For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा कबड्डीत ‘डबल धमाका’

06:58 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताचा कबड्डीत ‘डबल धमाका’
Advertisement

एशियन गेम्समध्ये महिला व पुरुष संघ चॅम्पियन : फायनलमध्ये इराणवर मात :

Advertisement

वृत्तसंस्था/ नागोया

आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये महिला संघापाठोपाठ पुरुष संघानेही ‘सुवर्णपदक जिंकण्याची किमया केली आहे. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने इराणला 37-34 असे नमवत सुवर्ण पटकावले. महिलांनी सुवर्णयश मिण्वल्यानंतर पुरुष संघानेही इराणला बॅकफुटवर ढकलत कबड्डीत भारतच किंग असल्याचे दाखवून दिले. यंदाच्या हंगामातील भारताचे हे चौथे सुवर्ण ठरले. याशिवाय, गोळाफेकमध्ये तजिंदरपाल तूरने रौप्यपदकाची कमाई केली. हॉकीत भारताने आपली घोडदौड कायम राखत उपांत्य फेरी गाठली आहे. दरम्यान, भारतीय संघ 4 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्यपदकासह एकूण 30 पदकांची कमाई करत पदकतालिकेत 10 व्या स्थानी आहे.

Advertisement

महिला संघाने सकाळच्या सत्रात इराणच्या महिला संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात दणदणीत विजयाची नोंद केली. भारतीय महिला कबड्डी संघाने 37-34 च्या फरकाने विजय मिळवला आणि चौथ्यांदा गोल्ड मेडलवर नाव कोरले. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये भारतीय संघाने उत्कृष्ट खेळ करत 22-16 अशी 6 गुणांची भक्कम आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये इराणने कमबॅक करत धावसंख्या 27-26 अशी आणून ठेवली. सामना संपायला अवघी 8 मिनिटे शिल्लक असताना आणि केवळ 1 गुणाचे अंतर राहिल्याने भारतीय संघावर मोठा दबाव निर्माण झाला होता. मोक्याच्या क्षणी पूजा हथवालाने आक्रमक खेळ करत सलग यशस्वी रेड्स मारल्या आणि भारताला महत्त्वाचे गुण मिळवून दिले. भारतीय बचावाने इराणच्या रेडर्सना आऊट करत त्यांची घोडदौड रोखली आणि 37-34 असा विजय निश्चित केला.

महिला संघाचे चौथे गोल्ड

एशियन गेम्समध्ये 2010 साली महिला कबड्डीचा समावेश झाल्यापासून भारतीय संघाने आपले निर्विवाद वर्चस्व राखले आहे. आतापर्यंत झालेल्या पाचही मोसमांत प्रत्येक वेळी अंतिम फेरीत धडक मारत भारताने पदके जिंकण्याचा अभूतपूर्व विक्रम केला आहे, ज्यामध्ये चार सुवर्ण आणि एका रौप्य पदकाचा समावेश आहे.

पुरुष संघाची ‘सुवर्ण’ कामगिरी

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाने आपले वर्चस्व कायम राखत विक्रमी नवव्यांदा सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात भारताने इराणचा 39-34 असा पराभव केला. इराणने सुरूवातीपासून आक्रमक खेळ केला. पण त्यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. पहिल्या हाफमध्ये इराणने भारतीय संघाला ऑलआऊट करत 14-13 ने आघाडी घेतली. ऑलआऊट झाल्यानंतर भारतीय संघाने पुनरागमन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण पहिल्या हाफच्या समाप्तीनंतर इराणचा संघ 18-17 ने केवळ एक गुणाच्या फरकाने आघाडीवर होता. दुसऱ्या हाफमध्ये भारतीय खेळाडूंनी जोरदार खेळ केला. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असताना, भारतीय संघाने इराणवर 5 गुणांची आघाडी घेतली. भारतीय संघाने आघाडी आणखी मजबूत करण्यावर भर दिला. शेवटी फुल टाईमनंतर भारतीय संघाने हा सामना 40-34 गुणांसह 6 गुणांनी विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

कबड्डीत भारताचे नववे सुवर्ण

1990 ते 2026 दरम्यान 10 वेळा आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडल्या आहेत. यापैकी 9 स्पर्धांमध्ये भारतानं कब•ाrत सुवर्णपदक मिळवले आहे. 2018 मध्ये भारताच्या कबड्डी संघाला सुवर्णपदक जिंकता आले नव्हते.

तजिंदरपाल तूरची गोल्डन हॅट्ट्रिक हुकली, गोळाफेकमध्ये रौप्य

भारताचा दिग्गज गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडलची हॅट्रिक करण्यासाठी मैदानात उतरला खरा पण त्याची ही संधी थोडक्यात हुकली आहे. यंदाच्या आशियाई स्पर्धेत त्याला रौप्यपदकावर समाधन मानावे लागले आहे. इराणच्या मोहम्मदरेजा तेय्यबीसेने 20.81 गोळाफेक करत सुवर्ण पटकावले आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. तजिंदरपालने 20.64 मीटर लांब थ्रो करून रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. तर सौदी अरेबियाच्या मोहम्मद टोलूने 20.48 मीटर थ्रो करून कांस्य पटकावले. याआधी तजिंदरपालने 2018 आणि 2022 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते, यामुळे त्याच्याकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा होत्या. पण अखेरीस त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

50 मी. रायफल प्रकारात भारताला रौप्य

महिलांच्या 50 मीटर रायफल 3-पोझिशन सांघिक प्रकारांमध्ये भारताच्या तिलोत्तमा सेन, विदरसा विनोद आणि आशी चौकसे या त्रिकूटाने रौप्यपदक जिंकले आहे. भारतीय संघाने 1763 गुणांची कमाई करत दुसरे स्थान पटकावले. चीनने 1773 गुणासह या प्रकारात गोल्ड मेडल जिंकले आहे. कझाकिस्तानच्या संघाने 1754 गुणासह तिसरे स्थान मिळवत कांस्यपदक जिंकले आहे.

मॅरेथॉनमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी, सवान बरवालला रौप्य

आशियाई क्रीडा स्पर्धेत शनिवारची सुरुवात भारतासाठी ऐतिहासिक ठरली. मॅरेथॉन शर्यतीत सवान बरवालने रौप्यपदकाची कमाई केली. 1982 नंतर म्हणजेच तब्बल 44 वर्षानंतर मॅरेथॉन शर्यतीत भारतीय अॅथलिटने पदक पटकावण्याची किमया केली आहे. याआधी 1982 मध्ये होसुर सिथारानने कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर तब्बल 44 वर्षानंतर सवान बरवालने रौप्य जिंकण्याच पराक्रम केला आहे. त्याने ही शर्यत 2 तास 11 मिनिटं आणि 37 सेकंदात पूर्ण केली. दरम्यान, जपानच्या इचाटिकाने सुवर्ण तर चीनच्या फेंगूने या शर्यतीत कांस्य पटकावले.

महिलांच्या 400 मी. शर्यतीत प्राचीला कांस्य

भारताची 29 वर्षीय धावपटू प्राची चौधरीने 400 मी. शर्यतीत 53.21 सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले. या शर्यतीत बहरीनच्या सलवा ईद नासेरने 49.20 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावत आशियाई क्रीडा स्पर्धेचा विक्रम मोडला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत वर्चस्व राखत तिने दमदार कामगिरीसह शर्यत जिंकली. इराणच्या जहराने 52.38 सेकंदासह रौप्यपदक पटकावले आहे.

स्क्वॅशमध्ये भारताला कांस्य

शनिवारी स्क्वॅशमध्ये मिश्र दुहेरीत भारताच्या जोश्ना चिनप्पा आणि सेंथिलकुमार या जोडीने कांस्यपदक पटकावले. भारताच्या या जोडीकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा होत्या, पण उपांत्य फेरीच्या लढतीत हाँगकाँगच्या जोडीकडून भारतीय जोडीला 2-1 असा पराभवाचा सामना करावा लागला.

भारतीय पुरुष हॉकी संघ उपांत्य फेरीत

पुरुष हॉकी स्पर्धेत गतविजेत्या भारताने यजमान जपानचा 2-0 असा पराभव करून सलग चौथा विजय नोंदवला. या विजयासह भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला. भारताकडून अभिषेक आणि हरमनप्रीत सिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारतीय संघाने सामन्यावर वर्चस्व गाजवताना प्रतिस्पर्धी जपानला एकही गोल करु दिला नाही. आता, गटातील भारतीय संघाचा शेवटचा सामना दि. 28 रोजी बांगलादेशविरुद्ध होईल.

अनाहत, अभय फायनलमध्ये, सुवर्णपदकासाठी खेळणार

स्क्वॅशमध्ये भारताची स्टार खेळाडू अनाहत सिंगने जपानची दिग्गज खेळाडू सातोमीला पराभूत करत फायनल गाठली आहे. शनिवारी झालेल्या या उपांत्य सामन्यात अनाहतने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना महिला एकेरीची फायनल गाठत आपले पदक निश्चित केले आहे. याशिवाय, पुरुषांच्या एकेरीतील अंतिम लढतीत भारताच्या अभय सिंगने पाकिस्तानच्या इरफानचा 3-0 असा धुव्वा उडवला.

Advertisement
Tags :

.