भारतातील मनोरंजन क्रांती आणि प्रतिभेचा सुवर्ण चाफा
कधी कधी एकाच दिवशी दोन चांगले शुभ संदेश येतात. पहिला म्हणजे मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी केंद्र सरकारची माफी मागितली आणि तिकडे दुसरी बातमी म्हणजे नेटफ्लिक्स या कंपनीने भारताशी मनोरंजन क्षेत्रात मोठी भागीदारी करण्याचा निर्णय घोषित केला. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्यासमवेत केलेल्या चर्चेनंतर हा शुभ संदेश समोर आला आहे. नवी दिल्लीत नेटफ्लिक्स सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस यांनी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची भेट घेऊन भारतातील सर्जनशील प्रतिभाशक्ती आणि माध्यमांच्या मनोरंजन क्षमतेवर विश्वास ठेवून फलदायी अशी चर्चा केली.
उभयतांनी केलेल्या चर्चेमध्ये भारतात प्रतिभाशाली सोनचाफ्याची ताकद असलेल्या क्षमतांचा अंदाज घेऊन भारताला आशय निर्मितीच्या क्षेत्रात जागतिक केंद्र म्हणजे हब बनवण्याबद्दल विचार विनिमय केला. भारताच्या मनोरंजन क्रांतीमधील ही एक सकारात्मक वळण देणारी घटना आहे. त्यामुळे 19 टक्केपेक्षा अधिक वेग असलेल्या भारतातील माध्यम व मनोरंजन क्षेत्राला नवी संजीवनी लाभणार आहे. शिवाय देशातील लक्षावधी युवकांना एक नवे रोजगार दालन खुले होत आहे, ही गोष्ट प्रामुख्याने अधोरेखित केली पाहिजे. 2021 ते 2024 यादरम्यान भारतामध्ये मिळविलेल्या नफ्यापैकी दोन दशलक्ष बिलियन डॉलर्स एवढी गुंतवणूक कथाकथन प्रशिक्षणासाठी नेटफ्लिक्स भारतामध्ये करणार आहे. कदाचित गुंतवणुकीचा हा आकडा आणखी वाढू शकतो परंतु हा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतामध्ये आतापर्यंत नेटफ्लिक्सने 3000 कोटी म्हणजे 400 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक आशय निर्मिती व डिजिटल कंटेंट तसेच मालिका व कथानक क्षेत्रात केली आहे. पुढील दहा वर्षात ही गुंतवणूक आणखी दुप्पट होऊ शकते व त्यातून लक्षावधी तरुणांना रोजगार प्राप्त होऊ शकतात.
कथाकथनाची समृद्ध परंपरा
नेटफ्लिक्स भारतामध्ये कथाकथन क्षेत्रात प्रशिक्षणासाठी पुढाकार घेणार आहे. नातवाला नवनवीन गोष्टी सांगणाऱ्या आजीबाईंच्या कथांचे दालन प्रत्येक पिढीने समृद्ध केले आहे. शिवाय रामायण महाभारतामधील कथा असोत की पंचतंत्रातील बोधकथा असोत प्रत्येक कथेचा एक मौलिक संदेश पिढ्यानपिढ्या अखंड स्फूर्ती देत आहे. त्यामुळे या कथा अजरामर झाल्या आहेत. अनंत आणि अगणित असे हे कथा साहित्य शतकाच्या पलीकडे डोकावणारे असून त्यामध्ये कथा कादंबऱ्या नाटक आणि चित्रपटांची अगणित बिजे रोवली गेली आहेत.
भारतातील प्रत्येक खेडे म्हणजे एक स्वतंत्र कथा
राज कपूर, गुरुदत्त आणि सत्यजित रे यांनी चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत रुपेरी पडद्यावर आणलेल्या कथा या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या तसेच रामानंद सागर यांचे रामायण आणि बी. आर. चोप्रा यांनी निर्माण केलेले महाभारत या मालिका सुद्धा अजरामर ठरल्या. रामायण आणि महाभारतावर आधारित कितीतरी कथांनी, कादंबऱ्यांनी नाटकांचे रूप घेतले, ही शतकानूशतकाची परंपरा म्हणजे मनोरंजनाचा अमूल्य खजाना होय. या सर्व माध्यमातून भारतीय साहित्य नाट्या, कादंबरी, खंडकाव्य यांच्या रूपाने पुन्हा प्रत्ययाचा नित्य आनंद देणारा अजरामर असा भारतीयांच्या अक्षर आणि अभिजात अशा अलौकिक प्रतिभेचा सुवर्ण चाफा नित्य नव्याने दरवळतो आहे.
चित्रपटांचे समाजशास्त्र
भारतीय चित्रपट उद्योगाने आता अमेरिकेलाही मागे टाकले आहे. भारतामध्ये दरवर्षी निर्माण होणाऱ्या चित्रपटांची संख्या पंधराशे ते दोन हजार एवढी असून अमेरिकेत मात्र केवळ 600 ते 800 चित्रपट निर्माण होतात. हिंदी प्रमाणेच तेलगु, मल्याळम, कानडी व मराठी व बंगाली चित्रपटांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. तेलगू भाषेतील जय भीम व मल्याळम भाषेत कांतारा या चित्रपटांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. निर्माते नीतीश तिवारी व त्यांचे सहकारी दक्षिणात्य नट यश यांनी आता नव्या रामायण या महत्त्वाकांक्षी बहुभाषिक चित्रपटांची निर्मिती आरंभिली आहे. हा चित्रपट मागचे सर्व रेकॉर्ड मोडून मनोरंजन क्षेत्रात एक नवा मापदंड निर्माण करण्याच्या तयारीत आहे. भारतामधील तरुण प्रतिभाशाली कलावंतांनी जर कालिदासाच्या मेघदूत, अभिज्ञान शाकुंतल, मालविकाग्नीमित्र यासारख्या नाटकांचे रूपांतर चित्रवाणी मालिका किंवा चित्रपटाच्या माध्यमातून केले तर भारताकडे जगातील डॉलर्सचा ओघ वळू शकतो. त्या दृष्टीने पाहता मनोरंजन उद्योग हा भारताच्या भावी आर्थिक क्रांतीचा एक भक्कम आधारस्तंभ बनणार आहे.
नव्या भागीदारीचा संकल्प
नेटफ्लिक्स या आंतरराष्ट्रीय संस्थेबरोबर भारताची ही नवी भागीदारी ही योजना स्थानिक प्रतिभाशाली व्यक्ती व संस्थांना नवसंजीवनी देणार आहे. या संस्थात्मक भागीदारीच्या माध्यमातून कलावंतांना व निर्मात्यांना प्रगत कौशल्य आणि अद्ययावत प्रशिक्षण सुविधा निर्माण करून देण्यात येईल. त्यामुळे प्रतिभाशाली निर्मात्यांना नवी संधी मिळेल आणि विशेषत: भारतातील कलात्मक सृजनशील युवकांच्या पुढील पिढीला नव्याने सक्रिय समर्थन प्राप्त होईल. या भागीदारीचा संकल्प दुहेरी स्वरूपाचा असणार आहे. नेटफ्लिक्स भारतातील मनोरंजन उद्योगाला आवश्यक मनुष्यबळ, विकासाच्या सुवर्णसंधी प्राप्त करून देईल आणि भारतीय उपक्रमशीलता अधिक सक्रिय करण्याच्या दृष्टीने भारतीय प्रशासकीय यंत्रणा सकारात्मकदृष्टीने पावले टाकू शकेल. मुंबई येथे गतवर्षी स्थापन करण्यात आलेली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी कलात्मक तंत्रज्ञानाला गती देणारी ही अशा प्रकारची जगातील पहिलीच संस्था ठरली आहे. या संस्थेचे कार्य आणि नेटफ्लिक्सचे सहकार्य यामुळे आता मनोरंजन उद्योगातील नव्या क्षमतांचे संवर्धन होऊ शकेल आणि त्यातून भारताकडे चित्रपट, मालिका तसेच वेब सिरीज आणि कथाकथनावर आधारित श्रृजनशील आशय निर्मितीला एक नवे समर्थन प्राप्त होईल.
हा तर त्रिवेणी संगम
नेटफ्लिक्सचे प्रशिक्षण भारतातील सक्रिय सर्जनशील प्रतिभाशक्ती आणि वैश्विक बाजारपेठेतील नव्या गरजांची परिपूर्ती या तीनही घटकांचा समन्वय साधून हा त्रिवेणी संगम जगाच्या मनोरंजन क्रांतीला नवी दिशा देणार आहे. यांच्या भारतातील स्थापना आणि कार्यवाहीला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. नेटफ्लिक्स 6 जानेवारी 2016 पासून भारतात कार्यरत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या नेटफ्लिक्स एंटरटेनमेंट सर्विस इंडिया एलएलपी या संस्थेने अंदाजे रुपये 3769 कोटी एवढा वार्षिक उलाढालीचा विक्रम केला आहे. गतवर्षाच्या तुलनेत या कंपनीला 32 टक्के अधिक नफा झाला आहे. मागील दहा वर्षात नेटफ्लिक्सच्या उलाढालित लक्षणीय वाढ झाली असून एकूण निव्वळ नफा हा 2025-26 मध्ये 84.80 कोटी एवढा झाला आहे
भारतामध्ये नेटफ्लिक्स अंदाजे 16 ते 20 दशलक्ष सशुल्क ग्राहक सदस्यासह स्पर्धेत पुढे आहे. त्यामुळे त्याला 975 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त महसूल प्राप्त होतो. या प्लॅटफॉर्मने आपल्या स्थानिक आशय निर्मिती धोरणाला गती दिल्यामुळे त्याची स्वीकृती वाढली आहे. 200 पेक्षा अधिक मूळ भारतीय भाषेतील कार्यक्रम निर्माण करून त्यांनी विक्रम केला आहे. दोन अब्ज
डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक करून आणि सेक्रेड गेम्स तसेच दिल्ली क्राईम ही मालिका तसेच संजय लीला भन्साळी यांनी निर्माण केलेल्या हिरा मंडी यासारख्या लोकप्रियतेचे यशोशिखर गाठणाऱ्या मालिकांमुळे नेटफ्लिक्सने रसिकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील इतर स्पर्धकांपेक्षा पुढे वाटचाल करत आहे. सुरुवातीच्या सदस्य नोंदणीचे दर मागणीप्रमाणे कमी करून लवचिक धोरण स्वीकारल्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. माध्यम बाजारपेठेतील जिओ हॉटस्टार आणि अमेझॉन प्राईम व्हिडिओ यांच्याशी टक्कर देऊन नेटफ्लिक्सने आपले पाय मजबूत केले आहेत तसेच उच्च मूल्य साधनेमुळे ही कंपनी चांगलीच पुढे झेपावत आहे.
(पूर्वार्ध)
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर