भारत-चीन सीमावादावर भारताची सडेतोड मागणी
वृत्तसंस्था / क्विंगदाओ (चीन)
भारत आणि चीन यांच्यातील सीमावादावर निश्चित आणि स्थायी स्वरुपाचा तोडगा काढला गेला पाहिजे, अशी मागणी भारताने केली आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन संरक्षणमंत्र्यांच्या परिषदेच्या निमित्ताने चीनमध्ये चीनचे संरक्षणमंत्री डाँग जून यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेत त्यांनी सीमावाद सुटावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
दोन्ही देशांचा एकमेकांची सातत्यपूण संपर्क, सामरिकदृष्ट्या तणावमुक्त सीमाक्षेत्र, आणि रचनात्मक तसेच सुनियोजित चर्चा यांच्या माध्यमातून सीमावादावर तोडगा काढावयास हवा, अशी ठाम भूमिका या चर्चेत राजनाथ सिंह यांनी मांडली. भारताला चीनशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. भारत संघर्षांच्या विरोधात आहे. तथापि, तो कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यास पूर्ण सज्ज आहे. भारत आणि चीन यांच्यात सलग तीन वर्षे सीमातणाव होता. दोन्ही देशांच्या सेना लडाखमध्ये आमने-सामने उभ्या होत्या. कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडेल अशी स्थिती होती. तथापि, याच काळात तणाव कमी करण्यासाठी सातत्याने सेनाधिकारी पातळीवर चर्चा केली जात होती. अखेर या चर्चेला यश येऊन दोन्ही देशांनी महत्वाच्या बिंदूंवरुन आपल्या सेना मागे हटविल्या आहेत. तसेच, सीमेवर पूर्वस्थिती निर्माण करण्यात स्वारस्य दाखवले आहे. अशाच प्रकारे सीमावादावर अंतिम तोडगाही निघू शकतो, असे भारताचे म्हणणे असल्याचे राजनाथ सिंह यांनी या चर्चेत चीनचे सरक्षणमंत्री डाँग जून यांना स्पष्ट केले आहे.
संरक्षण विभागाचे निवेदन
राजनाथ सिंह आणि डाँग जून यांच्यातील चर्चेसंबंधी भारताच्या संरक्षण विभागाने शुक्रवारी निवेदन प्रसिद्ध केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी सौहार्दपूर्ण आणि सखोल चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता राहिली पाहिजे. यासंबंधी जे करार झाले आहेत, त्यांचे पालन दोन्ही बाजूंकडून झाले पाहिजे. सध्या दोन्ही देश सीमेवर पूर्वस्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, हे योग्य आहे, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी चर्चेमध्ये केले, अशी माहिती संरक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
(बॉक्स फोटोसह)
रशियाच्या संरक्षणमंत्र्यांशीही चर्चा
राजनाथ सिंह यांनी रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रे बेलोसोव्ह यांच्याशीही द्विपक्षीय संरक्षण संबंधांवर चर्चा केली. भारताला एस-400 या वायुसंरक्षण यंत्रणेची पुढचे दोन भाग येत्या दीड वर्षांमध्ये पुरविण्यात येतील, असे रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच सुधारित सुखोई विमाने, अत्याधुनिक सामरिक साधनसामग्री आणि इतर साधने भारताला पुरविण्याविषयीही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली, अशी माहिती संरक्षण विभागाच्या निवेदनात देण्यात आली आहे. याशिवाय दोन्ही नेत्यांनी जागतिक राजकीय-सामरिक स्थिती, जगाच्या विविध भागांमध्ये चाललेले सशस्त्र संघर्ष आणि संबंधित विषयांवरही एकमेकांशी चर्चा केली आहे.