भारताचा आर्थिक वाढीचा वेग राहणार संथ
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पश्चिम आशियातील सुरु असलेला तणाव आणि देशातील प्रभावीत झालेली मागणी यामुळे भारतीय आर्थिक वाढीचा वेग हा काहीसा संथपणे सुरु राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
चालू आर्थिक वर्षात देशातील जीडीपी वाढीचा वृद्धीदर हा 6.6 टक्क्यांवर राहणार असल्याचा अंदाज फिच ग्रुपची कंपनी बीएमआय यांनी व्यक्त केला आहे. जो मागील आर्थिक वर्षात 7.7 टक्के इतका दर राहिला असल्याची नोंदही करण्यात आली आहे. मागील आठवड्यात सादर करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारतीय जीडीपी वाढीचा दर हा वधारुन 7.7 टक्क्यांवर राहणार असून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये हा आकडा 7.1 टक्के इतका होता.
मंद वाढीमागील तीन प्रमुख कारणे
बीएमआयने चालू आर्थिक वर्षातील तुलनेने मंद विकास दरामागे तीन प्रमुख कारणे सांगितली आहेत. पहिले, गेल्या वर्षी लागू केलेल्या जीएसटी सुधारणांचा देशांतर्गत वापरावरील सकारात्मक परिणाम हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. दुसरे, वाढती महागाई वापराच्या वाढीवर परिणाम करू शकते. बीएमआयच्या अंदाजानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संभाव्य अडथळ्यामुळे 2026-27 या आर्थिक वर्षात महागाई 5.3 टक्क्यांपर्यंत वाढू शकते, ज्यामुळे ग्राहकांच्या मागणीवर दबाव येईल.