For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतातील मनोरंजन क्रांती आणि प्रतिभेचा सुवर्ण चाफा

06:52 AM Aug 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतातील मनोरंजन क्रांती आणि प्रतिभेचा सुवर्ण चाफा
Advertisement

भारताला कलात्मक प्रतिभाशक्तीचे केंद्र म्हणजे हब बनविण्याच्या दृष्टीने आणि सर्जनशील प्रतिभाशक्तीला नवा उजाळा देण्यासाठी हा करार कलाक्षेत्रात नवचैतन्य आणू शकेल. जागतिक स्तरावर समग्रपणे दर्जेदार आशय निर्मिती प्रक्रियेला चालना देण्यासाठी भारतातील प्रतिभावान लेखक, कवी, चित्रकार निर्माते यासारख्या श्रेष्ठ मनुष्यबळाला दिशा देण्यासाठी नेटफ्लिक्स या कलात्मक प्रक्रियेत भागीदार म्हणून उदयास येत आहे. भारतातील मनोरंजन उद्योग आता एक नवी झेप घेण्याच्या तयारीत आहे. या उद्योगातील वेगवान वाढीच्या संधी अद्भुत आहेत आणि त्या गगनाला गवसणी घालणाऱ्या आहेत.

Advertisement

(उत्तरार्ध)

उच्च दर्जा आणि कलात्मक प्रतिभाशक्ती यामुळे नेटफ्लिक्स आता सध्या अधिक श्रीमंत ग्राहक वर्गाला आकर्षित करते आहे. स्थानिक निर्मिती भागीदारी स्थापित केली आहे आणि मुंबईत स्वत:ची पहिली पूर्ण मालकीची संपूर्ण सेवा देणारी पोस्ट प्रोडक्शन सुविधा सुरू केली आहे. विविध भारतीय भाषांमध्ये 200 हून अधिक मूळ चित्रपट मालिका आणि विना पटकथा स्वरूपातील निर्मिती करण्यात आली आहे. एकाहून एक नवे उपक्रम कलात्मक आणि कल्पक दृष्टी तसेच स्पर्धकावर व्यावसायिक दृष्टीने मात करण्याची तयारी या सर्व बाबींचा विचार करता नेटफ्लिक्स आपल्या साधनेमुळे दमदार पावले पुढे टाकत आहे.

Advertisement

आता पंतप्रधानांबरोबर झालेली चर्चा आणि नव्या संभाव्य करारामुळे नेटफ्लिक्सच्या भावी काळात येऊ घातलेल्या योजना आणि स्थानिक आशय निर्मितीचे उपक्रम याबाबत विशेष अभ्यास केला असता असे दिसते की श्रेष्ठ गुणवत्ता हाच निकष मानला आहे तसेच कलात्मक प्रतिभाशक्ती आणि अव्वल दर्जाच्या कलाकृती व निर्मात्यांची निवड यामुळे नेटफ्लिक्स इतरांना मागे टाकून झपाझप पुढे जात आहे.

नवे संकल्प नवी घोषणा

भारताला कलात्मक प्रतिभाशक्तीचे केंद्र म्हणजे हब बनविण्याच्या दृष्टीने आणि सर्जनशील प्रतिभाशक्तीला नवा उजाळा देण्यासाठी हा करार कलाक्षेत्रात नवचैतन्य आणू शकेल. जागतिक स्तरावर समग्रपणे दर्जेदार आशय निर्मिती प्रक्रियेला चालना देण्यासाठी भारतातील प्रतिभावान लेखक, कवी, चित्रकार निर्माते यासारख्या श्रेष्ठ मनुष्यबळाला दिशा देण्यासाठी नेटफ्लिक्स या कलात्मक प्रक्रियेत भागीदार म्हणून उदयास येत आहे. भारतातील मनोरंजन उद्योग आता एक नवी झेप घेण्याच्या तयारीत आहे. या उद्योगातील वेगवान वाढीच्या संधी अद्भुत आहेत आणि त्या गगनाला गवसणी घालणाऱ्या आहेत. या पार्श्वभूमीवर नेटफ्लिक्स नवीन उपक्रम घेऊन पुढे येत आहे. नेटफ्लिक्सने भारतामध्ये अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट म्हणजे प्रतिमा निर्मिती आणि दृक संवादाची भाषा यासारख्या क्षेत्रांमध्ये स्थानिक कलावंतांना आणि त्यांच्या सर्जनशील प्रतिभाशक्तीला वाव देण्यासाठी नव्या युगातील प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्या दृष्टीने इंडिया स्टोरी टेलिंग इनिशिएटिव्ह म्हणजे भारतातील कथन कार्यक्रम पुढाकार योजनेची घोषणा नेटफ्लिक्सने केली आहे. ही योजना राष्ट्रीय चित्रपट महामंडळ आणि भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था यासारख्या संस्थांसोबत शिक्षण प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी पुढाकार घेत आहे. हा सुमारे एका दशकाचा प्रदीर्घ कार्यक्रम असून त्यामुळे मनोरंजन उद्योगात नव्या रोजगार संधीचा सुकाळ होणार आहे.

उभय पक्षी संस्थात्मक भागीदारीचे स्वरूप हे अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आणि कलाटणी देणारे आहे या योजनेमुळे राष्ट्रीय चित्रपट महामंडळ आणि भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था या नव्याने उभारलेल्या यंत्रणेसोबत मनुष्यबळ विकास आणि कौशल्य विकास यासाठी नव्याने करार करण्यात येत आहेत. या करारामुळे पुढील दहा वर्षात माध्यम व मनोरंजन क्षेत्रात आणखी एक नवीन क्रांती होऊ शकेल.

भावी आव्हाने कोणती

पंतप्रधानांनी सोशल मीडिया पोस्टवर याबाबतच्या करारांचे स्वरूप स्पष्ट करताना मनोरंजन क्षेत्रातील बलशाली क्षमतांना नवी गती देणारा हा करार आहे. नेटफ्लिक्स इंडियाच्या मते भारताच्या माध्यमातून आणि मनोरंजन उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्याच्या त्यांच्या सामायिक दृष्टिकोनामुळे आता नवे रचनात्मक बदल घडणार आहेत. कलात्मक क्रांतीला गती देणारा हा निर्णय म्हणजे नव्या महापर्वाची सुरुवात असणार आहे. असे असले तरीही उभयपक्षी गुंतवणुकीचे प्रमाण काय असेल, भारतातील प्रगत संस्थांना प्रशिक्षण योजनांचे स्वरूप कसे असेल, दोन मुख्य संस्था प्रमाणेच उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अशा चारही दिशांनी चार संस्थांबरोबर नवे करार झाले पाहिजेत. त्यामुळे मनोरंजन उद्योगाचे विकेंद्रीकरण होऊ शकेल. कलकत्ता येथील सत्यजित रे संस्था असो पुण्यातील एफडीआय सारखी प्रगत संस्था असो तसेच हैदराबाद व चेन्नई येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र असो त्यांच्याही सहविकासावर भर दिला पाहिजे तसेच भारतातील वाढत्या मनोरंजन क्षेत्राला संशोधनाची जोड देण्यासाठी म्हणून भारतीय जनसंचार संस्थान नवी दिल्ली तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील जनसंवाद व माध्यम संशोधन विभाग आणि हैद्राबाद येथील केंद्रीय विद्यापीठातील जन संज्ञापन विभाग याचेही सहकार्य घेतले पाहिजे. तसेच बंगाली, तेलगू, तमिळ तसेच मल्याळम या भाषेतील चित्रपट आणि मनोरंजन उद्योगाला गती देण्यासाठी स्थानिक प्रशिक्षण संस्थांना सुद्धा पूरक सहाय्य आणि गती देण्याची आवश्यकता आहे कारण हिंदी भाषेतील मुख्य मनोरंजन उद्योगाला पोषक गती देण्याचे कार्य प्रादेशिक स्तरावरील भाषिक माध्यमांनी केले आहे. त्यांच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करता कामा नये ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

मनोरंजन उद्योगाचे भविष्य

नेटफ्लिक्सने केलेला करार हा भारताच्या मनोरंजन उद्योगातील भावीक्रांतीची चाहूल म्हटला पाहिजे. फिकी या संस्थेच्या 2026 वार्षिक अहवालात असे म्हटले आहे की माध्यम व मनोरंजन उद्योग वार्षिक नऊ टक्के वाढीसह 2.78 ट्रिलियन रुपयापर्यंत पोहोचला आहे. मुख्य उद्योगाच्या वाढीचा दर 11.8 टक्केपर्यंत पोहोचला आहे. यावर्षी डिजिटल मीडियाने टेलिव्हिजन माध्यमाला मागे टाकून सर्वात मोठा विभाग म्हणून प्रथमच एक ट्रिलियन महसूल टप्पा ओलांडला. थेट संगीत कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम आणि मोठ्या मेळाव्यामुळे त्यात 44 टक्क्यांची वाढ झाली आहे. जाहिरात महसूल 13 टक्क्यांनी वाढला आहे. भविष्य काळामध्ये 2028 पर्यंत माध्यम आणि मनोरंजन उद्योग 3.3 ट्रिलियन पर्यंत वाढणार आहे. हे लक्षात घेऊन नेटफ्लिक्सने भारताबरोबर केलेल्या कराराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे अधोरेखित केले पाहिजे. भारताच्या मनोरंजन उद्योगातील सुवर्ण युगास आता प्रारंभ होत आहे असेच म्हटले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेल्या दूरदृष्टीचे स्वागत करून या क्षेत्रातील क्रांतिकारक बदलामुळे भविष्यात येणाऱ्या रोजगार क्षमतांचे आपण स्वागत केले तर खरोखरच हे सर्व बदल युवकांच्या पथ्यावर पडतील यात शंका नाही.

या सर्व चर्चेवरून हे स्पष्ट होते की भारतातील माध्यम व मनोरंजन उद्योगाला असलेल्या सुवर्णसंधीचा वसा आणि वारसा लक्षात घेऊन पंतप्रधानांनी नेटफ्लिक्स या आंतरराष्ट्रीय संस्थेबरोबर नव्या करारांचा संकल्प केला आहे. हा संकल्प भारतातील मनोरंजन उद्योगाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

मनोरंजन, ऊर्जा आणि पर्यटन ही भविष्य काळातील रोजगाराची नवी क्षेत्रे आहेत किंबहुना भाविकाळात 100 पैकी 70 रोजगार या क्षेत्रात असणार आहेत, हे लक्षात घेऊन मनोरंजन आणि माध्यम उद्योगाला उभारी देण्यासाठी कसदार प्रशिक्षणाची आणि सर्जनशील प्रतिभेला नवी गती देण्याची गरज आहे. तसे झाले तरच या क्षेत्रातील प्रतिभेचा सोनचाफा सतत दरवळत राहील आणि आज भारतीय मनोरंजन उद्योगात क्षमता असूनही त्यांच्यावर उपेक्षेची जी वेळ आली आहे ती दूर होऊ शकेल. भविष्यकाळात नव्या युगात राज कपूर, गुरुदत्त आणि सत्यजित रे यांच्यासारखे प्रतिभाशाली कलावंत निर्माण होऊ शकतील. त्यामुळे नेटफ्लिक्स सोबतच्या कराराचे स्वागत करताना आपण अधिक सावध राहून झालेले करार भारताच्या हिताच्या दृष्टीने युवकांच्या कल्याणासाठी त्यांच्या पदरात कसे झुकते माप टाकणारे ठरतील यावर विचार केला पाहिजे. तसे झाले तरच हा करार एक नवे वरदान ठरु शकेल यात शंका नाही.

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.