उबेर चषक स्पर्धेतील भारताचे आव्हान समाप्त
चीनकडून 0-5 ने एकतर्फी पराभव, पीव्ही सिंधू, इशाराणी बारुआ, देविका सिहाग पराभूत
वृत्तसंस्था, हॉर्सेन्स (डेन्मार्क)
येथे सुरू असलेल्या 2026 च्या उबेर चषक सांघिक महिलांच्या फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला संघाचे आव्हान संपुष्टात आले. या स्पर्धेतील अ गटातील झालेल्या शेवटच्या लढतीत बलाढ्या चीनने भारताचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला.
उबेर चषकासाठीच्या या सांघिक स्पर्धेत भारतीय महिला संघाला पहिल्याच लढतीमध्ये यजमान डेन्मार्ककडून 2-3 अशा फरकाने हार पत्करावी लागली होती. त्यानंतर दुसऱ्या लढतीत भारताने युक्रेनचा 4-1 असा पराभव करुन स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले होते. पण या गटातील शेवटच्या लढतीत विद्यमान विजेत्या चीनने भारताचा दणदणीत पराभव केला. या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत चीनने 16 वेळा उबेर चषकावर आपले नाव कोरले आहे. अलिकडच्या कालावधीत भारतीय महिला संघाला 3 प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चीनकडून पराभव पत्करावा लागला होता.
भारत आणि चीन यांच्या लढतीतील झालेल्या विविध सामन्यांमध्ये पीव्ही सिंधू, इशाराणी बारुआ आणि देविका सिहाग यांना पराभव पत्करावा लागला. चीनविरुद्धच्या लढतीसाठी उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांच्या जागी बारुआ आणि सिहाग यांना एकेरीत खेळविण्यात आले होते. पहिल्या एकेरीच्या सामन्यात चीनच्या द्वितीय मानांकीत वांग झीयीने पीव्ही सिंधूचा 21-16, 19-21, 19-21 अशा गेम्समध्ये पराभव केल्याने चीनने या लढतीत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुहेरीच्या पहिल्या सामन्यात टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती जोडी चीनच्या लीयु शेंग शु आणि तान निंग यांनी भारताच्या प्रिया कोंजेंगबाम आणि श्रुती मिश्रा यांचा 21-11, 21-8 अशा फडशा पाडला. त्यानंतर एकेरीच्या सामन्यात चीनच्या चेन युफेईने भारताच्या इशाराणी बारुआवर 22-20, 21-13 अशा गेम्समध्ये मात केली. युफेईने हा सामना केवळ 44 मिनिटांत जिंकून चीनला 3-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या दुहेरीच्या सामन्यात चीनच्या लुओ मीन आणि झेंग झियान यांनी भारताच्या त्रिशा जॉली आणि कवीप्रिया सेल्वम यांचा 21-10, 12-21, 21-19 असा पराभव केला. शेवटच्या एकेरी सामन्यात चीनच्या झु जिंगने भारताच्या देविका सिहागचे आव्हान 19-21, 21-17, 21-10 असे संपुष्टात आणले. अ गटातील ही लढत चीनने अखेर 5-0 अशी एकतर्फी जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
या स्पर्धेत पुरूषांच्या विभागात थॉमस चषकासाठी भारताची अ गटातील शेवटची लढत चीनबरोबर बुधवारी होणार आहे. दरम्यान भारतीय पुरूष संघाने सोमवारी अ गटातील लढतीत ऑस्ट्रेलियाचा 5-0 असा एकतर्फी पराभव करुन उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते. 2022 साली भारताने थॉमस चषक पटकाविला होता. बुधवारच्या लढतीनंतर अ गटातील पहिल्या दोन संघांचे स्थान निश्चित होईल.