For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात रंगणाऱ्या ‘बुद्धिबळ विश्वचषका’तील भारतीय आव्हान !

06:00 AM Oct 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात रंगणाऱ्या ‘बुद्धिबळ विश्वचषका’तील भारतीय आव्हान
Advertisement

बुद्धिबळातील महत्त्वाची स्पर्धा मानल्या जाणाऱ्या विश्वचषकातील लढती रंगतील त्या गोव्यात...या खेळाच्या विश्वातील दिग्गजांच्या मांदियाळीत सर्वांचं लक्ष असेल ते भारतीय खेळाडूंवर. त्यातील किमान गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुन एरिगेसी नि विदित गुजराथींला मायभूमीत स्पर्धा होत असल्यानं जेतेपद निश्चितच खुणावत असेल...त्यायोगे त्यांना यंदाच्या काहीशा डळमळीत वाटचालीला पूर्णविराम लावता येईलच. शिवाय गुकेश वगळता इतरांसमोर त्याहून मोठं लक्ष्य असेल ते ‘कँडिडेट’ स्पर्धेकरिता पात्र ठरण्याचं. जगज्जेत्या गुकेशचा आव्हानवीर ठरेल तो ‘कँडिडेट’मधूनच...

Advertisement

माजी जगज्जेत्या बुद्धिबळपटूंच्या कारकिर्दीचं विश्लेषण केल्यास असं दिसेल की, भारतीय विश्वविजेत्या डी. गुकेशची वाटचाल ही त्यांच्यासारखी झालेली नाही, ती कायम डळमळीतच राहिलीय...12 डिसेंबर, 2024...18 वर्षं, 6 महिने आणि 24 दिवसांचा गुकेश क्लासिकल बुद्धिबळातील जगज्जेता बनला. परंतु त्याला अजूनही हवं तसं बस्तान बसविणं जमलेलं नाहीये. अशा वेळी आठवण होतेय ती मॅग्नस कार्लसन, गॅरी कास्पारोव्ह, विश्वनाथन आनंद आणि अनातोली कारपोव्हसारख्या बुद्धिबळ जगतावर सातत्यानं राज्य केलेल्या विश्वविजेत्यांची...

भारतीय खेळाडू प्रयत्नांच्या बाबतीत कमी पडलाय असं म्हणणं चुकीचं ठरेल. पण ऑक्टोबर, 2024 पासून त्याचे निकाल उत्साहवर्धक राहिलेले नाहीत. बुद्धिबळातील जागतिक संघटना ‘फिडे’नुसार, गुकेशच्या दृष्टीनं सर्वांत महत्त्वाचा राहिला तो गेल्या वर्षीचा ऑक्टोबर महिना. त्यावेळी त्यानं ‘एलो रेटिंग पॉइंट्स’मध्ये भर घातली होती ती 30.1 गुणांची. त्यानंतर यंदाच्या मार्च महिन्याचा (+10.2) अपवाद सोडल्यास अन्य प्रत्येक महिन्यानं इमानेइतबारे काम केलंय ते त्याचे ‘एलो’ गुण वजा करण्याचं. यंदाच्या ऑक्टोबरमध्ये तर त्याचे तब्बल 14.5 गुण गायब झाले...

Advertisement

गेल्या 12 महिन्यांचा विचार केल्यास गुकेशचं ‘परफॉर्मन्स रेटिंग’ 2702 असून ते गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमधील 2794 पेक्षा 92 गुणांनी कमी. सध्या तो 2752 वर घुमटमळतोय...या खेळातील कित्येक विश्लेषकांच्या मते, गुकेशकडून प्रत्येक वेळीं अपेक्षा धरली जातेय ती उच्च दर्जाच्या कामगिरीची. पण तसं घडणं शक्य नाहीये...विश्वाला अजूनपर्यंत पाहायला मिळालेत ते 18 जगज्जेते नि त्यापैकी एमानुएल लास्कर, अॅलेक्झांडर अलेखाईन, अनातोली कारपोव्ह, गॅरी कास्पारोव्ह आणि मॅग्नस कार्लसन यांनीच त्यांच्या कारकिर्दीत सातत्याचं अप्रतिम दर्शन घडविलंय अन् ‘एलो रेटिंग’मध्ये सतत वृद्धी नोंदविलीय...

साल 2025...‘फिडे’च्या विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्याचा मान भारताला मिळालाय. 2002 नंतर असं प्रथमच घडलंय. त्यात सहभागी होतील 80 देशांतील तब्बल 200 हून अधिक उच्च दर्जाचे बुद्धिबळपटू. 1 नोव्हेंबरपासून गोव्यात प्रारंभ होणाऱ्या या ‘नॉकआऊट’ (बाद पद्धतीच्या) स्पर्धेत पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करण्याची छान संधी मिळेल ती डी. गुकेशला...‘माझा उत्साह प्रचंड वाढलाय आणि मी स्पर्धा सुरू होण्याची वाट पाहतोय. भारतातील कुठल्याही राज्यात खेळणं ही निश्चितच अनुकूल बाब. माझ्या गोव्यासंबंधी कित्येक चांगल्या आठवणी असून मी तिथं झालेल्या काही कनिष्ठ गटांतील स्पर्धांत भाग घेतलाय’, थेट दुसऱ्या फेरीत खेळणार असलेल्या गुकेशचे शब्द...

विश्वचषक स्पर्धेची रचना वैशिष्ट्यापूर्ण अशीच. तिथं असतात आठ फेऱ्या व ‘सिंगल-एलिमिनेशन नॉकआऊट’ पद्धतीनं त्या खेळल्या जातात. प्रत्येक लढतीत समावेश असतो तो दोन ‘क्लासिकल’ डावांचा आणि ते आधारलेले असतात वेळेच्या नियंत्रणावर. जर दोन्ही डाव कोंडी फोडण्यात अपयशी ठरले, तर तिसऱ्या दिवशी ‘रॅपिड व ब्लिट्झ’ यांचं साहाय्य टायब्रेकरमध्ये घेण्यात येईल...206 खेळाडूंपैकी 50 जणांना मानांकन देण्यात आलंय आणि त्यात समावेश जगातील अव्वल दर्जाच्या ग्रँडमास्टर्सचा. त्यांना दुसऱ्या फेरीत खेळण्याची संधी मिळेल, तर अन्य 156 बुद्धिबळपटू 1 नोव्हेंबरच्या दुपारपासून पहिल्या फेरीतील झुंजीला प्रारंभ करतील...

कित्येक ग्रँडमास्टर्सच्या मते, गुकेशला पराभूत करणं फारसं कठीण राहिलेलं नाहीये. असं असलं, तरी नुकत्याच संपलेल्या युरोपियन सांघिक स्पर्धेत 2927 ‘परफॉर्मन्स रेटिंग’सह त्यानं संघाला जेतेपद मिळवून दिलंय याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. खेरीज पहिल्या क्रमांकाच्या पटावर त्यानं सुवर्णपदक देखील जिंकलं. संघाच्या जेतेपदात गुकेशची भूमिका फार मोठी होती...‘फिडे’च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गुणांच्या यादीनुसार, विश्वचषकातील 22 खेळाडूंच्या खात्यात आहेत ते 2700 वा त्यापेक्षा जास्त ‘एलो रेटिंग पॉइंट्स’. त्यामुळंच ही स्पर्धा गुकेशच्या दृष्टीनं सोपी ठरण्याची शक्यता अजिबात नाही..

पण लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे कठीण परिस्थितीत गुकेश झपकन वरच्या दिशेनं झेपावतो. महान मॅग्नस कार्लसननं त्याच्यासंदर्भात बोलताना एकदा वापर केला होता तो ‘प्युअर काऊंटर’ शब्दांचा...त्यानं म्हटलं होतं, ‘मला गुकेशची खेळण्याची शैली प्रज्ञानंद वा अर्जुन एरिगेसीप्रमाणं आवडत नाहीये. पण तो अतिशय कमी चुका करतो हे मान्य करायलाच हवं. या पार्श्वभूमीवर त्याचं वर्णन अतिशय घातक खेळाडू असं मी करेन’...

भारतीय बुद्धिबळ जगताच्या दृष्टीनं प्रचंड महत्त्व आहे ते विश्वचषक स्पर्धेला...तीन खेळाडूंनी यापूर्वीच कँडिडेट स्पर्धेतील त्यांचं स्थान निश्चित केलंय, तर पाच बुद्धिबळपटू (खरं सांगायचं झाल्यास चार) गोव्यातून त्या दिशेनं झेपावतील. 2025 मधील ‘फिडे सर्किट’च्या साहाय्यानं ‘कँडिडेट’ स्पर्धेसाठी पात्र ठरलाय तो प्रज्ञानंद. अन्य चार जागांकरिता झुंजतील ते अर्जुन एरिगेसी, विदित गुजराथी, निहाल सरिन आणि इतर 19 देशी खेळाडू...विश्वचषक स्पर्धा महत्त्वाची ठरेल ती भारतीय बुद्धिबळपटूंचा दर्जा ठरविण्यासाठी देखील...2022 साली झालेल्या स्पर्धेत अर्जुन एरिगेसी ‘कँडिडेट’करिता पात्र ठरण्याच्या जवळ पोहोचला होता. पण प्रज्ञानंदनं त्याला अक्षरश: ‘थ्रिलर’ म्हणून वर्णन केल्या जाणाऱ्या लढतीत हरवलं...

त्या क्षणापासून अर्जुन एरिगेसी ठरलाय भारतीय संघातील सर्वांत जास्त प्रगती करणारा बुद्धिबळपटू. कित्येक विश्लेषक त्याच्या शैलीची तुलना करतात ती महान खेळाडूंबरोबर. थोड्या दिवसांसाठी का असेना, पण 2800 ‘एलो’चा टप्पा ओलांडणारा तो पहिलावहिला भारतीय...यंदा मात्र अर्जुनला दर्शन घडलंय ते संमिश्र वर्षाचं. त्यानं काही फ्रीस्टाईल स्पर्धा जिंकलेल्या असल्या, तरी महत्त्वाच्या वेळी त्याला फारसं यश मिळालेलं नाहीये. आता त्याला सुवर्णसंधी मिळालीय ती 2022 मधील पराभवाचे उट्टे काढण्याची व 2026 मध्ये होऊ घातलेल्या ‘कँडिडेट’ स्पर्धेकरिता पात्र ठरण्याची...

गुकेश, प्रज्ञानंद, एरिगेसी या त्रिमूर्तीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविलेलं असलं, तरी यंदाचा विचार केल्यास त्यांना चाहत्यांचा अपेक्षा पूर्ण करणं जमलेलं नाहीये. जेव्हा गुकेश फ्रीस्टाईल नि अन्य काही स्पर्धांत अपयशी ठरला तेव्हा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी वेळ न गमावता त्याच्या विश्वजेतेपदाला ‘फ्लूक’ ठरविण्याचं काम इमानेइतबारे पार पाडलं. प्रज्ञानंद नि एरिगेसी यांच्या बाबतीत सुद्धा तसंच म्हणावं लागेल. त्या दोघांनी फ्रीस्टाईल स्पर्धांत चांगली कामगिरी नोंदविलेली असली, तरी अन्य ठिकाणी ते अपयशीच ठरलेत. उदाहरणार्थ समरकंद इथं आयोजित करण्यात आलेल्या ग्रँड स्विस स्पर्धेत एरिगेसीवर सहाव्या, तर प्रज्ञानंदवर 35 व्या क्रमांकावर समाधान मानण्याची पाळी आली...

2023 साली ग्रँड स्विस स्पर्धा जिंकणारा विदित गुजराथी सुद्धा धावतोय तो त्याच रस्त्यावरून. यंदाच्या ग्रँड स्विसमध्ये त्याच्या वाट्याला आलं 15 वं स्थान...प्रज्ञानंदनं ‘टाटा स्टील’ स्पर्धेसह एकूण तीन जेतेपदं मिळविलीत आणि भारतीय बुद्धिबळाची थोडी फार प्रतिष्ठा राखलीय...आता एरिगेसी, प्रज्ञानंद, विदितचं लक्ष केंद्रीत झालेलं असेल ते गोव्यात आघाडीची तीन स्थानं पटकावून ‘कँडिडेट’ स्पर्धेसाठी पात्र ठरण्यावर (प्रज्ञानंदनं गेल्या वेळी अंतिम फेरीत धडक मारण्यात यश मिळविलं होतं. मात्र तिथं त्याला मॅग्नस कार्लसनसमोर हात टेकावे लागले)...याखेरीज लक्ष असेल ते यंदाच्या सुऊवातीला महिलांचा विश्वचषक जिंकणाऱ्या दिव्या देशमुखवरही. या स्पर्धेतील ती एकमेव महिला खेळाडू. महिला गटातील विश्वविजेती जू वेनजुन अन् महिलांच्या जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानधारक हौ यिफान यांनी भाग न घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिनं वाइल्ड कार्ड स्वीकारलं...

या भारतीय खेळाडूंच्या महत्त्वाकांक्षेसमोर आव्हान असेल ते अनिश गिरी, वेस्ली सो, व्हिन्सेंट कीमरसारख्या काही बलाढ्या नावांचं. जोडीला इयान नेपोम्नियाची, वेई यी आणि नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हसारखे खेळाडूही मोठी मजल मारण्याची ताकद बाळगतात...आणि दोन वेळा विजेता ठरलेल्या लेव्हॉन आरोनियनला विसरून कसं चालेल ?

- राजू प्रभू

Advertisement
Tags :

.