भारताला वाटणारी चिंता योग्य
खलिस्तानी दहशतवादावर कॅनडाची पहिल्यांदाच कबुली : चौकशी आयोगाच्या अहवालात खुलासा
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाने पहिल्यांदाच स्वत:च्या भूमीवर खलिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतविरोधी कारवाया होत असल्याचे मान्य केले आहे. कॅनडाच्या सार्वजनिक चौकशी आयोगाच्या अहवालात कॅनडातील खलिस्तान समर्थकांच्या कारवायांप्रकरणी भारताच्या चिंता योग्य असल्याचे म्हटले गेले आहे. परंतु भारत ‘कॅनडाच्या निवडणुकीत विदेशी हस्तक्षेपात सामील दुसरा सर्वात सक्रीय देश’ असल्याचा आरोप अहवालात करण्यात आला आहे. तर चीन हा सर्वाधिक हस्तक्षेप करणारा देश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाहीवादी संस्थांमध्ये विदेशी हस्तक्षेपाची पडताळणी करत असलेल्या सार्वजनिक चौकशी आयोगाने मंगळवारी स्वत:चा अंतिम अहवाल जारी केला आहे. चीन अन् भारतावर निवडणुकीला प्रभावित करण्याचा आरोप करण्यात आला आहे. यात हस्तक्षेप करणाऱ्या देशांमध्ये रशिया, पाकिस्तान आणि इराण सामील असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
खलिस्तानी उग्रवादाचा धोका
कॅनडात खलिस्तानी उग्रवादामुळे निर्माण झालेल्या धोक्याविषयी भारताच्या चिंतांसाठी काही वैध आधार आहेत. काही उग्रवादी कॅनडाच्या भूमीवरून भारताला लक्ष्य करणाऱ्या कारवायांमध्ये गुंतलेले आहेत. खासकरून भारतातील दहशतवादी कारवायांचे समन्वय आणि त्यांना वित्तपुरवठा केला जात असल्याचे अहवालात कॅनडाच्या सुरक्षा गुप्तचर सेवेच्या (सीएसआयएस) दाखल्याने म्हटले गेले आहे. खलिस्तान समर्थकांची मोठी संख्या शांततापूर्ण आहे. तर भारत खलिस्तानचे राजकीय समर्थन करणारे आणि कॅनडातील खलिस्तानी हिंसक उग्रवाद्यांदरम्यान फरक करत नसल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
कॅनडा-भारताच्या संबंधांमध्ये आव्हाने
कॅनडा आणि भारत दशकांपासून एकत्र काम करत आहेत, परंतु संबंधांमध्ये आव्हान देखील आहेत. यातील अनेक आव्हाने दीर्घकाळापासून असून भारताच्या विदेशी हस्तक्षेप कारवायांना दर्शवित आहेत. कॅनडा खलिस्तानी फुटिरवादाविषयी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा चिंता गांभीर्याने घेत नसल्यचचे भारताचे मानणे आहे असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
खलिस्तानी उग्रवाद ब्रिटनसाठी धोक्याचा
ब्रिटनमध्ये निर्माण झालेल्या 9 धोक्यांमध्ये खलिस्तानी उग्रवादाला सामील करण्यात आले आहे. ही माहिती गृह मंत्रालयाचा दस्तऐवज लीक झाल्याने समोर आली आहे. हा दस्तऐवज ऑगस्ट 2024 मध्ये ब्रिटनच्या गृह विभागाच्या यवेट कूपर यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून तयार करण्यात आला होता. ब्रिटन सरकारच्या अहवालात खलिस्तानी उग्रवादाला प्रमुख धोक्यांच्या यादीत सामील करण्यात आले आहे. अहवालात खलिस्तान समर्थकांकडून स्वत:च्या उद्देशासाठी हिंसा फैलावण्यात येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. हा अहवाल ब्रिटनच्या गृहमंत्रालयाच्या विविध संस्थांकडुन तयार करण्यातआला आहे. यात प्रिव्हेंट, रिसर्च, इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन्स युनिट तसेच होमलँड सिक्युरिटी, अॅनालिसिस अणि इंसाइट सामील आहे.