भारताच्या अभियानाला प्रारंभ
जागतिक स्तरावर पाकिस्तानला उघडे पाडण्यासाठी भारताने एक व्यापक संपर्क अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. हे सर्वपक्षीय अभियान आहे. लोकसभा आणि राज्यसभा यांचे सदस्य असणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांचा यात सहभाग आहे. दहशतवादाच्या विरोधात सारा भारत एक आहे, हा संदेश जगाला देण्यासाठी, तसेच पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी करण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आल्याचे दिसून येते. गुरुवारी, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील खासदारांच्या शिष्टमंडळाने संयुक्त अरब अमिरातीच्या नेत्यांची भेट घेतली. तसेच संयुक्त जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जपानला भेट दिली. या दोन्ही देशांनी भारताच्या भूमिकेला आणि या अभियानाला समर्थन व्यक्त केले. दहशतवाद हा जगाचा शत्रू असून त्याला गाडल्याशिवाय जगात शांतता नांदणार नाही, हा भारताचा जगाला संदेश असून तो या अभियानाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविला जाणार आहे. अशा प्रकारची अभियाने कितपत यशस्वी ठरतात हा नेहमीच प्रश्नचिन्हांकित मुद्दा राहिला आहे. तथापि, विशिष्ट प्रसंगी ती हाती घ्यावी लागतात, ही देखील वस्तुस्थिती आहे. या अभियानाची ‘वेळ’ हा देखील कळीचा मुद्दा आहे. पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी निर्दोष आणि नि:शस्त्र अशा पर्यटकांवर क्रूर हल्ला करुन यांच्या हत्या केल्या. त्यानंतर 15 व्या दिवशी भारताने दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील 9 तळ नष्ट करुन आणि 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालून आपल्या सामर्थ्याची चुणूक प्रथम पाकिस्तानला आणि जगालाही दाखवून दिली. त्यानंतर पाकिस्तान स्वस्थ बसला असता, तर पुढचा सशस्त्र संघर्ष टळला असता. तथापि, भारताच्या अचूक आणि घातक प्रतिहल्ल्यानंतरही पाकिस्तानची गुर्मी टिकून राहिल्याने त्याने भारतावर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे यांचा मारा केला. या माऱ्याचे लक्ष्य भारतातील नागरी वस्त्या आणि भारताचे सैनिकी तळ हे होते. पाकिस्तानचे हे प्रयत्न वाया गेले. मात्र, त्यामुळे भारताने पुन्हा पाकिस्तानला दणका देण्याची आवश्यकता निर्माण झाली. हा हिशेबही भारताने पाकिस्ताच्या 11 वायुतळांची बर्बादी करुन चुकता केला. चार दिवस झालेल्या या संपूर्ण संघर्षात भारताचा विजय झाला, ही बाब आज आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्य करण्यात आली आहे. अशा प्रकारे प्रथम पराक्रमाचे दर्शन घडवून आणि पाकिस्तानला वाकवून नंतर भारताने हे जागतिक अभियान हाती घेतले आहे. त्यामुळे ते अधिक महत्त्वाचे आणि प्रभावी ठरते. पाकिस्ताला कोणताही सशस्त्र दणका न देता भारताने हे अभियान हाती घेतले असते, तर ती केवळ रडकथा ठरली असती. पण आधी द्यायचा तसा आणि द्यायचा तिथे जोरदार तडाखा देऊन आता या मुत्सद्देगिरीच्या मार्गाला भारताने हात घातल्याने भारताची प्रतिमा अधिकच झळाळणार, हे निश्चित आहे. कारण जगात बलवानांना आणि धारिष्ट्यावानांना किंमत असते. दुर्बलांना देवही साहाय्य करत नाही, असे एक वचन आहे. त्यामुळे भारताने आधी आपण किती सबळ आहोत, हे दर्शविले आणि मग आता पाकिस्तानच्या नाड्या मुत्सद्देगिरीच्या मार्गाने आवळण्यास भारत सज्ज झाला आहे. पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताने प्रथम सिंधू पाणीवाटप करार स्थगित केला. हे पाकिस्तानविरोधात पुकारलेले जलयुद्धच आहे. अर्थात, भारताच्या या निर्णयाचे परिणाम दिसून यायला काही वर्षे जावी लागणार आहेत. तसेच पाकिस्तानात जाणाऱ्या सर्व नद्यांचे पाणी अडविण्यासाठी, भारताला पाण्याचा साठा करण्याची सोय करावी लागणार आहे. त्याही संबंधात भारताने पावले उचलण्यास वेगाने प्रारंभ केल्याने, पाकिस्तानवर मानसिक दबाव निश्चितच आला आहे. सशस्त्र संघर्षात भारताने पाकिस्तानला जी धूळ चारली, त्यामुळे त्या देशाला शस्त्रसंघर्ष थांबविण्यासाठी भारताकडे प्रस्ताव द्यावा लागला. आपले विनाकारण रक्त सांडणाऱ्या शेजारी देशाला धडा शिकविण्यासाठीचे जे उपाय असतात, त्यातील प्रत्येक उपाय भारत करणार, हे या सर्व घडामोडींमुळे स्पष्ट होते. तेव्हा या जागतिक अभियानाकडे या दृष्टीने पहावे लागते. या अभियानामुळे कदाचित भारताचा व्यावहारिक लाभ होणार नाही. तसेच पाकिस्तानही आपल्या मार्गापासून सुखासुखी दूर जाण्याची शक्यता नाही. पण, बुद्धीबळाच्या खेळात ज्याप्रमाणे केवळ सोंगट्यांची धडाधड मारामारी करुन डाव जिंकता येत नाही. डाव जिंकण्यासाठी अनेक चाली शांत डोक्याने आणि पुढचा विचार करुन, तसेच प्रतिस्पर्ध्याच्या क्षमतेचे अनुमान काढत रचाव्या लागतात. प्रतिपक्षाच्या सोंगट्या मारणे आणि त्या प्रक्रियेत आपल्या काही सोंगट्या गमावणे, हा डाव जिंकण्याच्या व्यापक धोरणाचा एक भाग असतो. तशाच प्रकारे भारताला पाकिस्तानला वठणीवर आणायचे असेल, तर साम, दंड आणि भेद, तसेच वेळप्रसंगी दामदेखील, उपयोगात आणावा लागणार आहे. त्यामुळे भारताच्या या जागतिक अभियानाचा विचार पाकिस्तानविरोधातील एक व्यापक, दूरदर्शी आणि दूरगामी धोरणसंचातील एक उपाययोजना म्हणून बघावे लागणार आहे. काहीजणांनी या अभियानाची खिल्ली उडविली आहे. दहशतवादी काश्मीरमध्ये फिरतात आणि आपले नेते जगात फिरतात, अशा प्रकारच्या काही शेलक्या टिप्पण्याही केल्या गेल्या आहेत. त्या केवळ हास्यास्पद आहेत. त्यांना उत्तरही देण्याची आवश्यकता नाही. भारताच्या या ‘ग्लोबल आऊटरीच’चा मूळ उद्देश केवळ पाकिस्तानसंबंधीच्या तक्रारी जगाला सांगणे हा नसून त्या देशावर राजनैतिक दबाव आणणे हा आहे. आज जगातील प्रत्येक देश हा अन्य देशांशी आर्थिक, सामाजिक आणि भूराजकीय बंधांनी बांधला गेलेला आहे. त्यामुळेच रशिया-युक्रेन यांच्यात संघर्ष झाला तर भारतातला किंवा अन्य देशांमधला शेअरबाजार खाली जातो. त्यामुळे या अभियानामुळे पाकिस्तानवर दबाव येऊ शकतो. समजा, तो लक्षणीय प्रमाणात आला नाही, तरी भारताला जेव्हा पुन्हा पाकिस्तानला सशस्त्र दणका द्यायची वेळ येईल, तोवेळपर्यंत भारताची बाजू जगापर्यंत पोहचलेली असेल. त्यामुळे अशी अभियाने तत्काळ परिणाम देणारी नसली, तरी ती निरुपयोगी नसतात, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.