जगात भारताची अर्थव्यवस्था असेल तिसऱ्या क्रमांकाची
केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे ध्येय बाळगल्याने देश प्रगतीपथावर आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच उद्योगांना चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. भारताची आर्थिक वाटचाल ही वेगाने पुढे जात असल्याने येत्या काळात भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल, अशी माहिती केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिली.
पणजीतील भाजप मुख्यालयात काल, शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी ‘विकसित भारत 2047’ यावर भाष्य केले. यावेळी गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर उपस्थित होते.
केंद्र सरकारने यंदाचा अर्थसंकल्प पूर्णत्वास आणताना देशातील युवा, शेतकरी, महिला आणि गरीब जनतेला मध्य ठेवले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हित आणि सर्वांगीण विकासाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नऊवेळा केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला असून, यंदाच्या या अर्थसंकल्पात शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांचा समतोल विचार करण्यात आला आहे. पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास, आरोग्य व शिक्षण क्षेत्राला दिलेले प्राधान्य देशाच्या दीर्घकालीन आर्थिक विकासासाठी पूरक ठरणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर गरीब व वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हे मुख्य धोरण आहे. त्याच अनुषंगाने यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी करण्यात आल्या. गोवा राज्यातील पर्यटन, आरोग्य, शेती व मत्स्यव्यवसाय यांनाही ह्या अर्थसंकल्पाचा फायदा होणार असल्याचेही मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही या अर्थसंकल्पात महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला असे सांगितले. त्याचबरोबरच महिला उद्योजकता, स्वयंसहायता गट आणि बालकल्याण योजनांसाठी करण्यात आलेल्या तरतुदी सामाजिक परिवर्तनाला गती देणाऱ्या ठरतील, असे सांगितले. राज्यसभा खासदार तानावडे यांनी जनहितकारी, विकासाभिमुख आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने देशाला पुढे नेणारा यंदाचा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले.