भारताच्या दिव्यांशीला आशियाई टेटे स्पर्धेत सुवर्ण
वृत्तसंस्था/ ताश्कंद
भारताच्या दिव्यांशी भौमिकने उझबेकिस्तानमध्ये झालेल्या 29 व्या आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आणि 15 वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटाचे विजेतेपद जिंकणारी 36 वर्षांतील पहिली भारतीय खेळाडू बनली.
14 वर्षीय दिव्यांशी भौमिकने अंतिम फेरीत चीनच्या झू किहीचा 4-2 असा पराभव केला. चीनच्या तीन खेळाडूंवर विजय मिळवून तिने सनसनाटी निर्माण केली. भारतीय युवा टेबल टेनिसमधील एक अभूतपूर्व कामगिरी, असे आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिपच्या निवेदनात म्हटले आहे. दुसऱ्या मानांकित दिव्यांशीने या जेतेपदासह जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. तिचा उल्लेखनीय क्षण उपांत्य फेरीत आला, जिथे तिने सात गेम्सच्या रोमांचक लढतीत चीनच्या लिऊ झिलिंगला पराभूत करीत भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा जिवंत ठेवल्या.
दिव्यांशी ही दानी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या विकास कार्यक्रमार्ची निर्मिती आहे, जो तरुण संभाव्य खेळाडूंना ओळखण्यासाठी आणि त्यांचे पालनपोषण करण्यासाठी अल्टिमेट टेबल टेनिससोबत काम करतो. ही तरुणी ड्रीम यूटीटी ज्युनियर्सच्या पहिल्या आवृत्तीचा भाग होती, जी अहमदाबादमध्ये अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 6 सोबत चालली होती. त्यामध्ये देशातील काही सर्वोत्तम युवा प्रतिभांचा समावेश होता. दरम्यान, तिला या वर्षी एप्रिलमध्ये टेबल टेनिस सुपर लीगमधील (टीटीएसएल) महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू (एकंदर) म्हणूनही निवडण्यात आले. भारताने ताश्कंदमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह आपली मोहीम संपवली, दिव्यांशीचे यश देशातील युवा टेबल टेनिसमध्ये पुनरुज्जीवनासाठी एक निर्णायक क्षण म्हणून उभा राहिला आहे.