भारताचा दुहेरी सुवर्ण इतिहास
नेपाळला हरवून विश्वविजेतेपद पटकावले!
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमच्या चकचकीत प्रकाशात आणि जल्लोषाच्या गजरात भारतीय पुरुष आणि महिला संघांनी खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून इतिहास घडवला! नेपाळला अंतिम सामन्यात पराभूत करत भारतीय संघांनी संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण मिळवून दिला व भारतीय पुरुष व महिला संघांनी प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमवर भारताचे नाव विश्वचषकावर सुवर्णअक्षरात कोरले. भारतीय खो-खो संघांनी एक अनोखा आणि गौरवास्पद इतिहास रचला आहे. भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी खो-खोच्या पहिल्या विश्वचषकात संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवत पहिले विश्वविजेतेपद पटकावले. महिलंच्या सामन्यात भारताने नेपाळवर 78-40 असा 38 गुणांनी विजय साकारला. पुरुष अंतिम सामन्यात भारताने नेपाळला 54-36 असा 18 गुणांनी पराभूत केले.
भारतीय पुरुषांची जोरदार कामगिरी.
भारताने सुरवातीपासूनच आक्रमक खेळ करताना नेपाळला जरा सुध्दा डोकं वर काढायला दिले नाही. पहिल्या टर्न मध्ये भारताने तब्बल चार तुकड्या बाद करून नेपाळला जोरदार धक्का दिला व या आक्रमणाच्या टर्नमध्ये भारताने 26-0 असे गुण वसूल केले. दुसऱ्या टर्नमध्ये नेपाळच्या आक्रमणात भारताची पहिली तुकडी 2.44 मि. संरक्षण करू शकली तर दुसरी तुकडी 1.59 मिनिटात बाद झाली. तर तिसऱ्या तुकडीतील खेळाडूंनी 2.02 मि. वेळ देत बाद झाली तर चौथी तुकडी नाबाद राहिली, यामुळे मध्यंतराला 26-18 असा गुणफलक दिसत होता. तिसऱ्या टर्नमध्ये आक्रमण करताना भारताने नेपाळची पहिली तुकडी 1.49 मि. बाद केली तर दुसरी तुकडी 1.10 मि. तंबूत परतली. तर तिसरी तुकडी अवघ्या 45 सेकंदात बाद केली. चौथ्या तुकडीला 1.07 मि. बाद केले. पाचव्या तुकडीतील दोन खेळाडू बाद झाले. यावेळी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा गुणफलक 54-18 असे गुण दर्शवत होता. चौथ्या व शेवटच्या टर्न मध्ये नेपाळने आक्रमणाला सुरवात केली व भारताची पहिली तुकडी दोन मिनिटात परतवण्यात नेपाळने यश मिळवले. तर दुसरी तुकडी 2.16 मि. बाद झाली तर तिसरी तुकडी 2.01 मि. बाद झाली तर चौथी तुकडी नाबाद राहिली व भारताने हा सामना 54-36 असा 18 गुणांनी जिंकत विश्वचषकाला कवटाळले.
विजेत्या भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव
सर्व सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येकी 2 कोटी 25 लक्ष रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच थेट क्लास वन अधिकारी म्हणून नोकरी देखील राज्य शासनाच्या वतीने दिली जाणार आहे.
-चंद्रजीत जाधव, सहसचिव भारतीय खो खो महासंघ.
नेपाळसारख्या काटक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळताना आमच्यावर मोठा दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, पण आम्ही जोरदार लढत देऊन दबावाला बळी न पडता नैसर्गिक खेळ करत विजय खेचून आणला. मैदानावर प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता, आणि आम्ही एकमेकांवर असलेला विश्वास शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवल्यामुळेच हा विजय शक्य झाला. आजचा विजय भारतीय खो-खोला नव्या उंचीवर नेणारा आहे. हा विजय देशासाठी आहे, आणि भविष्यातही आम्ही अशीच कामगिरी करत राहू.
- प्रतीक वाईकर, भारतीय पुरुष खो-खो संघाचा कर्णधार