पॅराग्वेसोबत भारताची द्विपक्षीय चर्चा
राष्ट्रपती सँटियागो भारत दौऱ्यावर : पालम एअरबेसवर गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सॅंटियागो पेना पॅलासिओस यांनी सोमवारी दुपारी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. ही भेट दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे झाली. यादरम्यान दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये द्विपक्षीय पातळीवरील चर्चाही झाली. त्यांनी पंतप्रधान मोदींशी भारत आणि पॅराग्वेमधील संबंधांच्या प्रत्येक पैलूवर सविस्तर चर्चा केली. ‘तुमची भारत भेट ऐतिहासिक आहे... ती परस्पर संबंधांबद्दलची तुमची वचनबद्धता स्पष्टपणे दर्शवते, असे बैठकीत पंतप्रधान म्हणाले.
पॅराग्वेचे राष्ट्रपती सॅंटियागो हे तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर भारतात आले आहेत. त्यांच्यासोबत मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि व्यवसाय क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळही भारतात आले आहे. सॅंटियागो यांना दिल्लीतील पालम येथील हवाई दल तळावर औपचारिक ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. पॅराग्वेच्या राष्ट्रपतींनी भारताला भेट देण्याची ही दुसरी वेळ आहे. तर सॅंटियागो यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सन्मानार्थ डिनरचे आयोजनही केले आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या द्विपक्षीय संबंधांना बळकटी देण्याच्या दिशेने ही भेट एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते. ते 4 जून 2025 रोजी पॅराग्वेला परततील.
पॅराग्वेचे राष्ट्रपती सॅंटियागो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून भारताच्या भेटीवर आले आहेत. दिल्ली आणि मुंबई येथे त्यांचे महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहेत. परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांच्याशीही त्यांची चर्चा होणार आहे. त्याव्यतिरिक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनाही ते भेटणार आहेत.
विविध क्षेत्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध
भारत आणि पॅराग्वेने 13 सप्टेंबर 1961 रोजी राजनैतिक संबंध प्रस्थापित केल्यापासून दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध विकसित होत आले आहेत. दोन्ही देशांनी व्यापार, शेती, आरोग्य, औषधनिर्माण आणि माहिती तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रात सहकार्य विकसित केले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. ऑटोमोबाईल आणि औषधनिर्माण क्षेत्रातील भारतीय कंपन्यांनी आधीच पॅराग्वेमध्ये आपले अस्तित्व स्थापित केले आहे, तर पॅराग्वेच्या कंपन्या भारतात प्रामुख्याने संयुक्त उपक्रमांद्वारे कार्यरत असल्यामुळे मजबूत आर्थिक संबंध निर्माण होण्यास हातभार लागत आहे. दोन्ही देशांचे संयुक्त राष्ट्र सुधारणा, हवामान बदल, अक्षय ऊर्जा आणि दहशतवादाशी लढा यासह विविध आंतरराष्ट्रीय मुद्यांवर समान विचार आहेत, असे निवेदनात पुढे म्हटले आहे.
मुंबईची भेटही महत्त्वाची ठरणार
मुंबई भेटीदरम्यान राष्ट्रपती सॅंटियागो राजकीय नेते, उद्योग भागधारक, स्टार्टअप्स, नवोन्मेषक आणि तंत्रज्ञान तज्ञांशी संवाद साधतील. त्यात आर्थिक आणि तांत्रिक सहकार्यावर भर दिला जाईल. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रपती सॅंटियागो यांचा हा दौरा दोन्ही देशांना द्विपक्षीय संबंधांचा व्यापक आढावा घेण्याची तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा करण्याची एक महत्त्वाची संधी प्रदान करेल.