आशियाई कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे वर्चस्व
मयंकला खुल्या, तर प्रतितीला मुलींच्या गटातील जेतेपद
वृत्तसंस्था, मुंबई : आशियाई कनिष्ठ क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या आणि मुलींच्या अशा दोन्ही गटांतील विजेतेपदे पटकावून भारताने आपले बुद्धिबळातील वर्चस्व सिद्ध केले. मयंक चक्रवर्ती आणि प्रतिती बोरदोलोई यांनी या विजयांचे नेतृत्व करत सुवर्णपदके आणि महत्त्वपूर्ण ’फिडे नॉर्म्स’ मिळवले.
स्पर्धेत अव्वल मानांकन असलेल्या मयंकने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत नऊ फेऱ्यांच्या खुल्या स्पर्धेत 7.5 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. रशियाच्या आर्टेम पिंगिनने 7 गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर भारताच्या दक्ष गोयलने प्रभावी कामगिरी करत 6.5 गुणांसह कांस्यपदक पटकावले.
नऊ फेऱ्यांमध्ये 7.5 गुण मिळवून मुलींच्या गटातील विजेतेपद पटकावत प्रतितीने यजमान भारतासाठी दुहेरी सुवर्ण यश पूर्ण केले. कझाकस्तानच्या मारिया खोल्याव्हकोने केवळ अर्धा गुण मागे राहून रौप्यपदक मिळवले, तर निवेदिता व्ही. सी. हिने 6.5 गुणांसह कांस्यपदक पटकावले. ही स्पर्धा अनेक खेळाडूंसाठी अत्यंत फलदायी ठरली. त्यांनी प्रतिष्ठित ’फिडे’ पदके आणि नॉर्म्स मिळवले.
खुल्या गटाचा विजेता मयंक, जो आधीच ‘ग्रँडमास्टर’ होण्याच्या मार्गावर आहे, त्याने विजेतेपदाच्या कामगिरीद्वारे आणखी एक ‘ग्रँडमास्टर नॉर्म’ मिळवला. कांस्यपदक विजेता दक्ष गोयल याने ‘फिडे मास्टर’ किताबासह ’इंटरनॅशनल मास्टर नॉर्म’ही मिळवला. मुलींच्या गटातील विजेती प्रतिती हिने ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’ किताबासह ‘वुमन ग्रँडमास्टर नॉर्म’ही प्राप्त केला. रौप्यपदक विजेत्या मारियाने ‘डब्ल्यूआयएम नॉर्म’ मिळवला, तर कांस्यपदक विजेत्या निवेदितानेही ‘डब्ल्यूआयएम नॉर्म’ मिळवला. एकूण पदक तालिकेतून भारताचे वर्चस्व दिसून आले. क्लासिकल स्पर्धेत उपलब्ध असलेल्या सहा पदकांपैकी यजमान भारताने चार पदके (दोन सुवर्ण आणि दोन कांस्य) आपल्या नावे केली.