 अब्ज डॉलरची झाली.
तेल व उत्पादनांतील वाढीचा परिणाम
आयसीआरएच्या मुख्य अर्थतज्ञ अदिती नायर यांनी सांगितले की, तेल आणि इतर उत्पादनांच्या बाबतीत वाढत्या तूटमुळे जुलै 2024 मधील वस्तू व्यापारी तूट जुलै 2023 च्या तुलनेत वाढली आहे. ‘तेल आयातीवरील वाढीव खर्च हे प्रतिबिंबित करतो की अधिक तेल मागवण्यात आले होते, जगभरातील त्याच्या किमती वाढल्या आहेत आणि सवलतीही कमी होत आहेत,’ असेही त्या म्हणाल्या.
कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांव्यतिरिक्त, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात (11.54 टक्के), नॉन-फेरस धातू (17.4 टक्के), लोह आणि पोलाद (5.22 टक्के), प्लास्टिक सामग्री (6.67 टक्के) आणि सेंद्रिय आणि अजैविक रसायने (8.1 टक्के) जास्त होती. जुलैमध्ये सोन्याची आयात 10.65 टक्क्यांनी घसरून 3.13 अब्ज डॉलरची झाली. नायर म्हणाल्या की, केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सीमाशुल्कात कपात झाल्यामुळे पुढील काही महिन्यांत सोन्याची आयात वाढू शकते. एप्रिल ते जुलै या कालावधीत, दरमहा केवळ त्र्3 अब्ज ते त्र्3.4 अब्ज किमतीचे सोने आयात केले गेले.
निर्यातदार संघटना फिओचे अध्यक्ष अश्विनी कुमार म्हणाले की, आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे आणि कच्चे तेल, वस्तू आणि धातूंच्या किमतीत मोठी घसरण यामुळे निर्यातीत घट झाली आहे. ‘काही निर्यातदार स्वदेशी बाजारपेठेकडे वळले आहेत कारण आंतरराष्ट्रीय मालवाहतूक शुल्कात प्रचंड वाढ झाल्यामुळे निर्यातीतील नफा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.